आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : असेही मानवी अतिक्रमण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातून जालन्याकडे जाणारा मार्ग हा काही वर्षांपूर्वी मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात असे. कारण जालना शहराकडे जाणारी सर्व लहान-मोठी वाहने याच रस्त्यावरून जात आणि वारंवार अपघात होत. त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली होती. त्यावर उपाय म्हणून शहराच्या बाहेरून जाणारा बायपास काढण्यात आला. बीड बायपास या नावाने आज तो सर्वपरिचित आहे आणि आज तोही मृत्यूचा महामार्ग म्हणूनच बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. हेच चित्र अशाच क्रमाने जळगाव शहरानेदेखील पाहिले आहे. 

 

पूर्वी जळगावहून धुळे आणि नागपूरकडे जाणारा महामार्ग शहरातून जात होता. त्यावर नागरिकांचे बळी जायला लागले आणि मग तो महामार्ग शहराबाहेर नेण्यात आला. आज तोही मृत्यूचाच महामार्ग बनला आहे. कारण तोही शहराच्याच मध्यभागी आहे. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने प्रत्येक शहरात झाली आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. असे का होते? यात दोष कोणाचा? या प्रश्नांचा एकूणच नागरीकरणाच्या धबडग्यात कोणी विचार करीत नाही आणि आतापर्यंत केलेलाही नाही. कदाचित त्यामुळेच शहरा-शहरांमध्ये ही परिस्थिती निर्माण होत आली आहे आणि गांभीर्याने यावर काही विचार झाला नाही तर पुढेही होत राहणार आहे. 


मानवी वसाहतींचे एक वैशिष्ट्य अगदी मानवाचे समूह करून राहू लागल्याच्या काळापासून आहे. कोणतीही वसाहत ही वाहत्या नदीकाठी केली जाते. सर्वच गावे त्याच तत्त्वाने वसली आहेत. बदलत्या काळात जसजसे शहरीकरण वाढू लागले तसतसे नदीचे स्थान रस्त्यांनी घेतले. जिथून महामार्ग जातो तिथे आधी लहानसहान दुकाने लागू लागतात. मग त्यांची मोठी दुकाने होतात. त्याच्या अाजूबाजूला शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत व्हायला लागते. तिथे घरे व्हायला लागतात आणि शहर बनायला लागते. महामार्गाच्या दोन्ही बाजू अशा प्रकारे मानवी वसाहतींनी गजबजून जातात आणि मग अपघात व्हायला लागतात. माणसे यात मरायला लागली की तो महामार्ग त्या वसाहतीच्या बाहेरून वळवण्याची मागणी सुरू होते. कालांतराने तो शहराबाहेरून नेण्यातही येतो. पण पुन्हा त्या महामार्गाच्या दोन्ही बाजू मानवी वसाहतींनी व्यापायला लागतात. पुन्हा अपघातांचे सत्र आणि लगोलग महामार्ग वसाहतीपासून दूर नेण्याची मागणी होणे क्रमप्राप्त असते. ज्या वेळी वसाहती वाढत असतात त्या वेळी हेच महामार्ग जागांच्या किमती ठरवण्यात महत्त्वाचे मानले जातात. 


विकासक त्यांची इमारत किंवा प्लाॅट महामार्गापासून जास्तीत जास्त जवळ कसे आहेत हे पटवण्यात धन्यता मानतात आणि जे ग्राहक त्या इमारतीत फ्लॅट किंवा जवळचा प्लाॅट मिळवतात तेही त्याची शेखी मिरवण्यातच मोठेपण मानतात. ज्या वेळी अपघात वाढायला लागतात त्या वेळी मात्र आेरड सुरू होते आणि ज्या महामार्गाची शेखी मिरवलेली असते तोच मृत्यूचा महामार्ग ठरवला जाऊ लागतो. यात दोष कोणाचा मानायचा? याचे उत्तर कदाचित कोणाला देता येणार नाही; पण यातून राज्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि मुख्य म्हणजे ग्राहक तरी काही शिकणार आहेत की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 


आज औरंगाबाद आणि जळगाव या दोन्ही शहरांमध्ये शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या विरोधात नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. अपघात थांबवण्यासाठी पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर दडपण आणले जाते आहे. ते स्वाभाविक आहे आणि त्यात वावगे असे काहीही नाही. पण त्याचा परिणाम कसा होतो, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी दिवसातल्या वर्दळीच्या वेळी या महामार्गावरील जड वाहनांची, विशेषत: मालवाहू वाहनांची वाहतूकच थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे चार तास या रस्त्यावरून सोलापूर आणि नगर, पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक्स बाहेरच थांबवून ठेवल्या जातात. त्यामुळे लांबच्या लांब रांगा लागतात आणि निर्धारित वेळेत माल पाेहोचवणे शक्य होत नाही. 


एकीकडे नागपूरहून मुंबईला आठ तासांत ट्रक पोहोचावा यासाठी समृद्धी महामार्ग आखला गेला आहे. हजारो कोटी रुपये त्यावर खर्च केले जात आहेत आणि दुसरीकडे एकेका शहरात चार-चार तास ट्रक थांबवून ठेवले जात आहेत. यातून ही व्यवस्था किती मोठे नुकसान करते आहे, हे उद्योजक आणि व्यापारी यांनाच कदाचित कळू शकेल. जीवितहानीपेक्षा ही हानी मोठी आहे का, असा प्रश्न कदाचित कोणी विचारेल आणि त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. पण जसे जंगले काबीज करून माणसाने वन्य प्राण्यांवर अतिक्रमण केले तसेच हे माणसाचे महामार्गावरचे आणि अप्रत्यक्षपणे उद्योग आणि व्यापारावरचे अतिक्रमण नाही का, हा प्रश्नही त्यांना विचारावा लागेल. 

- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद 

बातम्या आणखी आहेत...