Home | Editorial | Columns | Column article about RSS and BJP

संघ व भाजपकडे नव्या सुरुवातीची संधी

विनोद के. जोस | Update - Aug 29, 2018, 08:01 AM IST

समाजात उच्च प्रतीच्या आर्थिक घडामोडी घडत असतात तसेच सामाजिक समूहांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होते तेव्हा द्वेषभावना नष्ट

 • Column article about RSS and BJP

  समाजात उच्च प्रतीच्या आर्थिक घडामोडी घडत असतात तसेच सामाजिक समूहांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होते तेव्हा द्वेषभावना नष्ट होते. या संशोधनांतून एक महत्त्वाची बाब समोर येते, ती म्हणजे जेव्हा लोकांच्या हाती रोजगार असतात तेव्हा त्यांच्यामध्ये समीक्षणात्मक विचारक्षमता येते. प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य येते. अशा वेळी द्वेषभावना तग धरूच शकत नाही.


  लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधील शाखेला नेहमी जात असे. तेथील उत्तरेकडील डोंगराळ भागातील जिल्ह्यात आमचे गाव होते. मी ख्रिश्चन असल्यामुळे अल्पसंख्याकांत मोडणारा. आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यामुळे मी विशेष कुटुंबात वाढलो. पण ७-८ वर्षांचा असताना मी संघाच्या शाखेत जाणे सुरुवातीला अनेकांना खटकत असे. पण शेजारच्या आवडत्या मित्राने मला तिथे नेले होते व तेथे कबड्डी खेळायला मलाही आवडत होते.


  आयुष्याला आकार देणाऱ्या त्या दिवसांमधील संघाची गाणी मला आजही आठवतात. भारतीय खेळ नसल्यामुळे तरुणांनी क्रिकेट खेळू नये. तसेच त्यात फार शारीरिक मेहनतही नसते, यावर भाषणे केली जात. अशा प्रकारे राष्ट्रवाद आणि सामाजिक मूल्ये, भ्रष्टाचाराविरोधातील लढा यावर मीदेखील सहमत होतो.


  पण विशेषत: मुस्लिम आणि काही प्रमाणात ख्रिश्चन लोक भारतविरोधी असल्याचे म्हटले जाऊ लागले, तेव्हा मला खटकले. तसेच तेथे सांगण्यात येणाऱ्या कथा आणि निरूपणांमध्ये काही आक्षेपार्ह मुद्दे होते. जसे की, गोरी त्वचा असलेले लोक देवी-देवतांच्या जवळचे असतात, तर काळे लोक राक्षसासारखे असतात. बालशाखेतील खेळ आणि नवीन लोकांचे स्वागत चांगले होते. पण त्याद्वारे मुलांच्या मनात इतरांबद्दल भीती आणि द्वेषाची बीजे पेरली जात होती. त्यात प्रेम, क्षमा या गुणांऐवजी समाजाच्या विशिष्ट समूहात बदला आणि श्रेष्ठत्वाची भावना निर्माण केली जात होती. राजकीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याशिवाय एकताही साधली जाणार नाही, असे चित्र दर्शवले जात होते. इतर (शत्रू) कसे असतात, याचेच चित्र ते नेहमी रंगवत असत.
  कुमारवयात असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मित्रांशी माझी मैत्री होती. पण नंतर मला कळले की, मी १९८० च्या काळात मी काही योगायोगाने संघाच्या शाखेत गेलो नव्हतो. त्या वेळचे सरसंघचालक मधुकर देवरस यांनी अल्पसंख्याक समुदायातील मुलांना शाखेत आणण्याचे आदेश दिले होते. जसजसा मी मोठा होत होतो, मी इतिहासावरील पुस्तके, नोंदी वाचल्या. तेव्हा कळले की, रा.स्व. संघ केवळ धूर्त नाही तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि इतर अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांबाबत चुकीच्या संकल्पना रुजवल्या आहेत. त्यांच्या या कृत्रिम भाकडकथांचे अनेक दाखले देता येतील. आरएसएसची पत्रके, खोट्या कथा, स्वातंत्र्य चळवळीतील आरएसएसची भूमिका हे सर्व ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, चळवळ कर्त्यांसमोर मांडत असत. पण वाचनाची आवड असलेल्यांनी या सर्व घटनांच्या तथ्यांपर्यंत पोहोचावे.


