आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅक मासारखा उद्योजक भविष्यात होणे नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग... अलिबाबा स्थापन झाली तेव्हा चीनमध्ये इंटरनेट बाल्यावस्थेत होते. अमेरिकेत शेकड्यामागे ३६ जणांकडे इंटरनेट होते, तर चीनमध्ये केवळ एकाकडे होते. 


जगातील बलाढ्य कंपनी अॅमेझॉनसोबत तुलना करता येणारी चिनी कंपनी अलिबाबा, चीनच्या भांडवलशाहीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. १९९९मध्ये एका छोट्याशा घरात जॅक मा यांनी ही ई-कॉमर्स कंपनी सुरू केली आणि तिने चीनच्या आर्थिक विकासात स्वत:चे एक अनन्यसाधारण स्थान तयार केले. गेल्या आठवड्यात अलिबाबाच्या संचालकपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा जॅक मा यांनी केली. आपले पुढील आयुष्य समाजसेवेला देण्याचे त्यांनी ठरवल्याने खळबळ माजली. जॅक मा यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित केला जातोय की, जॅक मासारखा बडा भांडवलदार चीनमध्ये पुन्हा जन्मास येईल का? या प्रश्नाचे उत्तर जवळपास 'नाही' असे द्यावे लागते. 


या प्रश्नाची काही चांगली कारणे आहेत. चीनचा उदय पुन्हा पहिल्यासारखा होणार नाही. जॅक मा यांनी अलिबाबा स्थापन केली तेव्हा चीन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेत सामील होण्याच्या तयारीत होता. चीनचे दरडोई उत्पन्न तीन हजार डॉलरच्या खाली होते. (आता ते सहापट झाले आहे). चीनमध्ये इंटरनेट बाल्यावस्थेत होते. त्या वेळी चिनी समाजात एक टक्का लोकांकडे इंटरनेट होते. पण लोकसंख्यावाढीबरोबर इंटरनेटचा प्रसार होऊ लागला तशी चीनची अर्थव्यवस्था विस्तारत गेली. बघताबघता अलिबाबाच्या प्लॅटफॉर्मवर हजारो छोट्या कंपन्या वाढत गेल्या. सध्या या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर रोज १० लाख व्यापारी उलाढाल करत असतात. अलिबाबामुळे चीनमध्ये लॉजिस्टिक व वित्तीय सेवांबरोबर रिटेलिंगचे चित्र बदलून गेले. गेल्या वर्षी सर्वात कमी विक्रीचा दिवस मानला गेलेल्या 'सिंगल्स डे'मध्ये अलिबाबाने २५ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. 


अलिबाबासारख्या डिजिटल कंपन्यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेचे केवळ रुपडे नव्हे, तर त्यांची संरचनाही बदलण्यास हातभार लावला आहे. चीनचे त्याने राजकारणही बदलले आहे. चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने जॅक मा यांच्याशी चतुराईने जुळवून घेतले. काही चिनी नेते मा यांच्याजवळ गेले, तर काहींनी लांबच राहणे पसंत केले. 'सरकारवर प्रेम करा, पण लग्न करू नका', असे मत एकदा जॅक मा यांनी व्यक्त केले होते. अलिबाबा त्यामुळे वेगाने भरभराटीस गेली. पण अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अंकुशाखाली चीन येत गेला तसे सरकार व अलिबाबा यांच्यामध्ये शत्रुत्व वाढत गेले. मोठ्या आर्थिक व्यवहारांवर सरकारकडून लगाम आणले जाऊ लागले. २०१२मध्ये 'बायटेंडस' या कंपनीला एक अॅप मागे घेण्यास सांगितले गेले. कंपनीच्या संचालकाला सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास सांगण्यात आले. या काळात सरकारी बँकांशी स्पर्धा करण्याची इच्छा असणाऱ्या 'अँट'वर (ANT) कठोर नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली. 


तरीही चीन आपल्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना जगात अग्रगण्य स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करत असतो. त्याचा एक भाग म्हणून अलिबाबाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शहर सुधारणा कार्यक्रमाचे काम देण्यात आले. ज्या व्हेंचर कॅपिटल संस्थांना सरकारचे पाठबळ आहे त्या कंपन्यांना अशा क्षेत्रात काम करण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत अशी अफवा पसरली की, सरकारी योजनांच्या माध्यमातून सरकार बड्या टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या संचालक मंडळामध्ये घुसखोरी करत आहे. या अफवेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संशय पसरत गेला व अमेरिका अधिक सतर्क झाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये जॅक मा पहिले होते. यावर्षी अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत 'अँट'ला 'मनीग्राम' या पैसे हस्तांतरण करणाऱ्या कंपनीला परवानगी नाकारली. 


जॅक मा हे बाजारपेठ खुली असावी, या विचाराचे आहेत व ती भूमिका आता त्यांच्या निवृत्तीमुळे मागे पडू शकते. त्यांच्या निवृत्तीमुळे चीनमधील उद्यमशीलता संपेल असे नाही. पण जॅक मा यांचा वारसा, त्यांनी निर्माण केलेल्या उद्योगसंस्कृतीला एक वेगळे वळण मिळेल. जॅक मा यांचा करिष्मा व त्यांचे अनेक उद्योजकांना दिलेले अनौपचारिक सल्ले याने त्यांना चीनमध्ये एका दैवतासमान मानले जाते. व्हेंचर कॅपिटलिस्ट बायोटेकपासून इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवत आहेत. छोट्या कंपन्या नफ्यात आहेत. 


जॅक मा यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेत उलथापालथ होईल, असे काम केले होते, तसे २० वर्षांपूर्वीचे वातावरण चीनमध्ये नाही. आता चीनमध्ये सत्ताधारी रोज नवनव्या अडचणी उभ्या करत आहेत. कम्युनिस्ट पार्टीला उद्योगांचा विकास वेगाने व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे असे वाटते की, जॅक मा यांच्यासारखा निर्भीड व उत्साही व्यापारी पुन्हा जन्मास येण्याची शक्यता नाही. © 2018 The Economist Newspaper Limited. All rights reserved. 
 

बातम्या आणखी आहेत...