आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : सर्वोत्तम सलामीवीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००६ मध्ये नागपुरात भारताविरुद्ध अॅलिस्टर कुकने शतक झळकावून कसोटी क्रिकेटमधले पदार्पण गाजवले. त्याच भारताविरुद्धच शतक ठोकून कुकने मैदान सोडले आहे. बारा वर्षांत १६१ कसोटी सामन्यांमध्ये १२ हजार ४७२ धावा आणि ३३ शतके ही कुकची कमाई. सर्वाधिक कसोटी धावा काढलेल्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड यांच्यानंतर कुक आता पाचव्या क्रमांकावर आहे. डावखुऱ्या फलंदाजांमध्ये तर कुक सध्या जगात पहिलाच. ब्रायन लारा, कुमार संगकारा, अॅलन बॉर्डर आदी अनेक डावखुऱ्यांना मागे टाकून. एवढेच नव्हे, तर इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासातदेखील दहा हजारांचा टप्पा ओलांडणारा कुक हा एकमेव. 


पाहायला जावे तर डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्यासारखा धाक कुकचा नव्हता. डेव्हिड गॉवरसारखी नजाकतदार शैली त्याच्याकडे नव्हती. जेफ्री बॉयकॉटसारखा अगदी पुस्तकी, तंत्रशुद्ध फटके कुककडे नव्हते. केविन पीटरसनसारखा धडाका त्याच्याकडे नव्हता. ग्रॅहम गुचसारखा जाणता तो कधी भासला नाही. तरीही इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा आणि जागतिक यादीत पाचवे स्थान असा ठसा उमटवून कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. 


चिकाटी आणि धीरोदत्तपणा हा कुकचा मोठा गुण होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या फलंदाजीच्या मर्यादांचीही त्याला पुरती जाण होती. लारा-तेंडुलकरसारखी अनोखी गुणवत्ता घेऊनच आपण जन्माला आलेलो नाही किंवा हेडन-सेहवागसारखी गोलंदाजांवर तुटून पडण्याची बेधडक क्षमताही आपल्यात नाही, हे कुक ओळखून होता. कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक कणखर मनोधैर्य आणि अथक संयम मात्र त्याच्याकडे ठासून होता. याच जोरावर त्याने कारकीर्द घडवली. म्हणून तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या दहा सार्वकालिक फलंदाजांमध्ये कुक हा एकटाच सलामीवीर दिसतो. इंग्लिश वातावरणात नवा चेंडू जादू केल्यासारखा कसा आणि किती कोनातून 'स्विंग' होतो, दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर नव्या चेंडूला किती जीवघेणी उसळी मिळते, ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यांवरून नवा चेंडू काय सुसाट गतीने अंगावर येतो किंवा आशियातल्या मंद खेळपट्ट्यांवरून चेंडू कसा फिरतो ही भानगड 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' अशी असते. म्हणूनच पहिल्या पंधरा-वीस षटकांत स्वत:चा बळी जाऊ न देता नव्या चेंडूची लकाकी घालवण्याचे आणि त्याचा टणकपणा कमी करण्याचे आव्हान कसोटी सलामीवीरांपुढे असते. हे करून धावा जमवल्या तर सोन्याहून पिवळे. याच आव्हानाचा सामना करताना भल्याभल्यांची कारकीर्द कायमची तंबूत गेली आहे. नव्या चेंडूवर भंबेरी उडत असल्यानेच कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्यांमध्ये सलामीवीर कोणीच नाहीत. अपवाद कुक आणि आपल्या सुनील गावसकरांचा. 


प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध करत, स्वत:चीच परीक्षा बघत कोणाशीही स्पर्धा न करता कुक फलंदाजी करत राहिला. दीर्घ डाव रचत राहिला. दुसऱ्या डावात खेळताना त्याने सर्वाधिक १३ शतके काढली, एवढ्यावरून त्याची कणखर मानसिकता ध्यानी यावी. पैसा, प्रसिद्धीच्या 'फुलटॉस' चेंडूंना न भुलण्याची खबरदारी कुकने नेहमी घेतली. टी-ट्वेंटीच्या मोहात तो अडकला नाही. कसोटी हाच क्रिकेटमधला हिमालय. क्षमतांचा सर्वोच्च कस कसोटी क्रिकेटमध्येच लागतो. म्हणून प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय कुकने कसोशीने निभावला. जगभरच्या मैदानांत त्याने धावा जमवल्या. हरतऱ्हेची गोलंदाजी समर्थपणे खेळून काढली. दीर्घ खेळ्या खेळून आणि प्रदीर्घ भागीदाऱ्या रचून जगभरच्या गोलंदाजांना रडवले. कुकची चिकाटी आणि सातत्य पाहून सुनील गावसकर एकदा म्हणाले होते, 'पंधरा हजार धावा आणि पन्नास कसोटी शतके कुकच्या आवाक्याबाहेरची नाहीत.' गावसकरांनी कौतुक करावे आणि तेही एका इंग्लिश फलंदाजाचे यातच सर्व काही आले. कर्णधार म्हणूनही कुकने कारकीर्द गाजवली. इंग्लंडसाठी अत्यंत प्रतिष्ठेची 'अॅशेस' मालिका त्याने दोनदा जिंकून दिली. भारताला भारतात येऊन हरवण्याचा, आफ्रिकेला आफ्रिकेत जाऊन मात देण्याचा पराक्रम इंग्लंडने कुकच्या नेतृत्वाखालीच केला. सलग १५८ कसोटी सामने खेळणारा कुकसारखा दुसरा क्रिकेटपटू जगात नाही. कुकची निवृत्ती कदाचित क्रिकेट रसिकांच्या विस्मरणात जाईल, परंतु जबरदस्त इच्छाशक्ती आणि स्वत:च्या मर्यादा ओलांडून उच्च कामगिरी करत राहण्याचा कुकचा ध्यास जाणकार क्रिकेट रसिक कधी विसरू शकत नाहीत. इंग्लिश क्रिकेटला तर या खंबीर 'रॉक ऑफ जिब्राल्टर'ची उणीवच भासत राहील. 
-सुकृत करंदीकर, विशेष प्रतिनिधी, पुणे 

 

बातम्या आणखी आहेत...