आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : गणेशोत्सवातील जनजागृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेश चतुर्थीचा मुहूर्त दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या देशपातळीवर उत्साहाचे वातावरण आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोपाळकाला अन्् दहीहंडीसारख्या भरगच्च कार्यक्रमांमुळे अगोदरच वातावरण मंतरलेले आहे. या दोन्ही सणांना आध्यात्मिक वा धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे श्रद्धा हा त्याचा मूळ गाभा राहिला आहे. तो असायलाच हवा, किंबहुना त्यावरच तो लक्ष्यकेंद्री राहिला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठा गाजावाजा करत येत आहे. यंदाच्या अन्् गत गणेशोत्सवात जो काही बदल दिसतो आहे, तो खरोखरीच दिलासादायक वा सकारात्मक असा म्हणता येऊ शकेल. लोक परिवर्तनाचा स्वीकार करतात. पण त्याचे माध्यम काय असू शकेल वा तो लोकांच्या कलाने जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा मार्ग कोणता यावर बरेच काही अवलंबून असते. ज्या काही रूढी-परंपरा आहेत, त्यात बदलाची चिन्हे दिसू लागली अन्् तो समजा जीवनोपयोगी असेल तर लोक त्या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. 


प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या अढळ श्रद्धाळू समाजापुढे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही कल्पना जेव्हा मांडली गेली अन्् त्यासाठी शाडू मातीच्या गणेशबाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा विचार पुढे येऊ लागला तेव्हा खरं तर ही बाब समाजमनाविरुद्ध होती. त्या कल्पनेला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून प्रचंड विरोध झाला. शाडू माती बाप्पाबरोबरच गणेश मूर्तीदानाला कडाडून विरोध केला गेला. विरोधाची धार लक्षात घेता हा विचार म्हणा की परिवर्तनाचे हे पाऊल जागीच थांबते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली होती. पण, गेल्या दशकभरात ज्या वेगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार समाजाने स्वीकारला, अंगीकारला, एवढेच काय, प्रत्यक्ष कृतीत उतरवला तो पाहता परिवर्तन लोकांच्या पचनी पडले. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, आज देशभर लोकांच्या पुढाकाराने ठिकठिकाणी पार पडणाऱ्या शाडू मातीच्या कार्यशाळा. महाराष्ट्राचा विचार करता लोकमान्य िटळकांच्या पुढाकाराने गणेशोत्सव सुरू झाला. याच भूमीत तो सुरुवातीच्या काळात रुजला अन्् कालौघात देशभर तसेच पाठोपाठ जगभर फोफावला. 


कोणत्याही कार्याचा शुभारंभ 'आधी वंदू तूज मोरया'ने होऊ लागला. या पार्श्वभूमीवर गणपतीबाप्पाची मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची हा मुद्दा श्रद्धेच्या आड येणारा ठरला असता. परंतु पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यांशी जेव्हा ही बाब जोडली गेली तेव्हा गणेशभक्तांनी बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परिवर्तन हे जगाच्या कल्याणासाठी, समाजाच्या भल्यासाठी अन्् भावी पिढीच्या आरोग्यासाठी आहे, हे पटल्यानंतर परिवर्तनाचा वेग वाढत चालला आहे. भास्कर समूहाने 'दिव्य मराठी'च्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या सात वर्षांपासून शाडू मातीचे बाप्पा ही मोहीम राबवण्याकामी पुढाकार घेतला. त्यास गणेशभक्तांचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद लाभतो आहे. 


लायन्स क्लबने एक अभिनव योजना राबवताना शाडू मातीच्या साडेतीनशे मूर्तींचा एक स्टॉल लावला. त्यातून शाडू मातीच्या मूर्तीची निवड करायची अन्् यथाशक्ती पेटीत दान टाकायचे. एकट्या नाशिकमध्ये गेल्या पंधरवड्यात शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या दीडशेहून अधिक कार्यशाळा झाल्या. सामाजिक-सेवाभावी संस्था, नगरसेवक, पदाधिकारी यांनी याकामी पुढाकार घेतला. मराठवाड्यातही असाच कित्ता गिरवला गेला. उस्मानाबादेत मोठी कार्यशाळा झाली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याची प्रतिज्ञा नाशिकच्या शेकडो विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतली. शाडू माती तसेच पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती यांच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. या एका कारणामुळे सुरुवातीला गणेशभक्तांकडून पीओपीच्या मूर्तीला मागणी असायची. त्याशिवाय या मूर्तीची उंची, सुबकता, आकर्षकपणा या बाबींनाही अग्रकम दिला जात असे. पण जसे पर्यावरणपूरकतेचा बदल रुजत गेला तशी शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. 


मूर्तिकारांकडून प्राप्त माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी शाडू मातीच्या साधारणपणे दीड हजार मूर्तींची मागणी होती, त्यात यावर्षी कित्येक पटींनी भर पडली असून जवळपास ३० हजारांच्या आसपास पोहोचली आहे. बदलाचे वारे वाहू लागल्यानंतर प्रशासनानेही समाजमनाचा विचार करता त्या दिशेने चालायला हवे. त्यानुसार महापालिकेने कृत्रिम तलाव निर्माण करून विसर्जन तसेच मूर्तीदान करण्यासाठीचे केंद्र कार्यान्वित करण्याची घेतलेली भूमिका परिवर्तनाला पूरक ठरली आहे. एकूणात काय तर यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांकरवी शाडू मातीच्या बाप्पाला वाढणारी मागणी हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपाेषक वातावरण निर्मितीस पूरक संदेश म्हणता येईल. गणपती बाप्पा मोरया... 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 
 

बातम्या आणखी आहेत...