आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालय काल : कालखंडाचे नवे मापन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

४२०० वर्षांपूर्वी हवामानात अचानक बदल झाले व सारे वातावरण कोरडे बनले. त्या काळात शिथिल झालेल्या मान्सूनमुळे मेसोपोटेमियाचे अकादियन राज्य, इजिप्तचे साम्राज्य व हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. भारतात मेघालय राज्यातील गुहांमध्ये या काळाचे संदर्भ शास्त्रज्ञांना सापडले आहेत. त्यामुळे ४२०० ते आजचा हा कालखंड आता 'मेघालयीन एज' या नावाने ओळखला जाईल. 


पृथ्वीचे वय काही शतकांपूर्वी अनुमानाने ठरवले जात होते व नंतर ते अधिक शास्त्रीय पद्धतीने ठरवले जाऊ लागले. भूशास्त्रीय कालमान किंवा जिऑलॉजिकल टाइमस्केलनुसार कोणते खडक आधी व कोणते खडक नंतर निर्माण झाले, जीवाश्म कोणत्या खडकात, कोणत्या स्तरावर सापडतात यावरून पृथ्वीचे वय व पृथ्वीचा इतिहास शोधला जाऊ लागला. पण किरणोत्सारी पद्धतीचा शोध लागला तेव्हापासून खडकस्तर व जीवाश्मांचा अभ्यास कमी झाला आणि खडक व जीवाश्मात आढळणाऱ्या किरणोत्सारी घटकांचाच अभ्यास करून पृथ्वीच्या वयाचा तक्ता तयार केला जाऊ लागला. 


पृथ्वीवर एका विशिष्ट काळात ज्वालामुखी उद्रेक, भूकंप, भूपृष्ठावर ताण वाढून त्याचे तुकडे होणे, या भूतुकड्यांचे स्थलांतर होऊन महाकाय पर्वत निर्माण झाले आहेत. पृथ्वीचे वय ४ अब्ज ६० कोटी वर्षे आहे. या महाविशाल कालखंडात अनेक मोठी स्थित्यंतरे घडलेली आहेत. या साऱ्या नैसर्गिक घटना एक समान कालकुपीत घडलेल्या नाहीत. पहिली घटना १० हजार वर्षांपूर्वी व दुसरी ८ हजार वर्षांपूर्वी, तर तिसरी घटना ६ हजार वर्षांपूर्वी झाली, असे झाले नाही. पृथ्वीच्या कालमानात सर्वात मोठा तुकड्याला 'इऑन' म्हणतात. ज्याला विभाजित करून 'इरा' बनतो. 'इरा'ला नंतर 'पिरियड' किंवा 'सिस्टिम'मध्ये वाटण्यात आले. 'सिस्टिम'ला शेवटी पुन्हा 'इपॉक' किंवा 'सिरीज'मध्ये विभागले गेले आहे. 'इरा'चे काही घटक आहेत. त्यातील 'पॅलिओझोइक' (५४४-२४८ दशलक्ष वर्षे) या ग्रीक शब्दांचा अर्थ आहे 'जुने जीव', तर 'सिनोझोइक' (६५ दशलक्ष वर्षांआधी)चा अर्थ आहे 'अलीकडच्या जीवांचा काल'. 'पिरियड' किंवा 'सिस्टिम' ('इरा'चे विभाजित सदस्य) व 'इपॉक' ('पिरियड'चे तुकडे) अंतर्गत विभागणी झालेली आहे ती भूस्तर समूह कोणत्या भौगोलिक ठिकाणी आढळतो, त्यावरून ठेवण्यात आले आहे. 'केंब्रियन' (५४४-५०५ दशलक्ष वर्षे) हा 'पॅलिओझाइक इरा'चा सर्वात पहिला घटक आहे. हे नामकरण केंब्रिया या इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या खडकावरून करण्यात आले आहे. 'डिओनियन' (४१०-३६० दशलक्ष वर्षे) इंग्लंडमधील डेवनशायर, 'पर्मियन' (२८६-२४८ दशलक्ष वर्षे) रशियातील पर्म प्रांतावरून, 'ज्युरासिक' (२१५-१४५ दशलक्ष वर्षे) फ्रान्स व स्वित्झर्लंडदरम्यान असलेल्या जुरा पर्वतांवरून व 'क्रिटेशियस' (१४५-६५ दशलक्ष वर्षे) नामकरण इंग्लंड व फ्रान्सदरम्यान तयार झालेल्या इंग्लिश खाडीतल्या चुनखडीच्या पर्वतावरून केले गेले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात 'मेघालय कालखंड' घोषित करण्यात आला. त्याचबरोबर 'ग्रीनलँडियन कालखंड' व 'ग्रिप्पियन कालखंड' घोषित करण्यात आले. हे सर्व कालखंड 'होलोसिन' पिरियडमध्ये येतात. 'होलोसिन' या पिरियडची व्याप्ती गेल्या ११,७०० वर्षांपासून ते आजपर्यंत अशी आहे. या कालखंडात पृथ्वीवर समुद्रपातळी बदल, भूसंरचना बदल, नद्यांच्या प्रवाहात बदल, प्राण्यांची व वनस्पतींची उत्पत्ती तसेच त्यांचे स्थलांतर व मानवाची मानसिक तसे शारीरिक उत्क्रांती, त्याची जीवनशैली व शिकार-फळे गोळा करणाऱ्या काळापासून ते शेती करण्यापर्यंतची मजल विकसित झालेली आहे. 


