Home | Editorial | Columns | column article about tamil nadu politics

तामिळनाडूत 'नवा सूर्य' उगवेल काय?

राजा कांदळकर | Update - Sep 11, 2018, 09:12 AM IST

सध्या ६५ वर्षे वय असलेले स्टॅलिन हे १४ व्या वर्षी राजकारणात सक्रिय झाले. हे साल होतं १९६७.

 • column article about tamil nadu politics

  सध्या ६५ वर्षे वय असलेले स्टॅलिन हे १४ व्या वर्षी राजकारणात सक्रिय झाले. हे साल होतं १९६७. तेव्हा स्टॅलिन यांनी करुणानिधींचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. पोक्त राजकारणी नेत्यासारखा हा पोरगा तेव्हा तामिळ मतदारांना भावला. त्यानंतर गेली ५० वर्षे ते तामिळनाडूच्या राजकारणात कार्यरत आहेत. आज त्यांच्याएवढा राजकीय व प्रशासकीय अनुभव तामिळनाडूत नव्या नेतृत्वापैकी कुणाकडेही नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या जोरावर ते द्रमुकचे नेते झालेत.


  तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचं निधन झालं तेव्हा त्याचं वर्णन तामिळ प्रसारमाध्यमांनी सूर्यास्त असं केलं होतं. कुणा नेत्याच्या जाण्यानं सूर्य अस्ताला जात नसतो. तो दररोज उगवतो, मावळतो. पण आपल्या प्रिय नेत्याविषयी भावना व्यक्त करण्याचा तो कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. करुणानिधी यांच्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या अध्यक्षपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड झालीय. करुणानिधींनीच त्यांना आपला राजकीय वारस म्हणून जाहीर केलं होतं.


  करुणानिधींची तीन अपत्ये राजकारणात अग्रभागी आहेत. स्टॅलिन, अलगिरी आणि मुलगी कनिमोळी हे तिघे. पण त्यातून अलगिरी यांना दूर ठेवून स्टॅलिन यांना करुणानिधींनी पसंती दिली. स्टॅलिन यांना करुणानिधींनी पसंती का दिली? सध्या ६५ वर्षे वय असलेले स्टॅलिन हे १४ व्या वर्षी राजकारणात सक्रिय झाले. हे साल होतं १९६७. तेव्हा स्टॅलिन यांनी करुणानिधींचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. पोक्त राजकारणी नेत्यासारखा हा पोरगा तेव्हा तामिळ मतदारांना भावला. त्याच्यातले राजकीय गुण पुढे अधिक स्पष्ट दिसू लागले. १९७५ मध्ये आणीबाणीच्या आंदोलनात स्टॅलिन काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरले होते. तेव्हा ते पंचविशीत होते. त्या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही घडला होता. पंचविशीच्या आत स्वतःची राजकीय कर्तबगारी दाखवून स्टॅलिन द्रमुक पक्षाच्या युवा आघाडीचे नेते बनले. पुढे १९९६ मध्ये ते चेन्नईचे महापौर म्हणून जनतेतून निवडून आले. १९८९ मध्ये तामिळनाडू विधानसभेचे आमदार झाले. महापौर, आमदार म्हणून स्वतःचा ठसा उमटवत करुणानिधी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली. या वेगवान राजकीय वाटचालीत स्टॅलिन यांना घरातूनच अनेकदा विरोध झाला. पण करुणानिधी कायम स्टॅलिनच्या बाजूने कौल देत राहिले.


