आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वसुधैव कुटुंबकम‌्'ची नितांत आ‌वश्यकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ५० वर्षांचा कालखंड हा तसा पाहिल्यास माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासातला सर्वात शांततामय कालखंड आहे. ही अशी जागतिक शांतता आणण्यासाठी जगभरातल्या राष्ट्रांमधला परस्पर सहकार्याचा व्यवहार आणि उदारीकरणाचे धोरण कारणीभूत होते. या शांततामय कालखंडात जन्माला आलेल्या लोकांनी कधीही युद्ध पाहिलेले नाही, जीवघेणे साथीचे रोग काय असतात हे त्यांना माहिती नाही आणि भुकेची मूलभूत ओळखही ते विसरून चालले आहेत. उदारमतवादामुळे शक्य झालेल्या या स्थैर्यातून उद््भवलेली परिस्थिती काहींना अस्वस्थ वाटू लागली. 


संयुक्त राष्ट्रांची ७३वी वार्षिक परिषद नुकतीच न्यूयॉर्क शहरात पार पडली. १९३ सदस्य राष्ट्रांच्या या बैठकीस निरनिराळ्या देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रांच्या रिवाजानुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना या बैठकीत सर्वप्रथम भाषण करण्याची संधी दिली जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बैठकीस पोहोचण्यासाठी वेळ लागला. या विलंबामुळे सगळ्या जगाला आपली वाट पाहावी लागते, असा विचार ट्रम्प यांच्या मनात आला असावा की काय अशी शंका यावी. ट्रम्प हे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ते आपल्या समर्थकांना उद्देशून भाषण करतात. ही युक्ती त्यांनी संयुक्त राष्ट्रांना उद्देशून केलेल्या भाषणातही वापरली. नेहमीप्रमाणेच आपण अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेची कशी भरभराट होते आहे आणि आपल्यामुळेच अमेरिकेचा कसा विकास होतो आहे हे पालुपद त्यांनी आपल्या भाषणात आळवले. हे इथपर्यंत चालते तर ठीक, पण आपल्या प्रशासनाने अमेरिकेच्या इतिहासात कुठल्याही प्रशासनापेक्षा जास्त कामे केली असल्याचे ट्रम्प यांनी विधान केले. त्यांच्या या विधानानंतर आमसभेत उपस्थित लोकांमध्ये हशा पसरला. संयुक्त राष्ट्रांच्या ७३ वर्षांच्या इतिहासात एखाद्या देशाचा नेता बोलत असताना उपस्थितांमध्ये हशा पसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपलीच प्रशंसा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रम्प यांनी उर्वरित जगाला आपल्यावर आणि पर्यायाने अमेरिकेवर हसण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. या प्रसंगानंतर उर्वरित जगाशी आता ट्रम्प कसे वागतात यावर माध्यमे लक्ष ठेवून आहेत आणि ते हा प्रसंग सहज विसरून जातील अशी आशा करणेही सर्वार्थाने चूक आहे. 


गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात निवडून आल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी चीनप्रति असलेल्या अमेरिकेच्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली. वर्षभरात त्यांनी सर्वप्रथम चीनवरून येणाऱ्या सौरऊर्जेच्या पॅनल्सवरती आयात कर लादला. त्यानंतर जुलै महिन्यात चीनवरून आयात होणाऱ्या ३० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंवरती २५% इतका जास्त आयात कर लादला, ज्याला चीनने प्रत्युत्तर देत अमेरिकेहून येणाऱ्या वस्तूंवरही आयात कर लादला आणि अमेरिका व चीन व्यापारयुद्धाला सुरुवात झाली. प्रारंभी फक्त व्यापार संस्थांच्या व्यवहारांत हस्तक्षेप करणाऱ्या या व्यापारयुद्धाच्या दुसऱ्या हल्ल्यात ट्रम्प यांनी या आठवड्यात चीनवरून येणाऱ्या २०० अब्ज डॉलर इतक्या मोठ्या आयातीवर कर लादण्याचे ठरवले. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेहून येणाऱ्या ६० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कर वाढवण्याचे ठरवले आहे. उत्पादनांवर लादल्या जाणाऱ्या या करांचे आकारमान पाहता त्याचे भांडवली बाजारावर परिणाम होणे साहजिकच. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारे विविध आकडे आणि अमेरिकेचे उर्वरित जगाशी विस्कळीत होत जाणारे संबंध यामुळे अनेक देशांच्या भांडवली बाजारावर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली. यात अगोदरच अस्थिर असलेला मुद्रा बाजार आणखी विस्कळीत झाला, ज्यात अनेक देशांच्या चलनविनिमयाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरला. काही ठिकाणी तो आता इतका जास्त घसरला आहे की त्या देशांमध्ये लवकरच आर्थिक आणीबाणी उद््भवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय इराणसारख्या देशाची विशेष आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी ट्रम्प यांनी उघडलेली मोहीम इराणकडून पेट्रोलियम पदार्थ आयात करणाऱ्या देशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. अमेरिकेशी थेट वाकडे घेण्याची क्षमता नसलेल्या देशांना आता पेट्रोलियमसाठी इतर देशांचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत, ज्यामुळे आधीच वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीत आणखी भर पडू शकते. 


