आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : चोरावर मोर, शिवसेना थोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या कुख्यातीत काही कमी राहिली होती की काय म्हणून डाॅ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी चालवणारा संशयितही औरंगाबादचाच असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीच्या ठरावावर महापालिकेत वादंग झाले आणि महापालिकेतील अमानुष मारहाण साऱ्या देशाने पाहिली. त्याआधी मराठा आंदोलनाचे निमित्त साधून काही तरुणांनी आैद्योगिक वसाहतीत गुंडगिरी करून जगभरात औरंगाबादचे नाव बदनाम करून ठेवले आहेच. कचऱ्याच्या समस्येने झालेली बदनामी कमी म्हणून की काय देशातल्या राहण्यायोग्य शहरांच्या यादीत या शहराचा क्रमांक ९७ वा म्हणजे अगदीच शेवटचा लागला. त्याआधी काही भागात झालेली हिंदू, मुस्लिम गटातील दंगल असेल, कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद असतील किंवा क्रांतीच्या नावाने निघालेले वेगवेगळ्या समूहांचे मोर्चे असतील... हे शहर आणि परिसर अशांत असल्याचेच समोर येते आहे. हे असेच सुरू राहिले तर येत्या काही वर्षांत या शहरासमोर काय वाढून ठेवलेले असेल याची कल्पनाही करवत नाही. 


अलीकडेच वैभव राऊत नामक तरुणाला अटक झाल्यानंतर डाॅ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यातील शहरात राहणारा सचिन अंदुरे यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या असा सीबीआयचा दावा आहे. हा दावा कितपत खरा आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. याआधीही सीबीआयने असेच दावे करीत दोघांना अटक केली होती. त्यांना नंतर सोडून द्यावे लागले. औरंगाबादच्या तरुणाच्या बाबतीतही तसेच व्हावे आणि शोधपथकाने त्याला सोडून द्यावे असेच औरंगाबादच्या संवेदनशील नागरिकांना वाटते आहे. तसे झाले तर निदान या शहराच्या भवितव्यावरचा एक काळा डाग तरी जाईल एवढीच आशा त्यामागे आहे. अर्थात, डाॅ. दाभोलकरांसारख्या विज्ञानवादी माणसाच्या मारेकऱ्याला पकडण्यात लवकर यश यावे आणि त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असेच कोणत्याही विवेकी माणसाला वाटणार यात शंका नाही. पण तो जो कोणी मारेकरी असेल तो औरंगाबादचा निघू नये एवढीच अपेक्षा या शहराची चिंता वाटणारा संवेदनशील नागरिक करतो आहे. अर्थात, हा भावनिक विचार झाला. तो जो कोणी असेल तो सुटता कामा नये हेच खरे. 


महापालिका सभेत एमआयएमच्या एका नगरसेवकाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला आपला विरोध नोंदवावा, अशी मागणी करून सभागृहाच्या भावनांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला भाजपच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कसे तुडवले हेही किमान साऱ्या महाराष्ट्राने वारंवार पाहिले. भाजप नगरसेवकांची ती कृती तर निषेधार्ह आहेच, पण त्यानंतर शिवसेनेच्या महापौरांनी त्यावर कुरघोडी करण्याचे जे काही प्रयत्न सुरू केले आहेत ते अधिक चिंताजनक आहेत. कोणत्याही नगरसेवकाने एमआयएमच्या त्या नगरसेवकाला मारहाण केली नाही, असा दावा त्यांनी आता केला आहे. मारहाण केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि तसाच अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, असे त्यांनी बिनदिक्कतपणे सांगितले आहे. हे भाजपच्या नगरसेवकांविषयी महापौरांना फार प्रेम आहे म्हणून होत नाहीये. त्यामागे अत्यंत हीन प्रकारचे धार्मिक राजकारण आहे. बाबरी मशिदीचा संदर्भ देऊन ज्या मुस्लिम नगरसेवकाने श्रद्धांजली ठरावाला विरोध केला त्याला भाजपच्या नगरसेवकांनी 'ठोकशाही' करीत प्रचंड झोडपले. त्यानंतर त्या नगरसेवकांना 'धर्मरक्षक', 'धर्मवीर' अशा पदव्या देऊन त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट मोठ्या संख्येने सामाजिक माध्यमांमधून फिरायला लागल्या आहेत. हे काही सर्वसामान्य औरंगाबादकर करीत नाहीत. भाजपच्याच गोटातून हे मार्केटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. अशा प्रकारची ठोकशाही आणि तीही धर्माच्या नावाने करण्याचे पेटंट आतापर्यंत आपल्याकडेच होते. त्यावरच आपले सत्ताकारण इतकी वर्षे सुरू होते. ते भाजप खेचून घेते आहे अशी भीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे भाजपवर कुरघोडी करण्यासाठी या 'धर्मरक्षकां'चे आम्हीच खरे 'रक्षक' असल्याची प्रतिमा शिवसेनेच्या महापौरांना बनवायची आहे. त्यामुळेच त्या मुस्लिम नगरसेवकाला मारहाण झालीच नाही, असा अहवाल आपण पाठवणार असल्याची शेखी ते मिरवत आहेत. औरंगाबादच्या जनतेला हेच हवे आहे का? जर हेच हवे असेल तर या शहराची अधोगती ठरलेलीच आहे. जर हे मान्य नसेल तर आपला धर्म आणि भावना घरात सुरक्षित ठेवून औरंगाबादकरांनी यासंदर्भात विवेकी आवाज उठवला पाहिजे. लोकशाहीच्या अन् या शहराच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. असे या शहरात कधी तरी घडेल? 
- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद 

बातम्या आणखी आहेत...