आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : मंडपावरून धुमशान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्सवाचे दिवस जवळ येऊ लागले की रस्त्यावरील मंडप आणि ध्वनिप्रदूषण या दोन मुद्द्यांवरून उत्सव मंडळांचे कार्यकर्ते, सार्वजनिक हिताच्या विरोधातील उत्सवातले पायंडे, त्याविरोधात झगडणारे काही लोक आणि राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांमध्ये वाद-प्रतिवादाचे, न्यायालयीन तंबीचे, आदेशांचे मोहोळ उठते. हा नेहमीचा सार्वत्रिक अनुभव बनला आहे. यंदाही गणेशाेत्सवास दीड महिना अवधी असतानाच सार्वजनिक हितरक्षकांनी उत्सवातील या गोष्टींच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या तंबीमुळे विशेषत: मुंबईतील मंडळांचे नेते, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. वास्तविक २०१५ च्या अाधीपासूनच या मुद्द्यांना धरून दोन्ही बाजूंमधला वाद न्यायालय स्तरावर गाजतो आहे. प्रत्येक वेळी न्यायालयाने सार्वजनिक उत्सवातील अतिरेकी उत्साहाला आळा घालणारे आदेश दिले आहेत. थोड्याफार प्रमाणात त्याची अंमलबजावणी होते. काही ठिकाणी याबाबत होणाऱ्या प्रशासकीय कारवाईला फाटा दिला जातो. ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणली गेली. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासारख्या महापालिकांना मागील आदेशांच्या अमलाबाबत काय झाले, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. तंबी देताना कडक शब्द वापरले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी सैल व सोयीस्कर होते. त्यामुळेच न्यायालयाने यंदा कठोर आदेश दिले आहेत. सरकारी यंत्रणा, पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे अधिकारी मंडपाचा आकार आणि ध्वनिप्रदूषण या संदर्भात कारवाई करणार नाहीत, अशांच्या विरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई केली जाईल, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. गणेशोत्सव १३ सप्टेंबरला सुरू होतोय. त्याच्या आदल्या दिवशी १२ सप्टेंबरला उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अंमल काय झाला? याचा अहवाल अधिकाऱ्यांना मांडायचा आहे. 


सार्वजनिक उत्सवातील अतिरेकी आिण उपद्रवी उत्साहाला आळा हा बसलाच पािहजे. मग तो उत्सव कोणताही असो. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी उपद्रवाची चर्चा होते. याचा अर्थ असा नाही की, बाकीचे सारेच उत्सव न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत होतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजन्मोत्सव, आंबेडकर जयंती उत्सव या साऱ्या दिवसांमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन काही मंडळांकडून सातत्याने होत असते. चौकटीत राहून चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करणारी मंडळे आहेत. अलीकडे मुस्लिम समाजातील रस्त्यावर साजरे होणारे उत्सवही नियमांच्या चौकटीच्या पलीकडे जातात. पण एकदा उत्सव पार पडला की पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणा त्याविरोधात कारवाई करायला उत्सुक नसतात. झालीच तर जुजबी स्वरूपात कारवाई होते. त्यामुळेच न्यायालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व संबंधितांना कडक तंबी दिली आहे. रस्त्यावर मंडप घालूच नये, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. मंडपाची उंची, वाहतुकीसाठी मोकळी सोडायची जागा याच्या मर्यादेत राहून मंडप घालण्यास न्यायालयाचाही विरोध नाही. पण त्याचे उल्लंघन करून रस्त्यावर बेकायदा मंडप घातल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालय अवमानाची कारवाई करण्याची समज न्यायमूर्तींनी दिली आहे. 


गतवर्षी मंडपांची पाहणी करण्यासाठी प्रत्येक शहरात समिती नेमली होती. त्यातूनही फारसे काही साध्य झाले नव्हते. पावसामुळे रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे सर्वच शहरांमधील लोक हैराण झाले आहेत. त्यात आता मंडपांसाठी मारलेल्या खड्ड्यांची भर पडेल. फारच कमी मंडळे अशी आहेत, की जी मंडपासाठी खोदलेले खड्डे स्वत:हून बुजवतात. बहुतांश मंडळांना त्याचे सोयरसुतक नसते. लोकवर्गणीच्या पैशातून खड्डे मारायचे आणि लोकांच्याच खिशातून कररूपाने गोळा झालेल्या पैशातून ते बुजवायचे. पुन्हा त्याचे टेंडर कोणाला तरी मिळणार, या सगळ्याची झळ पोहोचते ती सामान्यांना. ध्वनिप्रदूषणामुळे काही लोकांना तात्पुरते स्थलांतर करावे लागते. न्यायालयाच्या प्रतिबंधानंतर मुंबईत सुरू झालेल्या वादात राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधात उडी घेतली. अर्थात सध्या अशा गोष्टींसाठी ते निमित्ताच्या शोधातच असतात. ते काही उत्सव मंडळांच्या भेटीसाठीही गेले हेाते. दहीहंडीच्या वेळेस गेल्या दोन-तीन वर्षांत न्यायालय स्तरावर मोठा वाद-प्रतिवाद झाला होता. यंदा २ सप्टेंबरच्या दहीहंडीनंतर दहा दिवसांनीच गणेशोत्सव येतो आहे. अितशय उत्साहाचे पर्व या काळात असते. मुंबई, पुण्याशिवाय अन्य शहरांतून त्याच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीला वेग यायचा आहे. दोन्ही उत्सव शांततेत व आनंदात साजरे होण्यासाठी सर्व संंबंधितांकडून संयमी संवादाची गरज आहे. तरच त्यातून सगळ्यांना आनंद घेता येईल. 
‑ संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...