आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : विघ्न स्वाइन फ्लूचे !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वामध्येे उत्साह अन् आनंदाला उधाण आले असताना त्यावर भीतीचे सावटदेखील होते. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये भीती अर्थातच जीव घेण्याइतपत गंभीर अशा स्वाइन फ्लूची बघायला मिळाली. डेंग्यूचा फैलाव सुरू असतानाच त्यांच्यासोबतच स्वाइननेही घुसखोरी केली. आरोग्य यंत्रणा अपेक्षेइतकी सक्रिय नसल्यामुळे किंबहुना त्यांची भूमिका प्रबोधनापुरतीच मर्यादित राहिलेली असल्याने नेमके काय करायचे, वेळीच काय काळजी घ्यायची हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे नाशिककरांची अवस्था शोचनीय झाल्याचे बघायला मिळाले. 


स्वाइन फ्लू अर्थातच एच1 एन1 या हवेतून पसरणाऱ्या आणि अतिसंसर्गजन्य आजाराचे संकट अचानक उद््भवलेले नाही. साधारणत दशकापूर्वी सर्दी, ताप, पडसे, अंगदुखी अशा स्वरूपाच्या किरकोळ आजाराच्या रुग्णांना धाप लागणे, श्वसनास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागली होती. जेव्हा काही रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येऊ लागली तेव्हा या गंभीर आजाराचे निदान केले गेले. त्यामुळे लोक गर्दीत वावरणे टाळत होते तसेच अत्यावश्यक असल्यास मास्क लावणे, निलगिरी तेल लावणे अशी दक्षता घेतली जात होती. त्यानंतर उपचारासाठी टॅमी फ्लू या गोळीचा रामबाण उपाय शोधला गेला. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लूचा पुरेसा साठा आल्यानंतर लोकही काहीसे निश्चिंत झाले. दरवर्षी पावसाळा ते हिवाळा यादरम्यान सहा ते सात महिने स्वाइन फ्ल्ूचा धोका हमखास ठरलेला असतो. दरवर्षी या संकटाचा सामना करावा लागणार आहे हे माहीत असूनही महापालिका असो की राज्य शासनाचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग हे योग्य ती काळजी घेत नाही ही बाब सर्वात दुर्दैवी आहे. चार-दोन होर्डिंग लावले, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असाच आविर्भाव यांचा दिसत आहे. मुळात महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन दर आठवड्याला तेथील रुग्णांची माहिती संकलित करून त्यांना योग्य त्या उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पाठवणे अपेक्षित आहे, जेणेकरून गंभीर आजाराबाबतच्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन होऊन पुढील उपचार सुखकर व्हावे हा त्यामागचा उद्देश. 

प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत कागदोपत्री घरभेटी देण्याचे प्रकार वाढले आहेत. आजघडीला जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत नाशिक शहरामध्ये कागदोपत्री रुग्ण ४५ पेक्षा अधिक आहेत. यातील ३० पेक्षा अधिक रुग्ण हे गेल्या महिनाभरामधील आहेत. यावरूनच या आजाराची तीव्रता लक्षात यावी. अर्थात, खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. वस्तुस्थिती लोकांसमोर जाणे आवश्यक असून स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले या बाबीमुळे जरी भीती पसरणार असेल तर त्यामुळे लोक संसर्ग टाळण्यासाठी अधिकाधिक सजग होतील. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन आता रुग्ण कोणत्या उपचारासाठी दाखल झाला आहे व त्यावर योग्य पद्धतीने उपचार होत आहेत का याचीदेखील माहिती घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाला परवडेल तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांना परवडेल अशा दरात सरकारी रुग्णालयांत चांगले उपचार देणे किंवा ते शक्य नसल्यास खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवून योग्य पद्धतीने कसे उपचार होतील हे बघण्याची जबाबदारी अधिकाधिक असेल. भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांच्या सासऱ्यांचे स्वाइन फ्लूमुळे निधन झाल्याचे निदान झाल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, मग सर्वसामान्यांचे काय ? जेथे नगरसेवकाचा फोन गेल्यानंतरही यंत्रणा हातपाय हलवत नसेल तेथे सर्वसामान्यांची काय गत असेल याबाबत विचार न केलेलाच बरा. 


मुळात नाशिकची 'हवा' राज्यभरात चर्चेत असते. चांगल्या हवामानामुळे बरेचसे बाहेरून आलेले अधिकारीदेखील येथे स्थायिक होण्यासाठी इच्छुक असतात. चांगल्या हवामानामध्ये उत्तम आरोग्याचे गुपित असल्यामुळेच की काय राज्याचे आरोग्य खातेदेखील नाशिककडेच प्रदीर्घ काळ राहिले. डॉ. बळीराम हिरे ,पुष्पाताई हिरे, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. शोभा बच्छाव अन् आता आपले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण असले तरी त्यांच्या पुढाकाराने ज्या रीतीने जिल्हास्तरीय आरोग्य शिबिरे भरवली जातात ते पाहता त्यांनाही आरोग्यात इंटरेस्ट दिसतोच आहे. मात्र अशी जबाबदारी असणाऱ्या नाशिकवर सध्या केवळ स्वाइन फ्लू नव्हे, तर डेंग्यू ,चिकुनगुन्या अशा आजारांचे विघ्न कोसळले आहे. हे विघ्न दूर करण्यासाठी आता केवळ सरकारी यंत्रणेवरच विसंबून चालणार नाही तर प्रत्येकाने सजग होऊन वेळेत उपचार घेऊन स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे. 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 
 

बातम्या आणखी आहेत...