आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : नाथाभाऊ पुढे या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी जळगावात येऊन गेले. महसूल, महापालिका, पोलिस विभागाचा आढावा घेतला. जेथे निधीची गरज आहे, त्याबाबत तरतुदी करण्याचे आश्वासन दिले. रखडलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचे अौपचारिक उद‌्घाटन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार सोहळाही त्यांच्या हस्ते पार पडला. जळगाव शहर विकासाची जबाबदारी ज्या महापालिकेवर आहे, त्या महापालिकेवर ७०० कोटी रुपयांचा कर्जाचा डोलारा आहे. हुडकोच्या कर्जाचे हप्ते फेडताना तिची वाटच लागली आहे. पालिकेला भाडे रुपात मिळणारे मुख्य उत्पन्नाचे जे साधन आहे, ते म्हणजे हजारोच्या संख्येने असलेले गाळे. गाळे कराराचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. सर्वाेच्च न्यायालयाने निर्देशही दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे तो प्रश्न अजून सुटलेला नाही. पैसेच नाही म्हटल्यावर शहरात विकासाची कामे रखडलेली आहेत. मूलभूत सोयीसुविधांचीही वानवा आहे. विकासाच्या बाबतीत शहर भकास झाले आहे. 


जळगाव शहराचे आमदार भाजपचे आहेत. आता महापालिकाही जळगावकरांनी त्यांच्याच स्वाधीन केली आहे. वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्री महाजनांनी विकासाचे स्वप्न दाखवले आहे. सहा महिन्यांत शहराचा चेहरा बदलवणार, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. निवडणूक होऊन महिना उलटला. नवे महापौर विराजमान झाले; पण ठोस अशा हालचाली दिसेनात. दुसरीकडे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सरकारवर नाराजी कायम आहे. त्यांची नाराजी काही महिन्यांपूर्वी होती ती त्यांना मंत्रिपदावरून हटवल्याची. अलीकडे त्यांच्या नाराजीचा सूर बदललेला आहे. आता त्यांची नाराजी जिल्ह्यात आणि खान्देशात होत नसलेल्या विकास कामांबाबत अाहे. ते वारंवार सांगतात मी मंत्री असतानाचे शेती, शेतकरी आणि सिंचन विकासाचे प्रश्न असो की कृषी विद्यापीठ. सर्वच प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. मार्गी लागणाऱ्या कामांनाही ब्रेक लावला गेला. काही दिवसांपूर्वीच फैजपूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासमोर आपली खदखद व्यक्त करत जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. खडसेंच्या म्हणण्याचा 'अर्थ' अर्थमंत्री असलेल्या मुनगंटीवारांना कळला आणि त्यांनी लगेच मंत्री महाजनांकडे बोट दाखवला. तुमच्या जिल्ह्याचे मंत्री सक्षम आहेत तसेच ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे तुमची एकही फाइल थांबायला नको म्हणून चिमटा काढला. 


खडसे जेथे जातात तेथे ते आपल्या शैलीत बोलतात आणि त्यांचा निशाणा थेट सरकारवर असतो. खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी कधी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील फुंकर घालतात तर कधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहानुभूती दाखवतात. गिरीश महाजनही खडसे आमचे नेते आहेत, असे सांगून वेळ मारून नेतात. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्या की, खडसेंचे पुनरागमन होणार का? म्हणून चर्चा सुरू होते. त्यानंतर विस्तार लांबतो. 

अलीकडे पुन्हा नवरात्राेत्सवात मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. खांदेपालटाचीही चर्चा आहे. पुन्हा खडसेंचे नाव चर्चेत येणार. खरंच विस्तार होणार का? याबद्दल मुख्यमंत्री चकार शब्दही काढत नाहीत. तथापि, खडसे जे बोलतात तेवढा जळगाव जिल्ह्यात विकासाचा अनुशेष आहे का? याचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करत प्रलंबित कामांचा आढावा घेतला. नाट्यमंदिर आणि विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याच्या कार्यक्रमात खडसेंना मुख्यमंत्र्यांनी सन्मानाची वागणूक दिली. नाट्यमंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात तर मागे असलेल्या खडसेंना पुढे बोलावून फीत कापली.


 'नाथाभाऊ मागे नका, पुढे या' म्हणत त्यांनी खडसेंना सोबत घेतले. एरवी खडसे असतील त्या बैठका, कार्यक्रम टाळणाऱ्या मंत्री महाजनांनी खडसेंच्या हाताला हात लावून नाट्यमंदिरात दीपप्रज्वलन केले. जळगावच्या नाट्यगृहात उपस्थितांनी हे राजकीय नाट्य पाहिले आणि त्याची समिक्षा करणे ही सुरू केले आहे. नाट्यमंदिराच्या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या कार्यक्रमाला स्वत:च्या गाडीने निघालेल्या खडसेंना मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीतून नेले. या गाडीत जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे देखील होते. त्यामुळे नाट्यमंदिर ते विद्यापीठ या सहा किलोमीटरच्या प्रवासात नव्या राजकीय समीकरणावर निश्चितच बोलणे झाले असणार. कारण पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, असे मोदींसारखे ठामपणे सांगणाऱ्या फडणवीसांना खडसे यांना मागे ठेऊन चालणार नाही. सत्तेतून बाहेर काढल्यानंतर आता कार्यक्रमात का होईना, नाथाभाऊ पुढे या, असे म्हणण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, असे म्हणण्याला निश्चितच वाव अाहे. 
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...