सदैव स्मरणात राहणारा / सदैव स्मरणात राहणारा सामान्यांचा नेता

ज्येष्ठ पत्रकार अटलजी सामान्य कुटुंबात जन्मले, सामान्य शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे जीवनही सामान्यपणेच झाले, हे सामान्यत्व ते कधीही विसरले नाहीत. हा राजनेता सामान्य माणसाला कधीही नारळाच्या झाडासारखा उंच वाटला नाही.

Aug 24,2018 08:59:00 AM IST

ज्येष्ठ पत्रकार अटलजी सामान्य कुटुंबात जन्मले, सामान्य शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे जीवनही सामान्यपणेच झाले, हे सामान्यत्व ते कधीही विसरले नाहीत. हा राजनेता सामान्य माणसाला कधीही नारळाच्या झाडासारखा उंच वाटला नाही.


गेली पंधरा वर्षे अटलबिहारी वाजपेयी सक्रिय राजकारणात नव्हते. त्यांचे कुठे भाषणही झाले नाही किंवा घडामोडींवर त्यांचे भाष्यही कधी प्रकट झाले नाही. त्यांचे वयदेखील (९३) झाले होते आणि वार्धक्याने त्यांचे निधन झाले. या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर जनतेच्या स्मरणातून ते केव्हाच जायला पाहिजे होते. सामान्य राजकीय नेता त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन वर्षांत विसरला जातो. दहा-पंधरा वर्षांचा कालावधी गेल्यानंतर अशा नेत्याचे कोणी नाव घेतले तर ऐकणारा विचारतो, 'कोण होते ते?' डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, ए.पी.जे. अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी आणि आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत कोण होते ते? असा प्रश्न कुणी विचारत नाहीत. लोकांच्या भावविश्वात भारताच्या या थोर नेत्यांनी अढळ स्थान मिळवलेले आहे.


अटलजी उत्तम वक्ते होते, उत्तम कवी होते, कुशल राजकारणी होते, उत्तम खवय्या होते, श्रेष्ठ रसिक होते... त्यांच्या गुणांची यादी खूप वाढवता येईल. महान कवी अटलजींच्या काळातही झाले, उत्तम वक्तेदेखील झाले, उत्तम रसिकही झाले, कुशल राजकारणीही झाले, परंतु यापैकी कुणीही अटलजी होऊ शकलेला नाही. कवितेने अटलजी होत नाही, भाषणाने अटलजी होत नाही आणि राजकारण करून अटलजी होत नाही. अटलजी 'अटलजी' झाले, म्हणजे काय झाले?


या प्रश्नाचे उत्तर सामान्य माणसाने दिलेले आहे. एखादा महान राजनेता दिवंगत झाला की, शिष्टाचाराला धरून त्याच्याविषयी चार शब्द चांगले बोलावे लागतात आणि चार शब्द चांगले लिहावे लागतात. अटलजी गेल्यानंतर सगळ्याच राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. शत्रूराष्ट्र पाकिस्ताननेदेखील श्रद्धांजली वाहिलेली आहे. अटलजी ज्या विचारधारेचे होते, ती विचारधारा संपवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्यांनीदेखील चार शब्द चांगले उच्चारलेले आहेत. हा सर्व शिष्टाचार असतो. असे केले नाही तर ते बरे दिसत नाही आणि लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते.


सामान्य माणसाचे असे नाही. त्याला असली नाटकबाजी करण्याचे काही कारण नसते. जे मनात आहे ते तो बोलतो. त्याला. तो साध्या सोप्या शब्दांत आपल्या मनातील भाव व्यक्त करतो. गेल्या आठ दिवसांत मला रिक्षावाला, भाजीवाला, दूधवाला, ओला-उबेरचा ड्रायव्हर, घरातील नव्वदी पार केलेले दांपत्य भेटले. ही सर्व अतिसामान्य माणसे आहेत, राजकारणाशी त्यांना काही घेणे-देणे नाही. भाजपचे मतदार आहेत की नाही मला माहीत नाही, पण सर्वांनी एकच वाक्य उच्चारले, 'एक चांगला माणूस गेला.' मग तो हिंदी भाषिक असेल तर म्हणाला, 'एक नेक आदमी गेला' आणि पुढचे वाक्य दोघांनीही समान उच्चारले, 'वाईट झाले.' मी त्यांना असे म्हटले नाही की, ९३व्या वर्षी माणूस गेला, यात काय वाईट झाले? सामान्य माणसाला तसे वाटले नाही. त्याला वाटले की, या जवळचा एक चांगला माणूस गेला.


