आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायपॉल : व्यापक, उत्सुक प्रश्नकर्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताबद्दल सर्वंकष लिखाण करताना नायपॉल यांनी नक्की भारतीय की परकीय म्हणून भूमिका ठेवली. हा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणूनच समीक्षकांच्या मते, नायपॉल त्यांच्या लिखाणातून त्रिनिदादबाबतचा भ्रमनिरास, भारताबाबतची निराशा आणि बेघर असल्याची काळजी, यांचे विविध टप्पे प्रतिबिंबीत होतात. 


नायपॉल यांनी रंगवलेले भारताविषयी नकारार्थी चित्र वाचकांना धक्का व क्लेश देऊन जाते. कारण विविध मतप्रवाहांनुसार भारतातील विकासाचा आशादायी किरण दुर्लक्षित करून लेखकाने फक्त अाजूबाजूचा नकारार्थी अंधार शोधला आहे. या अंधारामुळे चुकीची माहिती, गैरसमज, तात्कालिक परिस्थिती व प्रवाह याआधारे गैरसमज निर्माण करणारी चित्र रंगवले आहे. 


जागतिक साहित्य परंपरेच्या विश्वात अनेक लेखकांच्या सृजनशील लेखणीने जगाला पर्यायाने मानवजातीला नवीन विचाराने व दृष्टिकोनाने समृद्ध केले. साहित्य परंपरेच्या इतिहासात मानाचे पान म्हणून ओळख जपतानाच स्वतंत्र मते व समीक्षात्मक दृष्टिकोन या पैलूंच्या आधारे विचारधारांनी युक्त असलेल्या आणि अांतरराष्ट्रीय कीर्तिपटलावर करोडो वाचकांच्या मनावर कायमस्वरूपी ओळख कोरणाऱ्या सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 


त्रिनिदादमध्ये जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लेखकाला स्वीडिश अकादमीने त्याने जगाच्या दबलेल्या इतिहासाच्या प्रकटीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी २००१ मध्ये साहित्याच्या सर्वोच्च नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले. जागतिकीकरणाच्या काळातील मानवी स्थलांतर, ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराचा उलगडा, हद्दपारीचे विडंबन, माणसा-माणसातील समज आणि गैरसमज यातील द्वंद्व इत्यादी विषयांवर स्वतंत्र व परखडपणे भाष्य करणाऱ्या नायपॉल यांना जगभर व्यापक विश्लेषक, सामाजिक सत्याचा उत्सुक प्रश्नकर्ता आणि कठोर समीक्षक म्हणून ओळखले जाते. 


नायपॉल यांचे हिंदू भारतीय कुटुंब त्रिनिदाद येथे भारतातून स्थलांतरित झाले होते. तथापि शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये येऊन नायपॉल तेथेच राहिले. अ हाऊस ऑफ मि. विश्वास, अ बेंड इन अ रिव्हर, अ वे इन द वर्ल्ड, इनिग्मा ऑफ अरायव्हल अशा साहित्यकृतीतून त्यांनी कॅरेबियन जीवनशैलीवर उपहासात्मक प्रकाश टाकला. त्याचबरोबर व्यक्तीची स्व म्हणून ओळख मिळवण्याची धडपड, स्वातंत्र्याची ओढ यावर प्रकाश टाकला. धकाधकीच्या आयुष्यात माणूस स्वत:ची ओळख व चेहरा हरवतो. आधुनिकीकरणाच्या रेट्यात ही गोष्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवते. नायपॉल यांच्या साहित्यकृती नेमकी हीच बाब हेरून प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या हुंकाराला ओळख आणि आकार देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच व्यक्तिस्वातंत्र्याची आस दिसू लागते. 


