आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : पुन्हा सनातनच का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री मुंबईतील नालासोपारा भागातील वैभव राऊत याच्या घरावर तसेच एका दुकानावर छापा टाकला. त्या वेळी तेथे ८ देशी बॉम्ब तसेच २० पेक्षा जास्त बॉम्ब तयार केले जाऊ शकतात एवढी गनपावडर तसेच डिटोनेटरही ही सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तपासात या स्फोटकांची व्याप्ती मोठी असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळपर्यंत याप्रकरणी चाललेल्या कारवाईत या कटात सहभागी असलेले आणखी दोघे ताब्यात घेण्यात आले. यानिमित्ताने राज्यातील मोठा घातपाताचा कट उधळला गेल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएसला वैभववर संशय होता. त्यानुसार त्यावर पाळत ठेवून पोलिसांनी 'डॉग स्कॉड' आणि 'फॉरेन्सिक टीम'च्या साहाय्याने ही कारवाई केली. देशविघातक कारवाईसाठी उपयोगात येऊ शकणारी मोठ्या प्रमाणावरील घातक स्फोटके या माध्यमातून पोलिसांनी शोधली. पण ही कारवाई होताच कोण हा वैभव राऊत, हा प्रश्न समोर आला. 


कारवाईसोबतच तो 'सनातन' या बहुचर्चित संस्थेचा साधक असल्याची तसेच तो पकडल्याची चर्चा सुरू झाली. लगेच सनातन ही घातक संघटना आहे. अनेक ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट असो किंवा देशातील पुरोगामी विचारवंतांच्या हत्येत या संघटनेवर संशय आहे. या संघटनेवर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी समोर येऊ लागली. सनातन संस्थेने मात्र वैभव हा एक धडाडीचा गोरक्षक असून तो 'हिंदू गोवंश रक्षा समिती' या गोरक्षण संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता. हिंदू जनजागृती समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांत आणि आंदोलनांत तो सहभागी होत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो कोणत्याही उपक्रमात सहभागी नसायचा, अशी माहिती हिंदू जनजागरण समिती तसेच सनातन संस्थेच्या वकिलांनी स्पष्ट केली. तो चांगला कार्यकर्ता आहे. तो अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाही हे स्पष्ट करत त्याला मदत करण्याचेही सनातनने जाहीर केले आहे.

 
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेनंतर सगळ्याच बाजूने मोठी चर्चा सर्वत्र सुरू झाली. सनातन आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यासारख्या घटना आता नवीन राहिलेल्या नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांंची अटक यासारख्या प्रकरणांतून ते सिद्ध होत आले आहे. वैभवची अटक ही मालेगाव पार्ट -२ आहे का? अशी शंका येत असल्याचा संशय हिंदू जनजागरण समितीने व्यक्त केला आहे. 


सनातन ही भारतातील एक जहाल हिंदू संघटना असल्याचे समजले जाते. जयंत आठवले यांनी १९९९ च्या सुमारास या संस्थेची स्थापना केली. भारतात आणि भारताबाहेर या संस्थेच्या शाखांचा विस्तार झाला. धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र पनवेल, ठाणे, वाशी येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी या संस्थेवर संशयाची सुई होती. त्या दृष्टीने तपासही करण्यात आला. त्या वेळीही काही जणांना पकडण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची २०१३ मध्ये गोळ्या घालून झालेली हत्या, पुरोगामी चळवळीचे विचारवंत गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये झालेली हत्या तसेच कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धेच्या विरोधात लिखाण करणारे एम. एम. कलबुर्गी आणि २०१६ मध्ये झालेली पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या या घटनांचा पूर्ण तपास अद्यापही झालेला नाही. पण या सगळ्या घटनांचा तपास हा सनातन संस्था आणि त्यांच्या साधकांच्या भोवती फिरत राहिला आहे. याच कडीतील गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आणि या हत्येचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या अमोल काळे या आरोपीने तपासाच्या वेळी केलेल्या खुलाशात काही नावे समोर आली. त्यातीलच एक नाव वैभवचे होते. त्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. ही स्फोटके त्याने घरात का ठेवली, ती कोठून आणली, त्यांचा कोठे कसा वापर केला जाणार होता, या सगळ्यांची कसून तपासणी सुरू अाहे. राज्यातील महत्त्वाच्या चार शहरांत स्फोट घडवण्याचा कट होता यासह अनेक नवीन माहिती समोर येत आहे. वैभव राऊत हा आमचा साधक नाही हे सनातनने स्पष्ट केले आहे. पण हिंदू जनजागरण समितीने त्याला कायदेशीर मदत करण्याची भूमिका घेताना ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एटीएस आणि यंत्रणेवर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात तपासात खरे काय ते स्पष्ट होईलच, पण अशा प्रत्येक घातक घटनांच्या वेळी सनातनचेच नाव कसे समोर येते हा मोठा प्रश्न आहे. 
- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला 

बातम्या आणखी आहेत...