Home | Editorial | Columns | column article about dhule nandurbar zp elections

प्रासंगिक : धुळे, नंदुरबारात जळगाव पॅटर्न

दिव्य मराठी | Update - Aug 29, 2018, 08:32 AM IST

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीपाठोपाठ राज्यातील जळगाव, सांगली- मिरज महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवल्यानंतर जलसंपदा मंत्री ग

  • column article about dhule nandurbar zp elections

    पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीपाठोपाठ राज्यातील जळगाव, सांगली- मिरज महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे काँग्रेसचे गड असलेल्या धुळे, नंदुरबार जि. प. च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणूकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच महाजन यांनी आपले लक्ष्य आता धुळे, नंदुरबार असल्याचे म्हटले आहे. जामनेर आणि जळगाव पॅटर्न या दोन्ही जिल्ह्यांत राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर भाजपने गतवर्षी झालेल्या राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडणुकीतही हाच पॅटर्न राबवला होता. त्यामुळेच त्यांना प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले आहे. निवडणुका जिंकण्याचा भाजपचा हा नवा पॅटर्न आहे तरी काय? असे लोकांना वाटत असेल, पण हा पॅटर्न म्हणजे भाजपचा खुला अजेंडा आहे आणि तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही पक्षातील विद्यमान नगरसेवक, महापौर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन देणे हा होय.


    सध्याच्या भाजपमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, पण भाजपच्या नव्या निकषात ते बसत नसतील तर त्यांना तिकीट दिले जात नाही. भले त्याने चाळीस वर्षे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले किंवा बैठकांच्या सतरंज्या उचलल्या असतील. सतरंज्या उचलल्या किंवा निव्वळ निष्ठा आहे म्हणून कार्यकर्त्याला तिकीट देत बसलो आणि निवडणुका लढवू लागलो तर पक्षाला मागचे दिवस पुन्हा यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे उमेदवार आयात करण्याचा पॅटर्न भाजपने राबवला आहे. क्षमता असलेले जे उमेदवार आमंत्रण दिल्यानंतरही प्रवेश करत नसतील तर अशा उमेदवारांचे धंदे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचा संदेशही पोहाेचवला जात असल्याचा अनुभव अनेकांना जामनेर आणि जळगावमध्ये आल्याचे काही जण खासगीत बोलताना सांगतात. भाजपच्या या नव्या पॅटर्नमुळे अनेक पक्षांमधील उमेदवारांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळेच समीकरण पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात राहिलेले आता एकाच पक्षाचे नेतृत्व करताना दिसत आहे. आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेली धुळे महापालिका अाणि धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजप इच्छुक आहे. तसे झाले तर या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतिहास घडेल. कारण या तिन्ही संस्थांच्या स्थापनेपासून फोडाफोडीच्या राजकारणाचा अपवाद वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली आहे. धुळे महापालिका सर्वाधिक जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात शह-काटशहाच्या राजकारणात स्थायी समिती सभापतिपद भाजपने मिळवले. त्यानंतर काही नगरसेवक हे भाजपच्या गळाला लागले आहेत. धुळ्यात शिवसेनेची परिस्थिती चांगली असूनही दोलायमान आहे. कारण एेनवेळेस या पक्षाचे लाभ-हानीचे गणित बिघडते आणि त्यांच्या जागा घटतात. त्यामुळे भाजप इथेही जळगावप्रमाणे इतिहास घडवण्यासाठी उतरणार आहे. भाजपला इथे स्थानिक वाद म्हणण्यापेक्षा मतभेदांचा फटका बसू शकतो. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यात मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग मंजुरीच्या श्रेयाचा वाद आहे. त्यात महाजनांना मध्यस्थी करावी लागेल, तेव्हाच कुठे यशाची हमी मिळू शकते, अन्यथा पॅटर्न फेल जाण्याची भीती भाजपला असणार आहे. महापालिकेप्रमाणेच धुळे, नंदुुरबार जिल्हा परिषदेतही काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिराज्य आहे. तेथेही भाजप जिंकली तर इतिहास घडेल, पण भाजपला जिंकणे इथे सोपे आहे का?


    या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे. भले विस्तीर्ण आणि मोठ्या मतदारसंघांमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेसही तेवढीच ताकद लावेल, त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची तालीमच नाही, तर कुणाचे किती आणि कसे पक्ष संघटन आहे हे तपासण्याचीही संधी असणार आहे. धुळे महापालिकेसह जिल्हा परिषदा जिंकण्यासाठी भाजपने मंत्री महाजनांवर जबाबदारी सोपवली असली तरी पॅटर्न राबवण्याआधीच त्यांना अंतर्गत कुरबुरी दूूूर कराव्या लागतील, नाही तर स्थानिक आमदार गोटे हे केव्हाही आपल्या लोकसंग्रामची मूठ आवळून आव्हान देऊ शकतात. मंत्री महाजनांच्या विजयाचे गमक विरोधकांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीही आपल्या आहे त्या नगरसेवकांना सांभाळण्याचा निश्चितच प्रयत्न करील, समजा नाही सांभाळले तर त्यांनाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल.
    - त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

Trending