Home | Editorial | Columns | column article about change in devolapment of india

'इंजिन' धावते आहे, मग 'डबे' का नाहीत?

यमाजी मालकर , ज्येष्ठ पत्रकार | Update - Sep 03, 2018, 08:10 AM IST

एकीकडे जगातील सर्वाधिक ८.२ टक्के विकास दर नोंदवणारा भारत आर्थिकदृष्ट्या एवढा अस्वस्थ का आहे? देशाची गाडी ओढणारे उद्योग

 • column article about change in devolapment of india

  एकीकडे जगातील सर्वाधिक ८.२ टक्के विकास दर नोंदवणारा भारत आर्थिकदृष्ट्या एवढा अस्वस्थ का आहे? देशाची गाडी ओढणारे उद्योग -व्यवसायांचे इंजिन वेगाने पळत असताना तो अनुभव सर्वांना का येत नाही? अलीकडील संरचनात्मक बदलांत त्याचे गुपित दडले आहे.


  घरात खाणारी तोंडं वाढली की आईबापांनी कितीही कमावून आणले तरी ते खायलाही पुरत नाही. मग आईबाप मोठी मुले कमाईला कधी लागतील याची वाट पाहू लागतात. मोठी मुले कमाईला लागतात, जास्त पैसा घरात यायला लागतो, पण तरीही कुटुंबाचे भागत नाही, याचा मात्र काही उलगडा होत नाही. त्याचे खरे कारण असते ते आता खाण्याचा प्रश्न बाजूला पडलेला असतो आणि इतर भौतिक सुखे खुणावू लागलेली असतात. जे भाऊ कमावत असतात त्यांनी दीर्घकाळ भौतिक सुखांची वाट पाहिलेली असते. त्यामुळे त्यांना कमाईतील काही वाटा आपल्या सुखावर खर्च करावा वाटतो. पण कुटुंबाच्या गरजा त्यांना तसे करू देत नाही. त्यामुळे घरात दररोज कुरकूर सुरू होते. त्यात भर पडते ती घराबाहेरच्या जगात होणाऱ्या बदलांची. ते असे बदल असतात, ज्यात प्रत्येकाला भाग घ्यावा वाटत असतो. पण आर्थिक परिस्थिती तसे त्यांना करू देतेच असे होत नाही. त्यामुळे कुरबुरी आणखी वाढत जातात. कमावणाऱ्या भावांच्या मनात स्वतंत्र राहण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते. आईबापांना ते साहजिकच मान्य नसते त्यामुळे ते सर्वांना घराच्या एकूण कमाईतील योग्य वाटा देण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा टंचाईत कोणाचेच समाधान होत नाही. गृहकलह अपरिहार्य ठरतो.


  भारतातील कोणत्याही पारंपरिक मोठ्या कुटुंबात जे चित्र पाहायला मिळते तसेच चित्र आज आपल्या देशात पाहायला मिळते आहे. देशातील नागरिक कष्ट करत आहेत, घाम गाळत आहेत, त्याचा मोबदलाही त्यांना मिळतो आहे; पण कोणाचेच समाधान होत नाही. कारण त्या कमाईला इतक्या वाटा फुटल्या आहेत की कितीही मिळाले तरी ते आता पुरेनासे झाले आहे. भारताचा जीडीपी ८.२ टक्के दराने म्हणजे जगात सर्वाधिक दराने वाढतो आहे. म्हणजे देशातील उत्पादन आणि संपत्ती तर वाढते आहे, पण 'गृहकलह' वाढतच चालला आहे. या विकासाचे लाभ सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील हा वेगळा विषय आहे. पण सध्या जे होते आहे ते आधी समजून घेतले पाहिजे.


  देशात नोटबंदी, जीएसटी, रेरासारखे जे अनेक संरचनात्मक बदल गेल्या दोन-तीन वर्षांत झाले त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि समाज ढवळून निघाला. काहीतरी जुमला केल्याशिवाय या देशात यशस्वी होता येत नाही असाच समज होता आणि आजही आहे. मात्र जुमला करण्याशिवाय चांगले आर्थिक व्यवहार केले तरी भले होऊ शकण्याची शक्यता या संरचनात्मक बदलांनी वाढवली. नोटबंदीच्या वेळी असा जुमला अनेकांनी केलाच, पण त्यातून आपली सुटका नाही हे पाहिल्यावर त्यातील बहुतेकांनी इन्कमटॅक्स भरून नव्या मूळ प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. याचा सोपा अर्थ असा की, आपले उत्पन्न या देशात (कुटुंब) राहूनच वाढले आहे हे मान्य करून त्याचा जो वैधानिक वाटा असेल तो देशासाठी (कुटुंब) सरकारकडे (वडील) देऊन टाकला. या वर्षी ५.४२ कोटी म्हणजे गेल्या वर्षापेक्षा ७१ टक्के अधिक नागरिकांनी इन्कमटॅक्स रिटर्न भरला याचा अर्थ तो आहे. कुटुंबातील काहींचे चांगले चालले आहे, पण काही जण संकटात आहेत. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी हिस्सा वाढला पाहिजे. त्यासाठी देशात राहणाऱ्या प्रत्येकाला आपला हिस्सा द्यावाच लागतो. त्यालाच कर म्हणतात. त्यातून पब्लिक फायनान्स उभा राहतो, ज्यात आपला देश खूप मागे आहे. पण ताज्या आकडेवारीने तो काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता वाढली आहे. पब्लिक फायनान्सचाच वापर करून कुटुंबप्रमुख इतरांना मदत करत असतात.


  गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी असे सांगते की, गाडीचे सर्व डबे ओढून नेणारे जे इंजिन (उद्योग-व्यवसाय-शेती) आहे ते चांगले काम करते आहे. म्हणजे जीडीपीत सर्वात जास्त वाटा असणारे सेवा क्षेत्र वेगाने वाढते आहे. उत्पादन क्षेत्र चांगली कामगिरी करते आहे. जगात इंधन महाग होते आहे आणि ते घेण्यासाठी जे डॉलर लागतात ते निर्यातीतून चांगले मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलैत निर्यात १४.३ टक्क्यांनी वाढली आहे. विक्रमी रिमिटन्स आणि इतर काही प्रयत्नांनी परकीय चलनाचा साठा ४०१ अब्ज डॉलर म्हणजे चांगला आहे. जगात डॉलरच्या तुलनेत चलनाचे मूल्य घसरत आहे, पण त्यातही इतर देशांची जी स्थिती आहे त्यापेक्षा रुपया खूपच दम धरून आहे. मोटारींचा उद्योग हा विकासाचा एक निकष मानला जातो. त्यात सातत्याने वाढ होते आहे. ती वाढ सध्या ८ टक्के आहे. जीवनावश्यक वस्तूंचा खप आणि बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कसे आहे हे अर्थव्यवस्था हलती राहण्यासाठी फार आवश्यक असते. बँकेकडून होणारा पतपुरवठा सध्या १२.७ टक्क्यांनी वाढतो आहे, तर जीवनावश्यक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्या १० टक्क्यांपेक्षा अधिक नफ्यावर बसल्या आहेत. विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या २० टक्के वाढली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्या विस्तार करण्याचे धाडस करत आहेत. केवळ मेट्रोच नव्हे, पण छोट्या शहरांतून परदेशी जाणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या वाढते आहे. ज्या शेती क्षेत्रात सर्वाधिक रोजगार आहे, त्या क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणाऱ्या मान्सूनने बरी साथ दिली आहे. देशाचा गाडा चालण्यासाठी इंजिनने जेवढे खेचता येईल तेवढे हे इंजिन ओढताना दिसते आहे. तरी इंजिन ज्या वेगाने धावते आहे त्या वेगाने मागील डबे धावताना दिसत नाहीत ही खरी समस्या आहे.


  गेल्या काही वर्षांत जे अपरिहार्य आणि स्वागतार्ह बदल होत आहेत त्यात या समस्येचे मूळ अडकले आहे. नोटबंदीसारखे बदल बँकेच्या व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे ज्याची पत चांगली त्याला प्राधान्याने कर्जपुरवठा होणार आहे. डिजिटल व्यवहार करणारा रांग न लावता वेगाने पळतो आहे आणि आपली कामे फटाफट करून घेतो आहे. आपल्या गावात बसून तो दिल्लीत माल पुरवण्याचे टेंडर भरतो आहे. जीएसटी भरणाऱ्याला सुरुवातीला आलेले अडथळे सोडले तर ऑर्डर मिळू लागल्या आहेत. जीएसटीचा महसूल एक लाख कोटी रुपयांच्या घरात गेला हा त्याचाच पुरावा आहे. रेरा ही वस्तुस्थिती मान्य करून त्यामार्फत बांधकाम व्यावसायिकांनी कामे सुरू केली आहेत. जमिनी आणि घरांच्या किमती त्यामुळे स्थिरावल्या आहेत. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा क्षेत्र आणि निवृत्तिवेतन योजना क्षेत्रात फारच कमी भारतीय भाग घेत होते आणि त्यामुळे भारतीयांच्या क्रयशक्तीचा मलिदा परकीय घेत होते, पण आता भारतीय गुंतवणूकदारांचा त्यातील वाटा वाढल्याने नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. सेवा क्षेत्राची घौडदौड सुरू असल्याने त्यात खेळणारा पैसा वाढतच चालला आहे. समस्या ही आहे की, जे बदल झाले आहेत ते समजून घेऊन त्यात भाग घेणे ही अपरिहार्यता झाली आहे. हे असे बदल आहेत, जे टाळता येणारे नाहीत. पण अजूनही काहीतरी जुमला करून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो असे मानणारी आणि ज्यांना हे बदल अजूनही लक्षात येत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत अशी मंडळी या समस्येत अडकली आहेत. त्यांची त्यातून सुटका होणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया समजून घेणे एवढेच आता देशाच्या (कुटुंबाच्या) फायद्याचे आहे. त्यासाठी पब्लिक फायनान्स (कुटुंबासाठी वाटा) मजबूत करणे यापेक्षा दुसरा काही मार्ग आहे?

  - यमाजी मालकर , ज्येष्ठ पत्रकार
  ymalkar@gmail.com

Trending