आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न मिटवता येणारा नेहरूंचा वारसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पं. नेहरू हे देशातील पहिले आणि शेवटचे सेक्युलॅरिस्ट समजले पाहिजेत. त्यांचा सेक्युलॅरिझम सर्व उपासना पद्धतींचा सन्मान करणारा आणि राज्यसंस्थेला कोणत्याही उपासना पद्धतीशी बांधून न घेणारा होता. त्यांच्या भक्तांनी त्याचे रूपांतर मुस्लिम तुष्टीकरणात, मुस्लिमांसाठी वेगळा कायदा ठेवण्यात, मुस्लिमांना त्यांच्या शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण देण्याची मुभा देण्यात, धर्मांतराकडे कानाडोळा करण्यात केले. 


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशातील काही लोकांनी थोर पुरुषांना विवादास्पद व्यक्ती बनवून टाकलेले आहे. एका बाजूला महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला गांधीजी मातृभूमीच्या विभाजनाला जबाबदार आहेत, असेही म्हणणार. पं. नेहरू आधुनिक भारताचे निर्माते आहेत, असे म्हणणार आणि लगेच दुसरे म्हणणार, नेहरूंना पंतप्रधान करून हिमालयाएवढी चूक झाली आहे. सरदार वल्लभभाई यांना लोहपुरुष म्हणणार, तर दुसरे त्यांना मुस्लिमविरोधी आणि संकुचित जातीयवादी म्हणणार. असे प्रत्येक महापुरुषाविषयी झालेले आहे. काही लोकांना यातच आनंद वाटतो. ते आपली बुद्धी आणि लेखणी थोर पुरुषांना कमी लेखण्यामध्ये खर्च करत असतात. 
थोर पुरुषांना जेव्हा राजकीय पक्षाचे लेबल लागते तेव्हा इतर राजकीय पक्ष थोर पुरुषांवर परोक्ष किंवा अपरोक्ष टीका करत राहतात. पं. नेहरू यांचे उदाहरण आपण घेऊया. नेहरू किती वाईट होते, हे सांगणारे अनेक लेख आणि यूट्यूबवर काही व्हिडिओज् आहेत. हा सर्व उपद्व्याप करणाऱ्यांना असे वाटते की, नेहरूंचे अशा प्रकारे चारित्र्यहनन आपण केले की, काँग्रेसचा जनाधार आपोआप कमी होईल, अशी सर्व मंडळी स्वप्नांच्या जगात जगत असतात. नेहरूंविषयी एक गोष्ट नक्की म्हणता येते, ती म्हणजे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा अथवा त्यांचा द्वेष करा, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाहीत. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि १९६४ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते पंतप्रधान पदावरच होते. हा इतिहास कोणालाही, कधीही, केव्हाही पुसून टाकता येणार नाही.

 
यामुळे अलाहाबाद येथील नेहरूंचा पुतळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण करतो, म्हणून हटवण्यात आला, म्हणून नेहरूंचा इतिहास पुसून टाकला जात आहे, अशी ज्यांनी ओरड सुरू केली, त्याला खरं सांगायचं तर काही अर्थ नाही. अशा एका ठिकाणाहून पुतळा हलवल्यामुळे पं. नेहरूंसारख्या थोर पुरुषांचा इतिहास हलवला गेला किंवा जाईल, असे म्हणणे बालिशपणाचे आहे. रशिया जेव्हा कोसळला तेव्हा रशियातील लेनिन, स्टालिन, झेरझिंस्की यांचे पुतळे लोकांनी जमीनदोस्त केले. कारण या लोकांनी रशियन जनतेवर अत्याचाराचा जो रणगाडा फिरवला त्याच्या आठवणी ताज्या होत्या. नेहरू म्हणजे गुलाबाचे फूल, आचार्य अत्रेंनी त्यांच्यावर जे मृत्युलेख लिहिले आहेत, ते अजरामर झालेले आहेत. पुतळा हटवला गेल्यामुळे इतिहासातील आणि जनमानसातील त्यांचे स्थान तसूभरदेखील हललेले नाही. ते कुणालाही हलवता येणार नाही. 


