आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : एकलहरा प्रकल्पाला घरघर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यासाठी एकेकाळी उपयुक्त ठरलेला एकलहरा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प वयोमानानुसार मरणासन्न अवस्थेत जाऊन ठेपला आहे. साधारणपणे १९७० मध्ये या केंद्राची स्थापना झाली. वयाची जवळपास पन्नाशी गाठलेल्या या प्रकल्पाने जसे प्रारंभीच्या काळात वैभवाचे दिवस पाहिले तद्वतच उतारवयात हलाखीचे दिवसदेखील अनुभवले. दिल्लीकडून रेल्वेने अथवा मुंबई-आग्रा महामार्गावरून चारचाकी वाहनातून नाशिकच्या वेशीत प्रवेश करताना डाव्या बाजूला दूरवर या विद्युत निर्मिती केंद्राच्या पाच चिमण्यांमधून धूर निघताना दिसत असे. त्याशिवाय रात्रीच्या गडद अंधारातूनही विद्युत रोषणाई केल्यागत लखलखणाऱ्या एकलहरा प्रकल्पाचे ठळक दर्शन होत असे.

 

ओझर सोडल्यानंतर आडगावच्या आसपास असलेल्या उंच भागावरून दिसणारा एकलहरा प्रकल्पाचा नजारा हा या केंद्राच्या वैभवाबरोबरच नाशिकची मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे होणाऱ्या वाटचालीची ओळख अधोरेखित करीत राहिला. आजवर या केंद्रात काम केलेले हजारो कर्मचारी, शेकडो अधिकारी वा अभियंते, प्रकल्पासाठी कोळसा पुरवणारे ठेकेदार, कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे पदाधिकारी हे सर्वजण एका अर्थाने साक्षीदार आहेत. येथे उत्पादित होणाऱ्या विजेमुळे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होत असतानाच पिढ्यान््पिढ्या अंधारात राहणाऱ्यांच्याही जीवनात उजेड निर्माण करण्याचे काम याच प्रकल्पाच्या माध्यमातून झाले. असा हा एकलहरा प्रकल्प प्रचंड अडचणीत सापडला आहे. ज्या पाच चिमण्या अर्थात युनिट प्रज्वलित राहिल्यामुळे त्यातून धूर ओकताना नजरेस पडत असे त्यापैकी दोन बंद पडल्या आहेत. सद्य:स्थितीत केवळ १४० मेगावॅट क्षमतेचे तीन युनिट कार्यान्वित आहेत. थोडक्यात काय तर आजच्या स्पर्धेच्या युगात हे उत्पादन निश्चितच पुरेसे म्हणता येणार नाही. 


वीज निर्मितीच्या क्षेत्रात असंख्य खासगी प्रकल्प उतरले असून कालौघात त्यांची वीज उत्पादन क्षमतादेखील लक्षणीय ठरते आहे. बाजारातील त्यांचे विजेचे दर अन्् त्या तुलनेत महानिर्मितीच्या दरामध्ये मोठी तफावत आढळते. सरकारी असो की निमसरकारी कंपन्या, या स्पर्धेच्या युगात कितपत टिकाव धरतील याबाबत साशंकता आहे. तशीच काहीशी अवस्था महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांची झाली आहे. महाराष्ट्रात कार्यरत विद्युत निर्मिती केंद्राचा विचार केला तरी एखादा अपवाद वगळता जवळपास सर्वच प्रकल्प समस्यांनी ग्रासलेले आहेत. विदर्भातील चंद्रपूर असाे की कोराडी, खापरखेडा, पारस या साऱ्या प्रकल्पांची स्थिती समाधानकारक नाही. 


सरकारच्या छत्रछायेखाली चालणाऱ्या प्रकल्पांना बुरे दिन तर खासगी विद्युत निर्मिती प्रकल्पांना अच्छे दिन आले आहेत. त्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील भुसावळनजीकच्या दीपनगर प्रकल्पाची अवस्थाही अन्य प्रकल्पागत आहे. त्यातील तीन चिमण्यांपैकी दोन केव्हाच बंद पडल्या आहेत. एकलहरा केंद्राच्या पाचपैकी दोन चिमण्या बंद पडल्या आहेत. राज्यातील एकूणच वीज निर्मिती केंद्रांची स्थिती नाजूक म्हणायला हवी. एकलहरा केंद्रापुरता विचार केला तर हा प्रकल्प अलीकडे वीज निर्मितीपेक्षाही राख उत्पादक म्हणूनच अधिक ओळखला जाऊ लागला आहे. प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाचा तुटवडा ही एक समस्या, तर वीज निर्मितीनंतर सुमारे सव्वा लाख टन बाहेर पडणारी राख हा गंभीर मुद्दा सध्या या प्रकल्पाला भेडसावतो आहे. राखेपासून बांधकामाच्या वापरातील विटा अथवा सिमेंट तयार करण्याचा प्रयोग सुरू आहे. त्यातूनच राखेचे अर्थकारण अन्् त्या अनुषंगाने कथित माफिया उदयास आले आहेत. तथापि, राखेमुळे परिसरात फैलावणाऱ्या प्रदूषणाने रहिवास क्षेत्रातील लोक तसेच गोदावरीच्या काठावरील शेतकरी मंडळी त्रासली आहे. प्रदूषणाच्या विरोधात याअगोदरही स्थानिक शेतकऱ्यांनी प्रचंड ओरड केली. 


एकलहऱ्याच्या पंचक्रोशीतील शेती राखेच्या कारणामुळे नापिकीकडे वाटचाल करीत असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या. एकेकाळी ज्या द्राक्षबागांमधून लाखोंचे उत्पादन मिळत असे त्याच बागा केवळ राखेमुळे जायबंदी झाल्याचीही काही उदाहरणे पुढे आली आहेत. 


एकलहरा केंद्राचे आयुर्मान तसेच त्यातून बाहेर पडणाऱ्या लाखो टन राखेमुळे शेती तसेच गोदावरीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण या प्रमुख कारणांस्तव हा प्रकल्प मरणासन्नावस्थेत पोहोचला आहे. प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करायचे म्हटले तरी सरकारला त्याच्या दुरुस्तीवर काहीशे कोटी खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा उभा राहू शकेल की नाही याबाबत शंकाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक खासदार व आमदारांनी एकलहरा प्रकल्प बचावची हाक दिली असली तरी त्यातील हवा केव्हाच निघून गेली आहे. 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...