आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवतांचे 'ग्लासनॉस्त' (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे विशिष्ट आकसाने पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याला संघही जबाबदार आहे. मध्ययुगीन काळात रमणाऱ्या समाजात प्रगतिशील पाश्चात्त्य तत्त्वांचा हिरीरीने पुरस्कार करणारा वर्ग आणि या समाजाला त्याच्या कलेने बदलण्याचा प्रयत्न करणारा, मात्र हिंदू दृष्टिकोनावर निष्ठा ठेवणारा वर्ग यामध्ये भारतात कायम संघर्ष होतो. पहिल्या वर्गाचे माध्यमांवर, राजकारणावर प्राबल्य होते. संघ विचारांना माध्यमांत व राजकारणात स्थान नव्हते. यातून संघामध्येही माध्यमांबद्दल तुसडी वृत्ती आली. मात्र, चिकाटी हा संघाचा मोठा गुण. त्या आधारावर संघ परिवाराने बहुमताने दिल्ली काबीज केली. त्यानंतर संघाला माध्यमांमध्ये स्थान मिळू लागले, मात्र तेही बऱ्याचदा आरोपीच्या पिंजऱ्यात. यालाही संघाची विशिष्ट मनोवृत्ती कारणीभूत होती. संघाकडे प्रचारक असले तरी प्रचारकी चातुर्य असणारे माध्यमवीर नाहीत. खोल अभ्यास करून गृहितके मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर संघाचा अधिक भर. कामाला सखोल व चौफेर बुद्धिमत्तेचीही साथ लागते, सत्ता टिकवताना तर ती अधिक आवश्यक असते हे संघाच्या लक्षात आले नव्हते. बहुधा हे बदलण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीन दिवस दिल्लीत बौद्धिक घेतले. मार्क्सवादी मुशीतील हे संघीय बौद्धिक होते. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात अशी लांब लांब भाषणे चालत. लेनिन व माओ तर कित्येक तास बोलत. ती ऐकण्याची सक्ती असे. भागवतांची भाषणे सुदैवाने कंटाळवाणी नव्हती. 


आपल्याच विश्वात दंग होऊन काम करत राहण्याचे दिवस संपले हे संघाला पटू लागले आहे ही चांगली गोष्ट आहे. संघ ही सतत विस्तार पावणारी व राजकीय प्रभाव पाडणारी सांस्कृतिक संघटना आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा संघटनेबद्दल लोकांमध्ये जितकी माहिती जाईल तितके ते चांगले. अशा संघटनेचे विचार आजचे आहेत की मागील काळात जखडलेले आहेत याची परीक्षा अशा जाहीर कार्यक्रमांतून होऊ शकते. पत्रकारांच्या थेट व खोचक प्रश्नांना उत्तर देण्याचे भागवतांनी टाळले असले तरी संघाबद्दल सध्या चर्चेत असणाऱ्या अनेक मुद्द्यांना भागवतांनी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सविस्तर उत्तरे दिली. समलिंगी संबंध, गोरक्षण, राज्यघटनेबद्दल संघाचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांवर भागवत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही मुद्द्यांवरील संघाच्या भूमिकेशी असहमती होऊ शकते, निवडणुका समोर आल्याने संघाने खेळलेला हा कुटिल डाव आहे अशीही शंका घेता येईल. लोकशाहीत सर्व शंकांना जागा आहे, पण आपली भूमिका मांडण्यास संघ लोकांपर्यंत जाऊ लागला ही महत्त्वाची बाब आहे. 


या प्रश्नोत्तरांतून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटपासून घेतलेली फारकत. संघ हा डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या विशिष्ट विचारांत बंदिस्त राहिलेला नाही, गुरुजींच्या विचारातील तात्कालिक विचार (बंच ऑफ थॉट) बाजूला ठेवून सर्वसमावेशक विचारांशीच संघाची बांधिलकी आहे, असे सांगत भागवत यांनी एक जोखड दूर केले. काळानुसार सर्व बदल होत जातात. संघही बदलत आहे आणि हिंदूंनी आचारधर्म बदलला पाहिजे, असे ते म्हणाले. अारक्षणाचे समर्थन करताना जात व्यवस्थेच्या जागी 'जात-अव्यवस्था' असाच शब्द पाहिजे, असेही ते म्हणाले. मुस्लिमांना वगळून हिंदुत्व टिकणार नाही. कारण हिंदुत्व कोणाला वगळीत नाही, असे त्यांनी सुनावले. ही सर्व वक्तव्ये संघीय नसलेल्या, पण संघाबद्दल आस्था ठेवणाऱ्यांना पसंत पडणारी व संघ विरोधकांना बुचकळ्यात पाडणारी आहेत. 


काळानुसार संघाला चेहरा देण्याचा प्रयत्न पूर्वी देवरसांनी केला. भागवत तसेच करीत आहेत. पण कडव्या संघीयांना हे परिवर्तन पचेल का? ज्या जोरकसपणे भागवतांनी हे मुद्दे मांडले तितक्याच जोरकसपणे संघ स्वयंसेवक त्याचे आचरण करतील का? सरसंघचालक बोलतात म्हणजे संपूर्ण संघ बोलतो, असे भागवत म्हणाले असले तरी प्रतिगामी विचारांना वा आक्रमक राजकारणाला लगाम घालण्याची वेळ आली तर संघाचे हात सैल पडतात, असाही अनुभव आहे. समाजात रूढ असलेल्या अनेक परंपरा व विचार संघाला पसंत नाहीत, असे भागवत यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. पण या विचारांचे उच्चाटन करण्यासाठी प्रखर संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष करण्याची वृत्ती संघामध्ये नाही. कारण सर्व समाजाला बरोबर घेताना कुणी दुखावले जाऊ नये म्हणून संघर्ष टाळण्याकडेच संघाचा कल असतो. सर्वांना सामावून घेण्याच्या धोरणामुळे संघ बलवान झाला हे खरे, पण सामाजिक वा वैचारिक संघर्ष टाळत आल्यामुळे संघ काळानुरूप चैतन्यशील राहिला नाही हेही खरे. रशियात गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनॉस्त सुरू करून कम्युनिस्ट पक्षात मोकळे वारे खेळवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी कम्युनिस्ट पक्ष पूर्वीच्याच बंदिस्त वळणावर गेला. भागवतांच्या धडपडीचे तसे होऊ नये. 

बातम्या आणखी आहेत...