पं. नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर, परराष्ट्र धोरणांवर, काश्मीरविषयक धोरणांवर, चीनविषयक धोरणांवर टीका होऊ शकते. अनेकांचे याबाबतीत प्रामाणिक मतभेद असू शकतात. अनेक जणांनी ते विविध पुस्तकांतून व्यक्त केलेले आहेत. कोणत्याही राज्याची धोरणे सर्वमान्य होणे शक्य नसते. वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला आपला दृष्टिकोनच खरा वाटतो. प्रश्न धोरणे आणि दृष्टिकोनांचा नसून धोरणे आखणाऱ्याच्या हेतूविषयीचा असतो. पं. नेहरू यांनी जे आर्थिक धोरण आखले ते देशाची आर्थिक विषमता वेगाने कमी करण्यासाठी आखले. त्यांचा हेतू शुद्ध आणि पवित्र होता. चीनशी त्यांनी पंचशीलाचा करार केला. त्याचा हेतू शेजारील देशाशी मैत्रीपूर्ण संबंध राहावा, लढाई होऊ नये, हा होता. काश्मीर खोऱ्यातील बहुसंख्य मुसलमानांना उर्वरित भारतात मानसिकदृष्ट्या सामावून घेण्यासाठी काश्मीरचे धोरण त्यांनी आखले. हेतू शुद्ध होता, परंतु परिस्थिती आणि स्वप्नरंजन यामुळे जे यश मिळायला पाहिजे, ते यश मिळाले नाही. पं. नेहरूंचा शुद्ध हेतू तसाच कायम ठेवून परिस्थितीनुसार धोरणात बदल केला गेलेला आहे. व्यक्ती जशी चुकांतून शिकते तसा देशही चुकांतून शिकत जातो. 


पं. नेहरूंची देशभर असंख्य स्मारके आहेत. दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे. मुंबईजवळ नेहरूंच्या नावाने न्हावा-शेवा बंदर आहे. मुंबईत नेहरू तारांगण आहे. या स्मारकांपेक्षा नेहरूंचे भव्य स्मारक, भारताचे संविधान आणि भारतीय प्रजासत्ताक आहे. 'ब्रिटिशांनी दिलेले संविधान आम्हाला नको, आम्ही आमचे संविधान तयार करू,' हा पं. नेहरूंचा १९२९ सालापासूनचा आग्रह होता. ब्रिटिशांची इच्छा ब्रिटिश पार्लमेंटने संविधान करून देण्याची इच्छा होती. भारताला राष्ट्रकुल संघात ठेवून ब्रिटिश राणीचे नाममात्र प्रभुत्व का होईना भारताने स्वीकारावे, अशी इंग्रजांची इच्छा होती. पं. नेहरूंचा आग्रह पूर्ण स्वराज्याचा होता. राणीची अधिसत्ता न मानता आज भारत स्वतंत्रपणे राष्ट्रकुल संघाचा सदस्य आहे. त्याचे श्रेय नेहरूंना जाते. 


भारताच्या घटना समितीचे काम सुरू झाल्यानंतर पं. नेहरू यांनी उद्देशक ठराव मांडला. राज्यघटनेला सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा प्रथम निर्णय करावा लागतो. तो म्हणजे सार्वभौमत्व कोणाकडे राहील? या ठरावात पं. नेहरू म्हणाले, 'सार्वभौमत्व भारतीय जनतेकडे राहील.' जनतेला सार्वभौमत्व देणारी आपली राज्यघटना नंतर स्वीकारली गेली. लोकशाही प्रजासत्ताकाच्या पायातील हा पहिला भक्कम दगड आहे. स्वातंत्र्याचे आंदोलन करणारी काँग्रेस सार्वभौम नाही, काँग्रेसचे नेते सार्वभौम नाहीत, सत्तेवर येणारे शासन सार्वभौम नाही, तर भारतीय जनता सार्वभौम आहे. पं. नेहरूंची ही जीवननिष्ठा होती. ते हुकूमशहा बनू शकत होते. घराणेशाही ते निर्माण करू शकत होते, (जी पुढे इंदिरा गांधींनी केली) एक पक्षाची हुकूमशाही ते निर्माण करू शकत होते. त्यांची बरोबरी करील, असा तेव्हा कुणी नेता नव्हता. काँग्रेस ही एकमेव अखिल भारतीय संस्था होती. अखिल भारतीय स्तरावर तिला आव्हान देईल, असा राजकीय पक्ष नव्हता, परंतु पं. नेहरूंनी इजिप्तच्या नासेरप्रमाणे किंवा इंडोनेशियाच्या सुकार्णोंप्रमाणे स्वतःकडे मरेपर्यंत सत्ता राहील, असा संवैधानिक बदल केला नाही. 