  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची राजकीय शाखा भाजप ज्या तीन गोष्टींवर आधारित आहे, त्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. पहिले म्हणजे द्वेषभावना निर्माण करणारे विचार. दुसरे म्हणजे या द्वेषातून हिंसा साधणे आणि द्वेष व हिंसेचे वर्तुळ पूर्ण करणारी चुकीची माहिती पसरवत राहणे, ही तिसरी गोष्ट. त्यामुळे भारताला एक चांगला समाज म्हणून बदलायचे असल्यास आजघडीला देशात सर्वात प्रभावी ठरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषभावना आणि राजकीय असहिष्णुतेला वेळीच आवर घातला पाहिजे.


  गोहत्येच्या नावाखाली जमावाकडून केल्या गेलेल्या हल्ल्यांचेच उदाहरण घेऊयात. २०१० ते २०१३ दरम्यान गोरक्षकांकडून बळी गेलेल्यांचा आकडा शून्य होता. २०१४ मध्ये हा आकडा ११ वर पोहोचला. २०१५ मध्ये ४८, २०१६ मध्ये ५८ आणि २०१७ मध्ये १५२ वर पोहोचला. भारतामध्ये बेकायदा गायींची तस्करी होते, असे समर्थन या हिंसक हल्ल्यांसाठी दिले जाते. विशेष म्हणजे या हल्ल्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित एखाद्या संस्थेतील-शाखेतील गोरक्षक सहभागी असतात. लव्ह जिहादबाबतही हेच होते. मुस्लिम मुले हिंदू मुलींना पळवून नेतात, या द्वेषभावनेवरून समाजाला भडकवले जाते. एखाद्या उदाहरणावरून 'इतरांची' भीती घातली जाते.
  जगाच्या इतर भागाच्या इतिहासात डोकावले असता, अशाच 'इतरांच्या' द्वेषभावनेतून निर्माण केलेल्या कथांवरच राजकीय अर्थव्यवस्था बहरलेल्या दिसून येतात. या कथांचा प्रभाव व त्यांच्या दीर्घकालीन यशामागे सत्य नव्हे तर त्यांची पुनरावृत्ती हे कारण आहे.