नायपॉल यांचे लेखन फक्त नव्याने स्थापलेल्या कॅरेबियन राष्ट्र, तेथील राजकीय धूसर भवितव्य इत्यादी विषयांबाबत मर्यादित नव्हते. वंशाने भारतीय असलेल्या नायपॉल यांनी साहित्यकृतीतून भारतीय समाजरचना व संस्कृती यावर भाष्य केले. १९६५ मध्ये प्रकाशित झालेले 'अॅन एरिया ऑफ डार्कनेस', 'इंडिया अ वुंडेड सिव्हिलायझेशन (१९७७) आणि 'ए मििलयन म्युटिनीज नाऊ (१९९०)' या पुस्तकातून नायपॉल भारतीय इतिहास व समाजव्यवस्थेचा मागोवा घेतात. याबाबत भूमिका मांडताना नायपॉल म्हणतात की, त्यांचे वास्तव भारताबाहेर होते. यादरम्यान भारताबाबत रंगवलेले चित्र आणि प्रत्यक्ष जे िदसले याचे वर्णन लिखाणातून केले आहे. त्यांच्या मते प्रत्यक्ष भेटीदरम्यान पराकोटीचा विरोधाभास, भारतीय समाजात आढळून आल्याने माझा भ्रमनिरास झाला. भारतीय इतिहासात वर्णन केलेले वैभव त्यांना कुठेच आढळून आले नाही. फाळणीची खोल जखम त्यांना अस्वस्थ करून गेली. भ्रष्टाचार, जातिव्यवस्था, प्रादेशिकता आणि अत्युच्च धर्मांधता इत्यादी बाबींमुळे त्यांचे मन उद्विग्न झाले असे मत त्यांनी मांडले. भारतीयांची देश, इतिहास व विकासाबाबतची नकारात्मकता त्यांना आश्चर्य करून जाते आणि त्याची लाजही वाटते. वाचकांच्या मते नायपॉल यांचे भारताबाबतचे लिखाण आणि विचार नकारात्मकता आणि नैराश्य याकडे झुकलेले आहेत. त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे वाचक वास्तवता आणि नकारात्मकता यातील अंतर शोधायला लागतो. नायपॉल यांनी रंगवलेले भारताविषयी नकारार्थी चित्र वाचकांना धक्का व क्लेश देऊन जाते. कारण विविध मतप्रवाहांनुसार भारतातील विकासाचा आशादायी किरण दुर्लक्षित करून लेखकाने फक्त अाजूबाजूचा नकारार्थी अंधार शोधला आहे. या अंधारामुळे चुकीची माहिती, गैरसमज, तात्कालिक परिस्थिती व प्रवाह याआधारे गैरसमज निर्माण करणारे चित्र रंगवले आहे. भारताबाबत लिखाण करताना नायपॉल यांनी नक्की भारतीय की परकीय म्हणून भूमिका ठेवली हा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणूनच समीक्षकांच्या मते नायपॉल यांच्या लिखाणातून त्रिनिदादबाबतचा भ्रमनिरास, भारताबाबतची निराशा आणि बेघर असल्याची काळजी यांचे विविध टप्पे प्रतिबिंबित होतात. 


नायपॉल समाज व संस्कृतीची रचना, स्तर आणि त्यांची उकल करण्यात थांबले नाहीत. त्यांनी व्यक्त केलेली मते आणि विधाने त्यामुळे नेहमीच त्यांच्यावर टीका होऊ लागली. पाकिस्तान आणि इस्लाम धर्माबाबत त्यांनी केलेली विधाने नवी वादळे उठवून गेली. इस्लामने इतर धर्मांना वेठीस धरून इतर धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला व इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे विधान विविध स्वरूपाच्या प्रतिक्रियांना जन्म देऊन गेले. तथापि नायपॉल हे नावाजलेले, उत्कृष्ट आणि अद्वितीय लेखक म्हणून का ओळखले जातात? केवळ राष्ट्र, संस्कृती आणि समाज यांचे वास्तव मांडण्याच्या अट्टहासात वाचकांसमोर मांडलेले उद्वेगी चित्र यामुळे? नायपॉल यांचे लिखाण समाजमनाला व मानवी आयुष्याच्या काही मूलभूत पैलूंवर विचार करायला लावते. स्वातंत्र्य, मानवी व सामाजिक ओळख, उत्तर वसाहतवादी आणि आधुनिक काळातील जागतिक धुमश्चक्रीतून उद्भवणाऱ्या काही मूलभूत प्रश्नांच्या उत्तरावर चिंतन करण्यास भाग पाडतात. नकारार्थी व वादळी संदर्भाने केलेल्या लिखाणातून वाचक आपली जबाबदारी, राष्ट्र यावर तटस्थ प्रकाश टाकून, जागतिकीकरणाच्या काळात उज्ज्वल भविष्याकडे झेपावतील, असा आशावाद आहे. (लेखक सोलापूर येथे दयानंद महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत) 

 

- डॉ. दीपक ननवरे 
deepak_anaware2003@yahoo.com 

बातम्या आणखी आहेत...