आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : पाऊस आला धावून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यासह राज्यातील इतर काही भागाला दुष्काळी परिस्थितीचा कायम सामना करावा लागत आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशी स्थिती त्या त्या भागाने अनुभवली आहे. गतवर्षी निसर्गाच्या साथीमुळे विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली नाही. यावर्षी नेमके काय होणार, हा प्रश्न सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना होता. यंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मान्सूनचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे चांगल्या मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर त्या पद्धतीचे नियोजन केले जाते. साधारण मे महिन्यात मान्सूनच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष असते. या अंदाजावर पुढच्या वर्षभराचे पीकपाण्याचे नियोजन केले जाते. 


यावर्षी जून महिन्यात कमी म्हणजे सरासरीच्या १७ टक्केच पाऊस झाला. अधूनमधून काही भागात बरसत राहिलेल्या पावसाने त्या-त्या भागात पिकांना मदत केली. यावर्षी चांगला पाऊसकाळ थोडा उशिराने आहे हे जाहीर झाल्यावर ही काही भागात आधीच पेरण्या केल्या गेल्या तशा काही ठिकाणी अनेकांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. नंतर कमी-जास्त प्रमाणात होत गेलेल्या पावसांनी पिकांना थोडेफार तारले, पण जुलैच्या मध्यानंतर पावसाने मोठी दडी मारली. आणि अनेक भागांतील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती जाहीर करण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तब्बल २८ दिवसांच्या खंडानंतर राज्यात गुरुवारी सर्वदूर पाऊस झाला. 


खरिपाचे हातचे पीक जाते की काय, अशा चिंतेत असलेला सर्वसामान्य शेतकरी त्यामुळे थोडा सुखावला आहे. त्याचबरोबर अर्धा पावसाळा संपत आला तरी कोरडेच दिसणारे नदी, नाले, ओढे तसेच छोटी-मोठी धरणे तसेच पाणलोट क्षेत्र या पावसाने भरू लागल्याचे दिसू लागले आहेत. भविष्यातील पाणीटंचाईची मोठी भीती त्यामुळे राहिलेली नाही. अनेक भागात तर अतिवृष्टी झाली आहे. काही धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. पाणी आणि पिकांसाठी सध्या तरी समाधानकारक स्थिती आहे. पीकपाण्याच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती असली तरी या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. दरड, भिंत कोसळणे, घरं पडणे घरे वाहून जाणे अशा अनेक घटनांत करोडोंचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच नदी-नाल्याला आलेल्या पुरात अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. एकट्या नवापूर तालुक्यात हाहाकार माजला आहे. तेथे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. काही माणसांसह पशुधन तसेच गाड्या वाहून गेल्या आहेत. मार्गावर मोठा जाम झाल्यामुळे अनेकांचे हाल झाले. यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या भीतीने अनेक ठिकाणी लोकांनी रात्र जागून काढली. वऱ्हाडात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पाऊस नाही म्हणून चिंतातुर असलेल्या नागरिक ग्रामस्थांना अनेक ठिकाणी दिलासा, तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या फटक्याचा सामना करावा लागला. 


सबंध देशातच पर्जन्यमानाची स्थिती संमिश्र आहे. अनेक राज्यांत पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे, तर अनेक राज्यांत चांगल्या पावसाच्या आगमनाची अपेक्षा आहे. केरळमध्ये महापुरात आतापर्यंत १६७ पेक्षा जास्त शहरवासीयांना जीव गमावावा लागला आहे. आतापर्यंत तेथे पिके तसेच वित्तहानी पकडता ८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लष्कर हवाई आणि नौदलासह तटरक्षक दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. प्रत्येक वर्षीचा मान्सून वेगळा असतो त्याचे आगमन, त्याचे पडणारे खंड, बदलणारे स्वरूप, पावसाचे प्रमाण, आगमनाच्या वेळेचे स्वरूप, परतीचा मान्सून त्याचा अपेक्षित कालावधी, त्यात येणारी विविधता हे मान्सूनचे वेगळेपण दर्शवणारे घटक मानण्यात येतात. हवेचा दाब हे पावसाच्या वितरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. 


मान्सूनपूर्व तापमानाची स्थिती ही भविष्यातील पाऊसकाळाचे आखाडे बांधण्यासाठी मोठी मदत करतात. पाऊसकाळाचा अभ्यास, संशोधन आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे. पाश्चात्त्य देशांत या अंदाजांच्या बाबतीत बरीच प्रगती केलेली आहे. त्या आधारावर तेथे शेती, पीक, पाणी आणि कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सतर्कता ठेवली जाते आणि अनेक अप्रिय प्रसंग टाळले जातात. आपल्याकडील हवामान खाते आजही चेष्टेचाच विषय आहे. बदलत्या वातावरणात विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अशा धोक्यांचा आधीच अंदाज घेऊन सर्वसामान्यांना जागे करण्याची यंत्रणा आपण सक्षम केल्याशिवाय बदलत्या पाऊसकाळाचा फटका आपण रोखू शकणार नाही. 
- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला 

बातम्या आणखी आहेत...