अटलजींची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांत अटलजींनी काय मिळवले? या प्रश्नाचे उत्तरही सामान्य माणसाने देऊन टाकले. अटलजींनी सामान्य माणसाच्या मनात आपले स्थान निर्माण केले. गांधीजी गेले तेव्हा बापूजी गेले, अशी लोकभावना झाली. नेहरू गेले तेव्हा एक राजहंस उडून गेला, अशी लोकभावना झाली. इंदिरा गांधी गेल्या तेव्हा अम्मा गेली, अशी लोकभावना झाली आणि अटलजी गेले तेव्हा एक चांगला माणूस गेला, अशी लोकभावना झाली. या प्रकारच्या लोकभावना कृत्रिम तऱ्हेने कोणाला निर्माण करता येत नाहीत.


अटलजींनी आपल्या जीवनात एक सूत्र ठेवले. ते म्हणत असत, 'न भीतो मरणादास्मि, केवलं दूषितं यशः' मी मरणाला भीत नाही, पण अपकीर्तीला भितो, राजकारणी माणसाची अपकीर्ती भ्रष्टाचारामुळे होते, विचार सोडून तडजोडी केल्यामुळे होते, पक्ष फोडाफोडीमुळे होते, आपला स्वार्थ साधला नाही तर पक्षाला लाथ मारण्याच्या प्रवृत्तीमुळे होते, स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवल्यामुळे होते, शत्रूराष्ट्राची नको तितकी स्तुती केल्यामुळे होते. अटलजींच्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांच्या चारित्र्यावर यापैकी कशाचाही डाग नाही. लोकसभेतील त्यांचे भाषण १९५७ मध्ये पं. नेहरू यांनी ऐकले आणि ते म्हणून गेले, 'हा युवक भविष्यात भारताचा पंतप्रधान होईल.' नेहरूंची भविष्यवाणी खरी झाली. अटलजींनी राजकीय यशासाठी पक्ष फोडण्याचा विचार स्वप्नातही आणला नाही आणि सत्ता टिकवण्यासाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचे पापही त्यांनी केले नाही. लोकसभेतील एक मताचा पराभव अनेक कोटी रुपये खर्च करून त्यांना टाळता आला असता, ते त्यांनी केले नाही. सत्ता गेली तरी चालेल, पण कोणतेही राजनैतिक अनैतिक कृत्य मी करणार नाही, कुणाला करू देणार नाही, अटलजींची अशी ठाम धारणा होती. वलय असलेला राजकीय नेता नेहमीच स्त्री-पुरुषांच्या गर्दीतच असतो. अटलजी सदैव सावध राहिले आणि राजकारणाच्या निसरड्या वाटेवर त्यांनी आपला पाय कधी घसरू दिला नाही.