पं. नेहरू हे देशातील पहिले आणि शेवटचे सेक्युलॅरिस्ट समजले पाहिजेत. त्यांचा सेक्युलॅरिझम सर्व उपासना पद्धतींचा सन्मान करणारा आणि राज्यसंस्थेला कोणत्याही उपासना पद्धतीशी बांधून न घेणारा होता. त्यांच्या भक्तांनी त्याचे रूपांतर मुस्लिम तुष्टीकरणात, मुस्लिमांसाठी वेगळा कायदा ठेवण्यात, मुस्लिमांना त्यांच्या शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण देण्याची मुभा देण्यात, धर्मांतराकडे कानाडोळा करण्यात केले. हा विकृत सेक्युलॅरिझम आहे. नेहरूंची स्मृती खऱ्या अर्थाने जागृत ठेवायची असेल तर अलीगढ विद्यापीठात ते जे बोललेत त्याचे स्मरण ठेवले पाहिजे. 'तुम्ही मुसलमान आहात, मी हिंदू आहे. वेगवेगळ्या धर्मांचे आपण पालन करतो, इतर काही कुठल्याही धर्माचे पालन करत नाहीत, परंतु त्यामुळे सांस्कृतिक वारशापासून आपण कुणीही दूर जाऊ शकत नाही. भूतकाळ आपल्याला बांधून ठेवतो, मग वर्तमान आणि भविष्यकाळ आमच्या मनात भेद का निर्माण करतो?' एका वाक्यात सांगायचे तर अभेद्य भारत हाच पं. नेहरूंचा वारसा आहे आणि तीच त्यांची स्मृती आहे. 


लोकशाही मूल्यांविषयी पं. नेहरूंचा खूप आग्रह असे. त्यांच्यावर टीका करणारे म्हणतात की, ते अधिकारशाही गाजवणारे होते. त्यांना विरोध सहन होत नसे. भाषावार प्रांतरचनेला त्यांचा विरोध होता, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जनतेची ती मागणी आहे तेव्हा त्यांनी भाषावार प्रांतरचना स्वीकारली. काही राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या निवडीचे नसत, पण त्यांचा ते स्वीकार करीत. लोकसभेत त्यांच्यावर घणाघाती टीका होई, शांतपणे ती ते ऐकून घेत. प्रारंभीच्या काळात न्यायालयांनी अनेक निर्णय त्यांना न आवडणारे दिले. त्यांनी कधीही न्यायसंस्थेचा अपमान केला नाही. ते म्हणत, 'लोकशाही म्हणजे सहिष्णुता, पण सहिष्णुता म्हणजे आपल्याशी जे सहमत आहेत, त्यांचाच विचार असा नसून जे आपल्याशी असहमत आहेत, त्यांचाही सन्मान केला पाहिजे.' नेहरू मोठे की लहान, या निरर्थक वादात आपली शक्ती आणि वेळ घालवण्याऐवजी नेहरूंच्या स्वप्नातील भारत, बदलत्या काळाच्या संदर्भात कसा पुढे नेता येईल, असा भारतीय विचार आपण केला पाहिजे. 

- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार 

बातम्या आणखी आहेत...