'मेक अमेरिका ग्रेट अगेन' अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा ध्यास लागला आहे. आपण कधीकाळी एक महान राष्ट्र होतो आणि परकीयांमुळे आपली आज अशी अवस्था झाली आहे, अशा वल्गना करणारे अनेक नेते गेल्या पाच वर्षांत जगाने निवडून दिले आहेत. संकुचित राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या या नेत्यांना निवडून देणाऱ्या लोकांची मानसिकताही विश्वबंधुत्वाच्या भावनेच्या विपरीत असते. राष्ट्रभावनेने प्रेरित झालेल्या लोकांना आपला देश जगातील सर्वश्रेष्ठ देश आहे असे वाटते आणि त्यांना ते तसे वाटण्यात एरवी काही गैरही नसते. प्रश्न तेव्हा सुरू होतो, जेव्हा हा संकुचित राष्ट्रवाद जगापासून अलिप्त होऊन आपले राष्ट्र विरुद्ध उर्वरित जग अशी भूमिका घेतो. गेली ५० वर्षे उदारमतवादाच्या ज्या मार्गावर जग चालले होते त्यातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या. अविकसित राष्ट्रांना किमान पोटापुरते अन्न मिळाल्याने त्यांनी भुकेवर विजय मिळवला. काही तुरळक प्रसंग वगळता कुठेही मोठे युद्ध झाले नाही आणि हजारो वर्षांपासून कोट्यवधींचा बळी घेणारे अनेक असाध्य साथीचे रोग आटोक्यात आणण्यात जग यशस्वी झाले. गेल्या ५० वर्षांचा कालखंड हा तसा पाहिल्यास माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासातला सर्वात शांततामय कालखंड आहे. ही अशी जागतिक शांतता आणण्यासाठी जगभरातल्या राष्ट्रांमधला परस्पर सहकार्याचा व्यवहार आणि उदारीकरणाचे धोरण कारणीभूत होते. या शांततामय कालखंडात जन्माला आलेल्या लोकांनी कधीही युद्ध पाहिलेले नाही, जीवघेणे साथीचे रोग काय असतात हे त्यांना माहिती नाही आणि भुकेची मूलभूत ओळखही ते विसरून चालले आहेत. उदारमतवादामुळे शक्य झालेल्या या स्थैर्यातून उद््भवलेली परिस्थिती काहींना अस्वस्थ वाटू लागली असून या अस्वस्थ मंडळींना संकुचित राष्ट्रभक्तीचे धडे देणारे विविध राजकीय पक्ष जगभरात आपली पकड मजबूत करत आहेत. आपले राष्ट्र हे जगातले सर्वश्रेष्ठ राष्ट्र असून ते लवकरच महासत्ता बनण्याचे स्वप्न अनेक राष्ट्रवादी नेत्यांना पडायला लागले आहे. या महासत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपल्या राजकीय समर्थकांच्या मदतीने सबंध देशच वेठीस धरल्याचे दिसून येते. 


उदारमतवादाचे धोरण स्वीकारल्यानंतर आपल्या देशांत उत्पादित न होणाऱ्या कितीतरी गोष्टींचा लाभ जगभरातल्या लोकांना घेता आला. या गोष्टींमध्ये फक्त चैनीच्या वस्तूंचाच नाही तर तंत्रज्ञान, पेट्रोल, अन्नधान्य, औषधे यांचाही समावेश होता. जगाचा सध्याचा अर्थव्यवहार हा उदारमतवादातून आलेल्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असून सद्य:स्थितीत कुठलाही देश स्वयंपूर्ण नाही. तो तसा होणे कित्येक राष्ट्रांना शक्यही नाही. असे असूनही राष्ट्रवादाची री ओढत राहून इतर देशांशी आर्थिक वैर केल्याने अशा कितीतरी गोष्टी, ज्या एरवी सामान्यतः सहजपणे बाजारात उपलब्ध होत्या त्यांच्या किमती अवास्तव वाढण्यात वा त्या गोष्टी बाजारातून थेट अदृश्य होण्यास सुरुवात झाली आहे. यात सुरुवातीच्या काळात अनेक चैनीच्या गोष्टींचा समावेश असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अनेकांना जाणवून येत नव्हते. पण या महिन्यात अनेक ठिकाणी पेट्रोल, अन्नधान्य, फळफळावळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला भिडायला लागल्यानंतर काहीतरी बिघडले आहे याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. 

 

ही परिस्थिती बिघडण्यासाठी स्थानिक सरकार जबाबदार आहे, असे अनेकांना वाटत असून ते काही अंशी खरे असले तरी अंतिम सत्य नाही. अमेरिकेने सुरुवात केलेल्या व्यापारयुद्धांमध्ये काही राष्ट्रे ठरवून आणि पूर्वतयारीनिशी उतरली आहेत, तर काही राष्ट्रांना नाइलाजाने या युद्धात भाग घ्यावा लागत आहे. केवळ मतपेटीतून सरकार बदलून ही परिस्थिती सुधारली जाऊ शकत नाही. जगासमोर उभ्या असलेल्या समस्यांचा पेच सोडवण्यासाठी संकुचित राष्ट्रवादाला तिलांजली देत एक जग, एक मानवजात आणि एक मानवी समाज या पातळीवर आता जगभरातल्या नागरिकांना विचार करण्याची गरज आहे. उदारमतवादाच्या आणि विश्वबंधुत्वाच्या या समीकरणात राष्ट्रभावना पूर्णतः तिलांजली द्यायला हवी असे मात्र नाही. आपल्या देशाप्रति प्रामाणिक आणि निष्ठावान राहूनही इतर देशांचा व माणसांचा सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो. या सहानुभूतीच्या सहकार्यातूनच जागतिक आव्हानांना सामोरे जाता येऊ शकते. 
भारतीय तत्त्वज्ञानात उपनिषदांनी दिलेले 'वसुधैव कुटुंबकम‌्' हे तत्त्व आता जगाने आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. 

- राहुल बनसोडे 
rahulbaba@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...