आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : यापेक्षा लाजिरवाणे काय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धीच्या देवतेला सार्वजनिक पातळीवर आणून समाजोपयोगी उपक्रम राबवत लोकमान्यांनी लोकोत्सवाला सुरुवात केली. शतकाची परंपरा असलेला गणेशोत्सव हा त्याचाच एक भाग. टिळकांनी पुण्यातून गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे पुणे आणि गणेशोत्सव हा उभ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आदराचे व श्रद्धेचे स्थान बनले. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी आजही लोक देशभरातून तेथे जमतात. गणेश मंडळांमार्फत सुरुवातीच्या काळात वैचारिक मंथन व्हावे म्हणून व्याख्याने, करमणुकीसाठी संगीताच्या मैफली रंगत. वाईट रूढी, परंपरा मोडीत निघाव्यात म्हणून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी भारुडासारख्या लोकगीतांचे कार्यक्रमही व्हायचे. अशा कार्यक्रमांसाठी आबालवृद्ध आणि महिलांना घराबाहेर पडून आचार, विचारांच्या दोन गोष्टी पदरात पाडून घेता येत होत्या. 


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा हेतू संपत गेला. काही बोटावर मोजण्याइतकी मंडळे आणि संस्थांनी तो टिकवून ठेेवला आहे. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना तो सर्वदूर साजरा होऊ लागल्यामुळे लोकमान्यांच्या विचारांचा तो आदरच मानला पाहिजे. मात्र, त्यांच्या हेतूंची विटंबना होताना दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना सर्वत्र प्रचंड गोंधळ आणि गोंगाट. डीजे, डाॅल्बीच्या आवाजाच्या भीतीमुळे लोक मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्यावर येण्याएेवजी दारे, खिडक्या लावून घरात बसणे पसंत करतात. डीजेची किमान मर्यादादेखील जमीन हादरवणारी आणि जुन्या घरांना तडे जातील एवढ्या शक्तीची असतात. डीजे म्हणजे ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडणारे वाद्य मानले गेले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने यावर्षी गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवता येणार नाही, असे आदेश काढले. पोलिसांनीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डीजे चालकांची गोदामे सील केली. 

न्यायालयाने आदेश देऊनही प्रतिष्ठेचा मुद्दा करत काही समाजकारणी कम आणि राजकारणी जादा आणि सोबत गणेश मंडळाचे पदाधिकारी म्हणवल्या जाणाऱ्यांनी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात चांगलाच थयथयाट केला. थयथयाट करणाऱ्यांना यावर्षी विसर्जन मिरवणुकीत उन्माद उतरवण्याची आणि आपले राजकीय वर्चस्व आवाजाची मर्यादा ओलांडून दाखवण्याची संधी मिळणार नाही, याचे अधिक शल्य होते. पर्यावरण, प्रदूषण, समाजहितविरोधी गोष्टींमध्ये न्यायालयालाच लक्ष घालावे लागत आहे. तेव्हाच कुठे अशा गोष्टींना चाप बसतो. आता तर न्यायालयाला ललकारण्याची भाषाही मुजोर राजकारणी करत असतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत विसर्जन मिरवणुकांसाठी प्रख्यात असलेल्या अनेक शहरांमधील गणेश मंडळांनी डीजेला नकार देत पारंपरिक वाद्यात गुलालाएेवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला. 


न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत शांततेत आणि आनंदात विसर्जन मिरवणुका पार पाडणाऱ्या शहरांमध्ये औरंगाबाद, धुळे, नंदुरबार आणि जळगावने आघाडी घेतली. कचऱ्यासाठी दंगली घडलेल्या अौरंगाबादमध्ये ध्वनिप्रदूषण तर झालेच नाही, सोबत निर्माल्य उचलण्यासाठीही यंत्रणा होती, ही विशेष कौतुकाची बाब ठरली. मात्र,ज्या शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्या पुण्यासारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या शहरातील काही मंडळांनीच आधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात थयथयाट केला. एवढेच नाही, तर पोलिसी कारवाईचा निषेध म्हणून विसर्जन मिरवणुकांवर बहिष्कार घालण्याची धमकीही दिली. पुण्यापाठोपाठ अहमदनगर, कोल्हापूर या शहरांमध्येही विसर्जन मिरवणुकांवर बहिष्कार घालण्याच्या घटना केवळ कर्कश आवाजात उन्माद करू दिला नाही म्हणून घडल्या. 


साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनीही डीजे वाजवणारच, म्हणून पोलिस आणि न्यायालयाला आव्हान दिले होते. त्यामुळे पोलिसांनी साताऱ्यात तगडा बंदोबस्त ठेेवला होता. पण राजेंच्या डीजेचा आवाज तर आलाच नाही, पण राजेही मिरवणुकीत दिसले नाहीत. अखेर कायद्याचा धाक तर आहेच. नाशकातही कुठेच डीजे वाजला नाही, पण तपोवन मित्रमंडळाने आदेशाची पायमल्ली केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ही पायमल्ली सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक सानपांकडून झाली. त्यांनी आपल्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत वाजवलेला डीजे व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. वास्तविक सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू समाजकारणी म्हणवून घेणारे राजकीय नेते आणि सर्वच राजकीय पक्षांचे बडे पदाधिकारी यांना चांगलाच ठाऊक आहे. तरीही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांना आवर घालू शकत नाही; यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते. 
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव 

 

बातम्या आणखी आहेत...