'होलोसिन' कालखंडावर बरेच संशोधन सुरू आहे. १९८९मध्ये 'ग्रीनलँड हिमचकती' उपक्रम युरोपियन युनियनच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला होता. या संशोधनात शास्त्रज्ञांनी ग्रीनलँड देशातून ३०२९ मीटर लांबीची हिमचकती काढली होती. या चकतीत लाखो वर्षे गोठलेल्या बर्फात धूळकण, परागकण, वायू कैद झाले होते. त्यांचा मुक्काम बर्फात असल्याकारणाने त्यांच्यात कोणताच रासायनिक व भौतिक बदल झाला नव्हता. जेव्हा या चकतीतील ऑक्सिजन समस्थानिकांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यांना ८२०० वर्षापूर्वी घडलेली एक 'घटना' सापडली. ही घटना थंडीशी निगडित आहे. या काळात कॅनडा व अमेरिकेच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात बर्फ वितळून ते पाणी उत्तर अटलांटिक समुद्रात मिसळले. त्यामुळे जगातील बहुतांश भागात थंडीचे साम्राज्य पसरले. ही थंडी थोड्या काळासाठीच होती, पण फार दाहक होती. या घटनेचे परिणाम ओमान, येमेन, चीन, ब्राझील, आफ्रिका, तिबेट, मध्य समुद्र, पूर्व आफ्रिका, सैबेरिया, उ.-पश्चिम प्रशांत महासागर, दक्षिण अॅटलांटिक, न्यूझीलंड व इतर अनेक ठिकाणी दिसून आले. तेथील सजीवांवर दूरगामी परिणाम झाले. युरोप व मध्य समुद्राच्या प्रदेशातील मानव जंगलातील उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होता, तो चक्क शेतीकडे वळाला. असाच बदल अनोतोलिया, सायप्रस, अरब द्वीपकल्प, इजिप्त, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाइन, सिरिया व तुर्कीतील मानवी संस्कृतीत झाला. 
८२०० वर्षांसारखीच आणखी एक घटना ४२०० वर्षांपूर्वी घडल्याचे संशोधकांनी शोधून काढले. 


