आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : पेंगुळलेले काँग्रेसजन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त समीप येत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या पातळीवर लगबग सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाटनाला आवर घालून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह निवडणुकीच्या दृष्टीने देशाचा कानाकोपरा पिंजून काढायला सुरुवात केली आहे. प्रदीर्घ मोठी परंपरा पाठीशी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींचे देशभर दौरे सुरू आहेत. सोनिया व राहुल गांधी यांच्यासह ज्या नेत्यांनी काँग्रेसच्या वरच्या फळीत काम केले वा ज्यांना दिल्लीच्या राजकारणाचा आवाका आहे अशा नेत्यांनाही आपापल्या प्रांताच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे. एकेकाळी पंतप्रधान कार्यालयाचा भार सांभाळलेले नंतर महाराष्ट्राची धुरा वाहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच भूमिकेतून नाशिक जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या भेटीवर येऊन माघारी फिरले. भाजप असो की काँग्रेस, प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यांमुळे निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागल्याचे संकेत मिळत आहेत. 


गेल्या चार वर्षांत ज्या रीतीने भाजपने लोकसभेपासून ते गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुसंडी मारत या संस्था काबीज केल्या तोच वेग या पुढच्या काळातही कायम राहावा म्हणून त्यांचा त्यावर भर असल्याचे दिसते. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पक्षाचा प्रचार-प्रसार होण्यासाठी वरच्या फळीतील नेत्यांनी दौरे करणे, कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणे, पक्षातील जो कार्यकर्ता लौकिकार्थाने अतिशय सामान्य समजला जातो वा तो तळागाळातील म्हणजेच काय तर झोपडीत वास्तव्याला त्याच्याकडे जेवण करणे, जमलेच मुक्काम करणे आदी सगळे फंडे वापरले जात आहेत. पण जे मुळातच आडात नाही, ते पोहऱ्यात कुठून येणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचा सरकार चालवण्याचा वकुब, मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या प्रशासनावर असलेली मांड हे सगळं काही भारदस्त असले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पातळीवर या प्रतिमेचा काय उपयोग होतो वा नाही याची झलक नाशिकमुक्कामी बघायला मिळाली. बाबा दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आले. दोन-चार प्रमुख कार्यक्रम झाले. त्याच्या बातम्या आल्या. खरं तर हेच तर स्थानिक पातळीवरील काँग्रेस पक्षाचे दुर्दैव आहे. एकेकाळी देशावर सत्ता गाजवणारा, तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची फौज असलेल्या पक्षाची आजची अवस्था विचार करण्याजोगी झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा खऱ्या अर्थाने एक उंचीचा नेता नाशिक दौऱ्यावर येणार म्हटल्यावर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढण्याच्या दृष्टीने संधीचे सोने करायला हवे होते. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणा की सद्य:स्थितीत सत्ताधारी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा जो दावा करत आहेत, त्याचे वास्तव काय? अन् प्रत्यक्षात तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नसतील तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना काय तयारी करायला हवी याचा अभ्यासवर्ग होणे अपेक्षित होते. थोडक्यात काय तर विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना कोंडीत कसे पकडता येऊ शकेल याच्या किमान टिप्स तरी कार्यकर्त्यांनी बाबांकडून घ्यायला हव्या होत्या. तसे काहीही झाले नाही. काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व व त्यांची कार्यकर्त्यांची फौज किती पेंगुळली आहे त्याचेच हे द्योतक म्हणता येईल. 


पक्षाचा एक ज्येष्ठ नेता जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर दृश्यस्वरूपात जी हवा निर्माण होणे अपेक्षित असते तशी ती होऊ शकलेली नाही. नाशिकला औद्योगिक वसाहतींची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे येथे उद्योगपतींची संख्यादेखील लक्षणीय आहे. बाबांच्या उपस्थितीत झालेल्या एका छोटेखानी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात उद्योजकांना निमंत्रित केल्यावर बोटावर मोजण्याइतकीच मंडळी हजेरी लावत असतील तर यावरून स्थानिक काँग्रेस नेतृत्व उद्योजक सोडा, सर्वसामान्य जनतेपासूनही दुरावल्याचे चित्र दिसते आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत असो वा सत्तेबाहेर, त्याच्या कार्यकर्त्यांतील मानापमान नाट्याचा दीर्घांक आजही सुरूच आहे. एका गटाने पुढाकार घेतला म्हणून दुसऱ्या गटाकडून कार्यक्रमाचा कसा फज्जा उडेल याची व्यूहरचना करायलाच हवी. तसे बाबांच्या या दौऱ्यातही झाले. सध्या नाशिकला एक फॅशन आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा मोठा नेता आला की त्याला 'सह्याद्री'च्या भेटीला हमखास आणले जाते. एकेकाळी राजकारणात एक म्हण प्रचलित झाली होती, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता. येथे प्रवाह उलटा वाहतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी मंडळी ही खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या सान्निध्यातील, पण याच मंडळींना आता नाशिकच्या सह्याद्रीचा आधार वाटू लागला आहे. असो, काँग्रेसजनांतील मरगळ वेळीच दूर झाली तरच ते या पुढच्या काळात प्रभावी विरोधकांची भूमिका निभावू शकतील. 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...