आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्यांची साथ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युद्धापासून दंगलींपर्यंत, बायकोला मारण्यापासून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या हिंसेला संपूर्ण मान्यता देणारी कुटुंब, समुदाय संस्कृती प्रतिष्ठित मानली जाते, अशा समाजात आत्महत्यांची लागण पसरते आहे. त्यामुळे आज मराठा आरक्षणाची ठिणगी असली, तरी उद्या दुसरी ठिणगी पेटणारच नाही, याची खात्री देता येणार नाही. 


३ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १४ सुशिक्षित तरुणांनी आत्महत्या करून स्वतःला संपवले आहे. काकासाहेब शिंदे या २९ वर्षीय तरुणाने सर्वांदेखत कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावरून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीव देत आहे असे जाहीर करत उडी मारली. प्रमोद पाटील या तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकून आपण रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. रेणापूर तालुक्यातील अमोल जगताप या पंचवीस वर्षांच्या तरुणानेही रेल्वेखाली उडी घेऊन स्वतःला संपवले. याच साखळीत उमेश इंदाईत आणि तृष्णा माने आणि अनेक नावे वाढत गेली. जणू एखादा विषाणू भयकारक पद्धतीने पसरत जावा तशी आत्महत्यांची ही लागण चोहीकडे महाराष्ट्रात झालेली आपण पाहिली. विशेषतः मराठवाड्यात हा संसर्ग अधिक सघन झाल्यासारखी परिस्थिती आहे. आता ही साथ काहीशी नियंत्रणात आल्यासारखी भासत असली तरी रोगनिदान आणि उपचाराची दिशा याची चर्चा करणे अगत्याचे आहे. 


भारत हा लोकशाही आंदोलनांची भूमी म्हणूनही ओळखला जातो. परंतु या आंदोलनात वापरल्या जाणाऱ्या काही साधनांविषयी, अवजारांविषयी जनमानसात मतमतांतरे आढळून येतात. मोर्चे, धरणे, ठिय्या ही भारतातील आंदोलनांची समाजमान्य अवजारे आहेत. आज मराठा आंदोलनांमध्ये अनेक युवकांनी आपले आयुष्य संपवले, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. समाज माध्यमांच्या प्रभावाच्या आजच्या काळात आत्महत्येची ही प्रवृत्ती संसर्गजन्य झाली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. असे म्हणतात, की एक प्रजाती म्हणून मानवात जगण्याची तीव्र इच्छा असणे, हे त्याच्या नैसर्गिक प्रेरणांचे फळ आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही मानव विजिगीषू वृत्तीने मरण टाळण्याची धडपड करत असतो. हे सर्व खरे असले तरी सभोवताली आत्महत्या घडतच असतात. संपूर्ण जगात जपान या शिस्तप्रिय, पारंपरिक परंतु मानसिक पातळीवर काहीशा साचेबद्ध जीवन जगणाऱ्या देशात आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. संपूर्ण जगातच आत्महत्या वाढत आहेत. म्हणजे विरोधाभास असा की, एकीकडे जीवनमान उंचावते आहे, सुखसोयी वाढत आहेत. आयुष्यमानही वाढले आहे. सुख म्हणजे काय याची तांत्रिक, भावनिक, आर्थिक परिभाषा बदललेली आहे, त्यावर सतत विचारमंथन चालू आहे. आणि त्याच वेळी अनेक व्यक्तींना जीवन संपवावेसे वाटत आहे. आजवर भारतात अनेक सामाजिक आंदोलने झाली, परंतु, त्यातील मंडल विरोधासारख्या काही आंदोलनांतच आत्मक्लेश आणि आत्महत्या ही आयुधे वापरली गेली. सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांनी छेडलेल्या आंदोलनात, त्यातही दक्षिण भारतातील राजकीय मोहिमांमध्ये जणू साथ आल्याप्रमाणे आत्महत्या केल्या गेल्या. 