या घटनेचा संदर्भ शुष्क वातावरणाशी जोडला जातो. ४२०० वर्षांपूर्वी हवामानात अचानक बदल झाले व सारे वातावरण कोरडे बनले. ही अवस्था मान्सून शिथिल बनल्यामुळे निर्माण झाली. त्या काळी उ. अॅटलांटिकवरील पश्चिम वाऱ्याची तीव्रता वाढली. त्यामुळे पश्चिम उत्तर अमेरिकेत पावसाची तीव्रता वाढली व त्याबरोबरच हिमनद्यांचे प्रमाण पश्चिम उत्तर अमेरिकेत वाढले. या साऱ्या क्रियांचा परिपाक होऊन अल निनो प्रभाव वाढीस लागला. अल निनोचा भारतीय उपखंडातील मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होत असतो. त्या काळात शिथिल झालेल्या मान्सूनमुळे उ. आफ्रिका, मध्य पूर्व व आशिया खंडातील अनेक ठिकाणी सुका दुष्काळ पडला होता. मेसोपोटेमियाचे अकादियन राज्य, इजिप्तचे साम्राज्य व हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हे सारे ४२०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे झाला. शहराकडून गावाकडे स्थलांतराची प्रक्रिया भारत, इराक, सिरिया व पॅलेस्टाइनमध्ये आढळून आली. चीनच्या काही भागात नैसर्गिक साधनसंपत्ती जमा करून स्वत:ची गुजराण करणारी जमात शेतीकडे वळायला सुरू झाली होती. 


या साऱ्या पुराव्यांच्या आधारे ४२०० वर्षांपूर्वीच्या 'होलोसिन' कालखंडाला विभाजित करण्यात आले. भौगोलिकता हा निकष मानून ४२०० ते आजचा हा कालखंड 'मेघालयीन एज' या नावाने आता ओळखला जाईल. मेघालय राज्यात शिलाँगजवळ मॉमल नावाची गुहा आहे. या गुहेत पावसाचे पाणी झिरपून आत येते व येताना आपल्यासोबत कॅल्शियम किंवा चुना घेऊन येते. गुहेच्या छपरातून ठिबकणारे चुनामिश्रित पाणी या गुहेच्या तळावर जमा होते. ही क्रिया वर्षानुवर्षे अव्याहतपणे चालू राहिल्यामुळे चुन्याचे खांब तयार झाले आहेत. याला स्पिलियोथेम म्हणतात. स्टॅलॅकटाइट व स्टॅलॅगमाइट हे स्पिलियोथेमचेच प्रकार आहेत. मॉमल गुहेतील या घटकांचा अभ्यास केल्यानंतर ४२०० ची घटना इथे स्पष्ट रूपाने अधोरेखित झालेली दिसून आली. त्यामुळेच मेघालय येथे ही गुहा असल्याकारणाने या कालखंडाला मेघालयीन कालखंड असे शास्त्रज्ञांनी घोषित केले. 


भारतीय मान्सूनचे नैऋत्य व ईशान्य असे दोन प्रकार आहेत. पश्चिम व उत्तरेत हिवाळा असतो तेव्हा दक्षिणेत पावसाळा असतो, पण ईशान्य राज्यात या दोन्ही मान्सूनचे प्रमाण कमी असते. त्यामुळेच मॉमलसारख्या ठिकाणी जे पावसाळ्याचे संकेत तिथल्या विविध घटकांत कैद होतात त्याला मान्सून अभ्यासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. मेघालयातील पावसावर भारतीय मान्सूनचा प्रभाव आहे. मेघालयातील गुहेत जेथे स्पिलियोथेम तयार झालेले आहे त्यात मान्सूनचे संकेत बंदिस्त झाले आहेत. संशोधकांनी वर्षभर इथल्या गुहेत तापमानाचा अभ्यास केला. गुहेत किती प्रमाणात कॅल्शियम झिरपते याच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संशोधक निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. 


आपण आता अधिकृतपणे मेघालयीन कालखंडात राहत आहोत. आपल्या देशातील एका कोपऱ्यात भूशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठेवा आढळतो, याचा सार्थ अभिमान बाळगायला कोणाचीही हरकत नसावी! (लेखक इंडियन इन्स्टि. ऑफ जिओमॅग्नेटिझम येथे कार्यरत) 

- प्रवीण गवळी 
pravin@iigs.iigm.res.in

बातम्या आणखी आहेत...