सामान्य माणसाला राजकीय तत्त्वज्ञानातील खोली आणि बारकावे समजत नाहीत, त्यामुळे त्याचे काही बिघडतदेखील नाही, परंतु त्याला हे समजते की, राजकारण करणारा जो नेता आहे, तो प्रामाणिक आहे का, बोलल्याप्रमाणे वागतो का, राजकीय स्वार्थासाठी तो काय काय करत आहे, अशा सर्व गोष्टी सामान्य माणूस पाहत असतो आणि आपल्या परीने समजून घेत असतो. सत्तेवर आल्यावर अटलजींनी या देशाच्या राजकीय प्रवाहाला एक नवीन दिशा दिली. ही दिशा होती विकासाची, ही दिशा होती स्थैर्याची आणि ही दिशा होती, भ्रष्टाचारमुक्त सत्ता राबवण्याची. अटलजींचा पंतप्रधान म्हणून असलेला कालखंड हा देशाच्या विकासाचा कालखंड आहे. देशाला रस्त्यांनी जोडण्याचे काम अटलजींच्या काळात सुरू झाले. नदीजोड प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या काळात झाली. शेती उत्पादनात भरीव प्रगती त्यांच्या काळात झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने भारत पुढे जाऊ लागला. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय युवकांनी प्रचंड प्रगती सुरू केली.


विरोधक अटलजींच्या बाबतीत म्हणत असत की, अटलजी चांगले आहेत, परंतु ते ज्या पक्षात आहेत तो पक्ष चांगला नाही, म्हणजे पक्षाची विचारसरणी चांगली नाही. ही विचारसरणी जातीयवादी, सांप्रदायिक असून तिचा प्रभाव वाढल्यास देशात धार्मिक कलह सुरू होतील आणि धार्मिक आधारावर देशाचे पुन्हा तुकडे पडतील. अटलजी ज्या विचारधारेतून आले, ती विचारधारा शुद्ध आहे. त्या शुद्धतेचे मानवी रूपातील प्रकटीकरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.


ते जनता सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री झाले. आपल्या कार्यालयात गेले. कार्यालयातील नेहरूंची प्रतिमा काढून टाकण्यात आली होती. अटलजींच्या ते लक्षात आले, त्यांनी ती प्रतिमा आणून तेथे बसवायला लावली. नेहरूंविषयी त्यांच्या मनात श्रेष्ठ प्रकारचा श्रद्धाभाव होता. वैचारिक मतभेद असतील, त्यामुळे मनभेद होऊ नयेत, ही अटलजींची भूमिका असे. सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याबद्दल आणि राजकारणातील त्यांच्या लुडबुडीबद्दल अटलजी कधीही काहीही बोललेले नाहीत. सोनिया गांधींवर त्यांनी प्रहार केलेले आहेत, पण ते त्यांच्या विचारांवर केलेले आहेत. अक्षम, अकुशल, संवेदनहीन, भ्रष्टाचारी, अशा प्रकारचे आरोप सोनिया गांधींनी लोकसभेच्या भाषणात केले, तेव्हा अटलजी खवळले आणि त्यांनी सोनियांना सणसणीत उत्तर दिलेले आहे, 'आमच्या सरकारची समीक्षा करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला, आम्हाला राज्य करण्याचा अधिकार जनतेने दिलेला आहे,' या भाषेत त्यांनी सुनावले. ७१ च्या युद्धांनंतर इंदिरा गांधीजींची त्यांनी प्रशंसा जराही संकोच न करता केली, इतके औदार्य त्यांच्याकडे होते.


अटलजी सामान्य कुटुंबात जन्मले, सामान्य शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे जीवनही सामान्यपणेच झाले, हे सामान्यत्व ते कधीही विसरले नाहीत. लोकांत मिसळताना, आपल्या कविता वाचून दाखवताना, सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन करताना, पुरणपोळी आणि कांदेपोह्यांचा आस्वाद घेताना अनेक वर्षांनंतर भेट झाली असता वडील कसे आहेत, असे विचारणारा हा राजनेता सामान्य माणसाला कधीही नारळाच्या झाडासारखा उंच वाटला नाही. सामान्य माणसाला तो आम्रवृक्षाची शीतल छाया वाटला. म्हणून पंधरा वर्षांत विजनवासात जाऊन वार्धक्याने गात्रे शिथिल झाल्यानंतरही सामान्य माणसाच्या स्मरणातून हा थोर पुरुष गेला नाही आणि जेव्हा तो पार्थिव देहाने गेला तेव्हा 'एक चांगला माणूस गेला' अशी छबी ठेवून गेला.

- रमेश पतंगे

X