आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : 'धाकड' कन्या!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्ती म्हणजे; समर्पण, निष्ठा, भक्ती, युक्ती, सातत्य अाणि शक्तीचा संगम, असे हिंदकेसरी मारुती माने म्हणत असत. ते खरंच अाहे. याच गुणांच्या बळावर विनेश फाेगट अाशियायी महिला कुस्तिगीरांमध्ये पहिली 'सुवर्ण कन्या' ठरली. अाॅलिंपिकमध्ये ब्राँझ पदक कमावलेली साक्षी मलिक, पूजा ढांडा यांच्याकडून पदकाची अपेक्षा जरूर हाेती. दाेघींनीही उपान्त्य फेरी गाठली, परंतु पदकापर्यंत अापली ताकद पणाला लावण्यात त्या अपयशी ठरल्या. किर्गिजस्तानच्या एसुलू टिनिबेकाेवासमाेर साक्षीचे डाव कमकुवत ठरत राहिले. 


जपानच्या काटसुकी साकागामीसाेबत कांस्य पदकासाठी लढत देताना पूजा चीत झाली. पिंकीने तर पहिल्याच फेरीत अासमान पाहिले. एकूणच या निमित्ताने सरावाला सातत्याची जाेड देण्याची, डावपेचांच्या परिणामकारकतेचा अभ्यास हाेण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून अाले. 'कलागंज', 'गदालाेट'चा प्रयाेग हाताळणाऱ्या साक्षीची खेळी सामान्यत: बचावात्मक असते, हे सर्वज्ञात अाहेच. पहिल्या डावात सारी ताकद पणाला लावण्याच्या वृत्तीमुळे दुसऱ्या डावावरील सैल झालेली पकडदेखील कच्चा दुवा ठरला. त्याचाच नेमका फायदा एसुलू टिनिबेकाेवा हिने उचलला. दुसऱ्या बाजूला दुखापतीमुळे रिअाे अाॅलिंपिकमधून माघार घेतलेल्या विनेश फाेगटने केलेले जबरदस्त पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायक असेच अाहे. 


अाक्रमक खेळी, न थांबता लढत देण्याची शैली जपणाऱ्या विनेशने अापल्या डावपेचांतदेखील बरेच बदल केलेे १८ व्या अाशियायी स्पर्धेत पाहायला मिळाले. चपळपणे लवचिक पेच टाकणारी विनेश प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली पाहून डाव टाकताना दिसली. अापल्या डावपेचांत घडवलेला बदलच तिला सुवर्णपदकापर्यंत घेऊन जाणारा ठरला. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, पहिल्या डावात बेसावध असलेल्या अाईरीला (जपान) चितपट करण्याचा विनेशचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी तिने ४ गुण मिळवत अाघाडी राखली. दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदात हा सामना स्वत:च्या नावावर केला अाणि अाशियायी क्रीडा स्पर्धेतील कुस्तीत सोनं लुटणारी पहिली महिला खेळाडू ठरली. तसेच सलग दाेन अाशियायी क्रीडा स्पर्धांत पदक जिंकणारी पहिलीच महिला पहिलवान ठरली. 


'दंगल' चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत अालेल्या गीता अाणि बबिता फाेगट यांची विनेश ही चुलत बहीण अाहे. विनेशला पैलवानीचे डावपेच शिकवणारे तिचे काका महावीर फाेगट यांना अाता २०२० च्या अाॅलिंपिकमधील सुवर्णपदकाचे वेध लागले अाहेत. सन २००० च्या सिडनी अाॅलिंपिकमध्ये कर्णम् मल्लेश्वरीने भाराेत्ताेलन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेले पाहून अापल्या मुलीदेखील जागतिक अजिंक्यपटू ठरू शकतात, असा विश्वास त्यांच्यात बळावला अाणि त्यांनी घरातच अाखाडा सुरू केला. गावकऱ्यांच्या टीकेकडे कानाडाेळा करत महावीर फाेगट अापल्या निर्धारावर ठाम राहिले, परिस्थितीशी संघर्ष करत राहिले, त्याचादेखील माेठा वाटा विनेशच्या यशात अाहे हे तितकेच खरे. एकंदरीत या यशाकडे पाहताना एक बाब निश्चित लक्षात येते ती म्हणजे; अढळ दूरदृष्टी, खंबीर निर्धार अाणि त्यास कठाेर परिश्रमाची साथ असली की यश स्वत:हून चालत येते. 


महाराष्ट्रातही कुटुंबातून हाेणारा विराेध, सरावासाठी तालमींचा अभाव अशा कैक उणिवांवर मात करत महिला कुस्तीला बळ देण्याचं काम हाेत अाहे, ही खूपच अानंददायी बाब म्हणायला हवी. पुरुषांचा दबदबा असलेल्या कुस्तीत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या संजना बागडी (सांगली), अश्विनी बाेऱ्हाडे (राजगुरूनगर) असाे की, काैशल्या वाघ (मुंबई), रेश्मा माने (वडणगे), स्वाती शिंदे, नंदिनी साळाेखे (मुरगूड), शेख शबनम (नगर), उषा माने (पाकणी). अर्थातच महिला कुस्तीतील ही प्रातिनिधिक नावे अाहेत. याशिवाय अशा किती तरी मुली स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, ते उंचावण्यासाठी अजूनही धडपड करत अाहेत. प्रत्येकाच्या वाट्याला अालेला संघर्ष, परिस्थिती यांत तफावत असली तरी सर्वांमध्ये सारखीच पाहायला मिळते ती जिद्द. या जिद्दीनेच अाॅलिंपिक, अाशियायी अाणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय महिला कुस्तीला नवे परिमाण, अस्तित्व अाणि प्रतिष्ठा मिळवून दिली. या साऱ्यांच्याच जिद्दीअाड दडलेला संघर्ष निश्चितच प्रेरणादायक अाणि काैतुकास्पद अाहे. 
- श्रीपाद सबनीस 

बातम्या आणखी आहेत...