  करुणानिधींचं कुटुंब मोठं आहे. तीन पत्नींचा त्यांचा अपत्य विस्तार. स्टॅलिन हे दुसऱ्या पत्नी दयाळू अम्माल यांच्यापासून झालेलं अपत्य. त्याचं नाव स्टॅलिन का ठेवलं, त्याची कथा सुरस आहे. या मुलाचं नाव करुणानिधींना अय्यादुराई ठेवायचं होतं. तामिळ लोक द्रविड अस्मिता चळवळीचे नेते पेरियार रामस्वामी नायकर यांना आदराने अय्या म्हणत. अय्या म्हणजे मोठा माणूस. पेरियार यांचं अय्या हे संबोधन आणि द्रविड पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांच्या नावातलं दुराई हे नावं एकत्र करून या मुलाचं नाव अय्यादुराई ठेवावं असं ठरलं. पण नेमकं त्याच वेळी रशियातील कम्युनिस्ट नेते स्टॅलिन यांचं १९५३ मध्ये निधन झालं. स्टॅलिन वारले त्यावर्षी जन्मलेला मुलगा म्हणून नाव स्टॅलिन ठेवलं. त्यात करुणानिधींची विचारसरणी डावीकडे झुकलेली. ते स्वतः नास्तिक. कम्युनिस्ट विचारांशी बांधिलकी आणि स्टॅलिनविषयी आदर म्हणून मुलाचं नाव स्टॅलिन.


  स्टॅलिन हे नाव असलेला हा मुलगा पुढे नास्तिक निघाला. हा योगायोग नाही. या मुलाची जडणघडण तशी झाली. द्रविड चळवळीचा पाईक, गरिबांसाठी झटणारा हा मुलगा हरहुन्नरी निघाला. मुळात करुणानिधी हे स्वतः कलाकार, लेखक, पत्रकार. तामिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी लिहिलेले चित्रपट गाजले. एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता अशा दिग्गज नटनट्यांनी करुणानिधींच्या चित्रपटात काम केलं. यश मिळवलं. हे चित्रपट तामिळ जनतेनं डोक्यावर घेतले. वडिलांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं स्टॅलिन यांनी वृद्धिंगत केलं. १९७८ मध्ये त्यांनी 'नबीक्कदूनचतक्रम' हा तामिळ चित्रपट काढला. १९८८ मध्ये स्वतः 'ओरेरथम' या चित्रपटात वाखाणण्याजोगा अभिनय केला. अभिनेता म्हणून नाव कमावलं. नंतर काही तामिळ टीव्ही मालिकांमध्ये कामं केली.


  स्टॅलिन उत्तम क्रिकेट खेळतात. बॅडमिंटन, बुद्धिबळात पटाईत आहेत. करुणानिधींना वर्षभरापूर्वी मृत्यूची चाहूल लागली होती. तेव्हाच त्यांनी मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. तेव्हापासून अलगिरी हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेले चिरंजीव दुखावून दूर गेले होते. पण तरीही पुढच्या काळाची गरज ओळखून करुणानिधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. द्रमुकची सर्व सूत्रे त्यांनी स्टॅलिन हाती सोपवली.


  द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचं चिन्ह उगवता सूर्य आहे. झेंडा काळ्या व लाल रंगाचा आहे. तामिळनाडूत नवा सूर्य असं प्रसारमाध्यमांनी स्टॅलिन यांचं वर्णन केलं त्याला पार्श्वभूमी तशीच आहे. सध्या तामिळनाडू अभूतपूर्व संकटातून वाटचाल करतंय. जयललिता, करुणानिधींसारखे नेते आता नाहीत. अण्णा द्रमुक हा पक्ष सत्तेवर असला तरी तो गटबाजीने पोखरलाय. जयललितांनंतर त्या पक्षाकडे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता नाही. अभिनेते कमल हसन, रजनीकांत हे तिथल्या राजकारणात हातपाय मारू पाहत आहेत, पण त्यांना अजून सूर गवसलेला नाही. प्रचंड मोठी राजकीय अस्थिरता तामिळ जनतेच्या वाट्याला आलेली आहे.