एमिल दुर्खीम या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने फ्रान्समधील आत्महत्यांवर संशोधन करून 'सुसाइड' नावाचा १८९७साली ग्रंथ प्रसिद्ध केला. तो या विषयावरचा पहिला समाजशास्त्रीय अभ्यास मानला जातो. त्याच्या मते, आत्महत्या ही केवळ मानसशास्त्रीय किंवा आनुवंशिक कारणमीमांसेने सिद्ध होणारी गोष्ट नव्हे, तर इतर सर्व सामाजिक वर्तनाप्रमाणे व्यक्ती ज्या समाजात जन्मते व वाढते तोच समाज तिच्या मृत्यूविषयक धारणांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती विकृत होती, म्हणून तिने आत्महत्या केली अशा प्रकारचे विवेचन तो नाकारतो. त्याच्या मते, आत्महत्या हे मूलतः सामाजिक रचितच आहे. सतीचे उदाहरण घेऊन दुर्खीम सिद्ध करतो की, समाजाशी अतिएकरूप झालेली स्त्री समाजासाठी आपणहून सती जाते तेव्हा लहानपणापासून ऐकवलेला सतीचा महिमाच तिला ती कृती करायला भाग पाडतो. तसेच सीमेवर आपण कोणत्याही क्षणी मरू शकतो हे माहीत असूनही सैनिक राष्ट्र या उदात्त कल्पनेसाठी मरण स्वीकारत असतातच. कारण राष्ट्रभक्तीपुढे मानवी चिवटपणा त्याला तुच्छ वाटायला हवा हे शिकवलेले असते. दुर्खीमच्या मते, दुसऱ्या प्रकारच्या आत्महत्या अतिव्यक्तिवादामुळे घडतात. अशा व्यक्तींच्या बाबतीत सामाजिक धागे इतके क्षीण झालेले असतात की, त्यापुढे मरणच स्वीकारार्ह वाटते. तिसऱ्या प्रकारात समाजातील मूल्यविहीनतेच्या प्रभावातून व्यक्ती आत्मनाश स्वीकारतात. दुर्खीमच्या विवेचनानुसार पाहिले तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आत्महत्यांमध्ये सर्व सुशिक्षित तरुणांनी नदीत उडी घेणे, आत्मदहन करणे, रेल्वेखाली उडी घेणे इ. कृती जाणीवपूर्वक करून मृत्यू स्वीकारलेला आहे. 


१८९७च्या फ्रान्समधील हे विवेचन तसेच्या तसे आज लागू पडणे अर्थातच शक्य नाही. परंतु, दुर्खीमने कोणकोणत्या सामाजिक घटकांमुळे व्यक्ती मृत्यू 'घडवते', हे स्पष्ट करताना मुळात या एकेकट्या सुट्या सुट्या अपवादात्मक घटना नसतात, तर इतर अनेक घटनांप्रमाणे ती समाजाने घडवलेलीच एक घटना असते हे वारंवार अधोरेखित केले आहे. अलीकडच्या या आत्महत्यांविषयी वृत्तपत्रांमध्ये "मराठा समाजबांधवांसाठी जीव दिला', असे गौरवात्मक वाक्प्रचार दिसतात तेव्हा जातीसाठी आत्महत्या करणे गरजेचे आहे असे सूचित केले जाते. वस्तुतः विसाव्या शतकात प्रत्येक सामान्य व्यक्ती ही इतिहास घडवू शकते या अर्थाने व्यक्तीला ती कर्ता आहे, असे मानले गेले. या विचारात व्यक्तीचे जीवन व भविष्य जात, जमात, धर्म, प्रदेश यांच्या पूर्ण अधीन नसते तर ते स्वतंत्र प्रज्ञेने, प्रयत्नांनी घडवता-बदलता येते, असा आधुनिक विचार आहे. अर्थात हा विचार नियतीवादाच्या विचारापेक्षा पूर्ण वेगळा आहे. आधुनिक कालखंडात व्यक्ती केंद्रस्थानी मानून तिची प्रयत्न करण्याची वृत्ती, प्रयोगशीलता, प्रज्ञा, उद्यमशीलता या इतिहास घडवू शकणाऱ्या बाबी मानल्या होत्या. त्यातूनच विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित नवी आर्थिक-सामाजिक रचना उभी राहिली. त्याचाच परिणाम म्हणून सार्वभौम नागरिक केंद्रस्थानी मानणारी लोकशाही आली. परंतु, त्याचबरोबर एकूण समाजरचनाही व्यक्तीची प्रतिष्ठा, तिचे हक्क, तिचे सार्वभौमत्व आणि विचारीपण या पायांवर उभी राहिली. युरोप-अमेरिकेतील एकोणिसाव्या शतकापासूनची नवसमाजनिर्मिती अशा प्रकारे व्यक्तीला कर्ता मानणे या सूत्राभोवती राहिली. 


