Home | Editorial | Columns | column article about shetkari kamgar paksh

प्रासंगिक : शेकाप सीमोल्लंघन करणार?

सचिन काटे | Update - Aug 04, 2018, 07:46 AM IST

स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात काँग्रेस या प्रभावी राष्ट्रीय पक्षात कार्यरत असलेल्या काही मंडळींनी हा पक्ष भांडवलदारां

 • column article about shetkari kamgar paksh

  स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात काँग्रेस या प्रभावी राष्ट्रीय पक्षात कार्यरत असलेल्या काही मंडळींनी हा पक्ष भांडवलदारांचे हित पाहणारा आहे, शेतकरी- कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेचा पक्षालाच विसर पडला आहे, निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासला जात आहे अशा निरीक्षणानंतर वेगळे काही तरी करण्याचा विचार केला आणि समविचारी मंडळींनी एकत्र येत शेतकरी- कामगारांसाठी एक संघ स्थापन केला. या संघाचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने केला, पण आरोप-प्रत्यारोपांनंतर अखेर ७१ वर्षांपूर्वी म्हणजे ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात उदयास आला.


  राज्याच्या राजकारणात या पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. उस्मानाबाद, रायगड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पक्षाचे वर्चस्व होते. १९६५ पर्यंतचा काळ शेकापसाठी सुवर्णकाळ होता. १९५२ मध्ये शेकापचे २८ आमदार निवडून आले होते. १९७७ पर्यंत पक्षाचे अस्तित्व न डावलता येणारे असेच राहिले. तत्कालीन पक्षप्रमुख शंकरराव मोरे हे तर खासदार म्हणून निवडले गेले होते. युतीत या पक्षाचे सहा खासदार निवडून गेले होते. विधानसभेत प्रभावी विरोधी पक्षनेता पदही या पक्षाकडे होते. पक्षाची ताकद सध्याही दुर्लक्षिता येणारी नाही. आज पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य कार्यरत असून रायगड, पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समिती, रायगड, नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर जिल्हा परिषद तसेच काटोल, बिलोलीसारख्या नगर परिषदांमध्ये शेकापचे वर्चस्व आहे.


  एकाहत्तरीत पदार्पण करणाऱ्या शेकापचे अधिवेशन औरंगाबादेत पार पडले. राज्यभरातील भारावलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे विद्यमान नेतृत्व पक्षाच्या ध्येयधोरणांवर या अधिवेशनात विचारमंथन करत भावी वाटचालीची आखणी करत आहेत. या अधिवेशनात दूरदूरवरून आलेले कार्यकर्ते पक्षाच्या वाटचालीवर भरभरून व्यक्त झाले. राज्यात पक्षाचे यश टिकवून ठेवण्यात पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचा मोठा वाटा आहे. पण हा पक्ष फक्त रायगडपुरता मर्यादित राहिला आहे. तो या जिल्ह्यातून बाहेर कधी येणार, हा कळीचा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल की काय, अशी सुप्त भीतीही कार्यकर्त्यांना वाटत आहे. या दोन्ही पक्षांतील संबंधांवरही ते आक्षेप घेत आहेत. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद कायम आहेत. लोकशाही टिकावी तसेच धर्मनिरपेक्ष सरकारच्या स्थापनेसाठी आपण त्यांच्यासोबतच्या आघाडीचा विचार करतो, असे सांगत जयंत पाटलांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पण कार्यकर्त्यांना त्यापलीकडे पक्षाने विस्तारासाठी व्यापक मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा आहे.


  गेल्या काही वर्षांत विशिष्ट ठिकाणे सोडली तर पक्ष अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. नवी पिढी, नवे बदलते प्रवाह आणि बदललेल्या राजकारणाला पक्षाने स्वीकारलेले नाही, अशी भावना तयार झाली आहे. त्यामुळेच नव्या पिढीला पक्षाचे फारसे आकर्षण राहिले नाही. पक्षातील जुने नेते त्या जुन्याच पद्धतीचे राजकारण आणि समाजकारण करतात, असेही आक्षेप आहेत. पक्षाचे तत्त्वज्ञान आणि संघटन या दोन्ही पातळ्यांवर मोठे काम व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा आहे.


  'प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येणार नाही. कोणताही पक्ष, वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारूढ झाला तरी तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करू शकणार नाही. या वर्ग संघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत,' हे या पक्षाच्या स्थापनेच्या वेळचे धोरण आखले होते आणि आजही पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे. पण पक्ष पातळीवर हे धोरण शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आहे का आणि ते तळागाळापर्यंत रुजण्यासाठी ठळक प्रयत्न व्हावेत आणि या विचाराचे लोक जोडले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करणारा एक वर्ग आहे.


  शेतकरी- कामगार वर्ग हा राज्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यासाठी असे पक्ष हक्काचे व्यासपीठ असतात. राज्यात कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या अनेक पक्ष, संघटना आहेत, पण तरीही गेल्या २५ वर्षांत राज्यात ७० हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत, हे दुर्लक्षिता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी, कामगारांचे भवितव्य असे अनेक प्रश्न आज राज्यासमोर आहेत, पण केवळ सत्ताप्राप्तीच्या पलीकडे जाऊन अशा प्रश्नांवर लढण्याचा ध्यास घेणारा पक्ष राज्यात पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करू शकतो.

  - सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला

Trending