  एकीकडे राज्याला नेता नाही, राजकीय अस्थिरता आहे आणि दुसरीकडे राज्यापुढचे प्रश्न बिकट होत आहेत. हे राज्य शेतीप्रधान आहे. शहरी भागात उद्योग आहेत. विशेषतः लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतीमालाला गेली चार वर्षे भाव नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. नोटबंदीनंतर लघुउद्योगाचं कंबरडं मोडलंय. राज्यात रोजगाराचं संकट मोठं आहे. आहे त्या कामगारांचे रोजगार धोक्यात येत आहेत. या राज्याला मोठी समुद्रकिनारपट्टी आहे. त्या किनारपट्टीवरच्या मच्छीमारांचे प्रश्न आहेत. वेदांता कंपनीचा स्टरलाइटचा प्रकल्प स्थानिकांना डाचतोय. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेत. थुथुकुडी इथं स्थानिकांना या प्रकल्पामुळे प्रदूषणाने कॅन्सरसारखे भयावह आजार झाल्याचं वास्तव पुढे आलंय. तिथले गरीब, शेतकरी, मच्छीमार या प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करताहेत. केंद्र व राज्य सरकार या आंदोलकांना दडपतंय. त्यामुळे या किनारपट्टीच्या भागात अशांतता आहे. कर्नाटक-तामिळनाडू या राज्यातील भांडणाचं कारण ठरलेला कावेरी पाणीवाटप प्रश्न लोंबकळता आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. वीज, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचे नेहमीचे प्रश्न आ वासून आहेतच. तामिळनाडूत शिक्षणाचे प्रश्न तेवढे तीव्र नसले तरी राज्याची आरोग्य व्यवस्था जवळपास आजारी आहे. वाळू माफियांमुळे कायदा सुव्यवस्था आणि नदी पर्यावरण धोक्यात आहे. शेती संकटात आणि रोजगाराचा अभाव त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.


  अशा अवघड वळणावर तामिळनाडू उभा असताना लोक स्टॅलिन यांच्याकडे उगवता सूर्य म्हणून पाहत आहेत. स्टॅलिन यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून इतिहासाची पदवी घेतलीय. त्यांना द्रविड चळवळ, तामिळ अस्मितेचा परिचय आहे. ५० वर्षे ते राजकारणात आहेत. या राज्याचं नेतृत्व करणं ही तारेवरची कसरत आहे. या राज्याच्या नेत्याला देशाचे प्रश्न बोलून चालत नाही. त्याला तामिळहिताला प्राधान्य द्यावं लागतं. म्हणून तामिळ नेता कधी देशाचा नेता होत नाही. काँग्रेस नेते कामराज हे शेवटचे तामिळ राष्ट्रीय नेते झाले. त्यांना स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी होती. त्यांच्यानंतर अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी व जयललिता यांनी तामिळनाडूचं नेतृत्व केलं. पण त्यांना राष्ट्रीय नेता होता आलं नाही. केंद्रात आघाडीच्या राजकारणात करुणानिधी, जयललिता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली जरूर, पण तामिळनाडूबाहेर त्यांचं नेतृत्व कधी जाऊ शकलं नाही.


  उत्तरेची मुजोरी आणि हिंदी भाषेला विरोध. तामिळ, द्रविड अस्मितेचा अहंगंड या कात्रीत आजपर्यंत तामिळ राजकारण हेलपाटत राहिलंय. स्टॅलिन यांना कमल हसन, रजनीकांत अशा लोकप्रिय नेत्यांशी स्पर्धा करत स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावे लागेल. आज त्यांच्याएवढा राजकीय व प्रशासकीय अनुभव तामिळनाडूत नव्या नेतृत्वापैकी कुणाकडेही नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या जोरावर ते द्रमुकचे नेते झालेत. पण तामिळनाडूचं नेतृत्व ते करू शकतील काय, या प्रश्नाचा सोक्षमोक्ष येत्या काळात लागणार आहे. म्हणून तामिळ प्रसारमाध्यमं नवा सूर्य उगवेल काय? अशी चर्चा करत आहेत.

  - राजा कांदळकर
  rajak2008@gmail.com

Trending