याउलट भारतात राजकीय स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी सामाजिक पातळीवर मानवी प्रतिष्ठेची जाण असणारी सार्वभौम प्रगल्भ व्यक्तिकेंद्री रचना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. तर कुटुंब, शेजारीपाजारी, मित्रमंडळी या सर्व समुदायामध्येदेखील व्यक्तीपेक्षा जातीची प्रतिष्ठा महत्त्वाची, वैचारिक प्रगल्भतेपेक्षा पैसा आणि बळाचा वापर करण्याची क्षमता महत्त्वाची मानली जाते. पुरुषत्वाची आक्रमक-कोणाचेच मत ऐकून घेणारी, स्वतःचेच मत लादणारी अशी एकारलेली स्वकेंद्री कल्पना प्रत्ययाला येते. युद्धापासून दंगलींपर्यंत, बायकोला मारण्यापासून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या हिंसेला संपूर्ण मान्यता देणारी कुटुंब, समुदाय संस्कृती प्रतिष्ठित मानली जाते, अशा समाजात या आत्महत्यांची लागण पसरते आहे. त्यामुळे आज मराठा आरक्षणाची ठिणगी असली तरी उद्या दुसरी ठिणगी पेटणारच नाही, याची खात्री देता येणार नाही. अलीकडच्या काळातील समाजशास्त्रीय मीमांसेत 'ट्रस्ट अँड रिस्क' या संकल्पना मांडल्या गेल्या. माणसे जगतात ती अनेक प्रकारची जोखीम घेऊन. पण ती घेण्याचे बळ लाभते ते वेगवेगळ्या मूल्य, व्यवस्थांवरच्या विश्वासातून. विश्वासाचा अतूट धागाच माणसाला तारून नेतो. पण जेव्हा सामुदायिकतेवरील विश्वासाला तडा जातो, तेव्हा जणू जगण्याचा पाया हलतो. 


सुशिक्षित, विशीतली तरुण माणसे आपणहून स्वत:चा जीव घेतात, तेव्हा समाज म्हणून आपण निव्वळ हळहळणे पुरेसे नाही तर विश्वासाच्या हललेल्या पायावरील उपाययोजनांचा विचार करायला हवा. विसाव्या शतकाचा अंत होताना केवळ सोव्हिएत युनियनचाच नाही, तर गरिबाच्या गरिबीचे कोणतेही समर्थन असू शकत नाही, यासह अनेक मूल्यव्यवस्थांचाही पाडाव झाला. ज्या प्रकारच्या मानवी मूल्यांच्या आधारे विसाव्या शतकातील समतासंगर उभे राहिले, त्या मूल्यरचना कालबाह्य ठरवणारी नवी अर्थव्यवस्था आली असली, तरी जगभरची गरिबी संपलेली नाही, लाखोंच्या वाट्याला आजही मानवी प्रतिष्ठा आलेली नाही. वंचना, शोषण आणि त्याविषयीचा संताप जगभर वाढत चालला आहे. 

- श्रुती तांबे, समाजशास्त्र विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ 
stambe@unipune.ac.in 

 

बातम्या आणखी आहेत...