  दक्षिण अमेरिकेतील कृष्णवर्णीयांबाबतच्या द्वेषभावनेवरून समूह मानसशास्त्रानुसार अनेक संशोधने झालेली आहेत. दक्षिणेकडील स्त्रीत्वाला कृष्णवर्णीयांपासून धोका असल्याचे भासवले जाते. युरोपमधील ख्रिस्तीविरोध आणि अरब जगातील अमेरिकाविरोधही याच स्वरूपाचा आहे. द्वेषभावना स्वीकारणारे, द्वेष पसरवणाऱ्या लोकांवर ते अवलंबून असतात. सत्य शोधण्याचा वैयक्तिकरीत्या पुढाकार घेतला तेव्हा द्वेष नाकारला जातो. समाजात उच्च प्रतीच्या आर्थिक घडामोडी घडत असतात तसेच सामाजिक समूहांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होते तेव्हा द्वेषभावना नष्ट होते. या संशोधनांतून एक महत्त्वाची बाब समोर येते, ती म्हणजे जेव्हा लोकांच्या हाती रोजगार असतात तेव्हा त्यांच्यामध्ये समीक्षणात्मक विचारक्षमता येते. प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य येते. अशा वेळी द्वेषभावना तग धरूच शकत नाही. असत्य वारंवार ओरडून सांगितले जाते, तेव्हा त्याचे रूपांतर सत्यात होते,असे अॅडॉल्फ हिटलरचे प्रसारण मंत्री जोसेफ गोबेल्स नेहमी म्हणत असत. मागील आठवड्यात केरळमधील महापुरात तरुण ज्या पद्धतीने बचावकार्यात जिवाची बाजी लावत होते, ते हृदय हेलावून टाकणारे व्हिडिओ पाहताना हे ठळकपणे जाणवले. या दृश्यांमध्ये गुडघाभर पाण्यात उभा असलेला एक तरुण वाकला असून त्याच्या पाठीचा पायरीसारखा वापर करून इतर महिलांना बोटीवर चढता आले. या दृश्यांमध्ये फोटोओळी देताना आरएसएसचा स्वयंसेवक असल्याचे म्हटले होते. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला गेला. हे पाहून कुणाचेही हृदय हेलावून जाईल. पण त्यातील सत्य नंतर समोर आले. आपल्या पाठीची पायरी करणारा तो तरुण महंमद जैसेल नावाचा मुस्लिम होता. आरएसएसच्या स्वयंसेवकाने पूरग्रस्तांना कशी मदत केली, हे दाखवणारे व्हिडिओ हजारो लोकांनी शेअर केले. यावरून गोबेल्सची थेअरी तंतोतंत खरी असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. अशा प्रकारची ही एकच घटना नाही. त्या सतत मोठ्या संख्येने घडतच आहेत. मात्र रा.स्व. संघाकडे याचे उत्तर अथवा स्पष्टीकरण नाही.


  संघाच्या शाखेत जात असल्यापासून आज पत्रकारिता करतानाही मी एक गोष्ट नेहमी ऐकतो की, ख्रिश्चन लोक भारतविरोधी आहेत. ते वसाहतवादाचाच एक भाग आहेत. यासाठी तुम्ही पुन्हा सत्याचा शोध घेऊ शकता. पण रा.स्व. संघाच्या खोट्या इतिहास लेखकांची मला पुन्हा आठवण होते.


  तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की, बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी घोषणा करण्याच्या १३१ वर्षांपूर्वी ख्रिश्चन कॅथलिक धर्मगुरू थॉमस पॅरेमॅक्केल यांनी १७८५ मध्ये 'इंडिया फॉर इंडियन्स' हे पुस्तक मल्याळीमध्ये लिहिले होते. भारतावर भारतीयांचेच शासन असले पाहिजे, असा युक्तिवाद त्यात केलेला होता. भारतातील सुरुवातीच्या राष्ट्रवादी धारणांपैकी ही एक. दुर्दैवाने आपली राष्ट्रवादी धारणा बहुतांश हिंदी, उत्तर भारतीय भाषा आणि इंग्रजी साहित्यावर आधारित असते. चुकीची माहिती, द्वेष आणि हिंसेच्या दुष्टचक्रातून रा.स्व.संघाने मुक्त झाले पाहिजे. रा.स्व.संघ म्हणतो की, ख्रिश्चन लोक अनेकांचे धर्मांतर करतात. पण जनगणनेनुसार दिसते की, ख्रिश्चनांची संख्या उत्तरोत्तर घटत चालली आहे. केवळ मुस्लिम, ख्रिश्चनच नव्हे तर प्रत्येक भारतीय या देशासाठी योगदान देत असतो. रा.स्व.संघाच्या स्थापनेला सात वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण होतील. तरीही त्यांना प्रतिगामी शक्ती म्हणून प्रतिमा होण्यापासून वाचवायचे असल्यास वेळीच द्वेष व कुप्रचारापासून स्वत:ला मुक्त करायला हवे. २०१९ मध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी चांगली संधी आहे.
  - विनोद के. जोस, ज्येष्ठ पत्रकार

Trending