आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : औरंगाबादचा श्वास कोंडतोय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाचे निमित्त साधून गुरुवारी औरंगाबादजवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत ६० मोठ्या आणि १० लहान कंपन्यांवर भीषण हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही मोठी हानी झाली आहे. त्यामुळे एकेकाळी अत्यंत झपाट्याने वाढणाऱ्या या औद्योगिक नगरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा बदनामी झाली आहे. इथे उद्याेगांचा पाणीपुरवठा कधीही बंद केला जातो, असा संदेश दाेन वर्षापूर्वी सरकारच्या आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहेच. त्याचाच फटका इथल्या डीएमआयसीला आज बसतो आहे. सरकारकडून पायघड्या टाकूनही इथे आंतरराष्ट्रीयच काय, मोठे देशी उद्योगही यायला तयार नाहीत यामागचे दुसरे कारण काय असू शकते? पाणी आणि स्वच्छता याबाबतीत औरंगाबादची झालेली बदनामी कमी होती की काय, म्हणून नऊ आॅगस्टला औद्योगिक वसाहतीत हल्ले करण्यात आले. त्यामुळे आपण कितीही  प्रतीक्षा करीत असलो तरी आंतरराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने इथे आणायची हिंंमत आता करतील का, अशी चिंता समाजहितैषी संवेदनशील औरंगाबादकरांना भेडसावू लागली आहे. आधीच इथली शेती लयाला जाणारी. शेतकऱ्याला थोडीफार आशा असते ती मुलांना नोकरी लागण्याची. त्यासाठी नवनव्या कंपन्या इथे सुरू व्हाव्यात ही गरज असताना आहे त्याही कंपन्यांपैकी काही कंपन्या आपला बाडबिस्तरा आवरून इथून काढता पाय घेतात की काय, अशीच भीती निर्माण झाली आहे. हे कशामुळे घडले, कोणी घडवले, त्यामागचा हेतू काय होता, याची चौकशी होत राहील. सीआयडीमार्फतच ही चौकशी व्हावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनोद पाटील यांनीही केली आहे. त्यातून जे काही निष्पन्न व्हायचे ते होईल. कदाचित काहींना शिक्षाही होतील. तोपर्यंत कदाचित औरंगाबादकरांच्या आणि इतरांच्या मनातील या घटनेविषयीची दाहकता विझलेलीही असेल आणि औरंगाबादच्या औद्योगिक विश्वाचे मोठे नुकसान झालेलेही असेल. या घटनेवर औद्योगिक विश्वाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे आम्ही खपवून घेणार नाही’ असा इशारा देत दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना यापुढे कोणत्याही कारखान्यात नोकरी लागणार नाही अशी व्यवस्था करण्याचा निर्णय उद्योजकांच्या संघटनेने घेतला आहे. अशी काही पावले उचलली जाणे स्वाभाविकही आहे. क्रियेला प्रतिक्रिया येणारच. कारण इथे उद्योग आले नाहीत, किंबहुना आहेत ते मोठे उद्योग इथून स्थलांतरित झाले तर अप्रत्यक्षपणे त्याची झळ सर्वांनाच बसणार आहे; पण थेट नुकसान होणार आहे ते उद्योजकांचेच.  

 

ही केवळ इथल्या औद्योगिक ऱ्हासाचीच नांदी आहे, असे समजण्याचे कारण नाही. उद्योग इथल्या अर्थव्यवस्थेचा श्वास आहेत. तोच थांबला तर बाकी काय राहते? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळांचे आकर्षण आधीच इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी घालवले आहे. आता उद्याेगांच्याही गळ्याला नख लागते आहे. हे कोणी थांबवायचे? उद्याेगांचे काय ते उद्योजक पाहून घेतील, कचऱ्याचे महापालिका आणि सरकारने पाहावे, पाण्यासाठी विजय दिवाणांसारख्या प्राध्यापकाने भांडत राहावे आणि इतरांनी त्या प्रत्येकावर जमेल तशी टीका करीत राहावी, हे किती दिवस चालणार आहे? इथे काही मर्यादित भागात हिंदू आणि मुस्लिमांचे गट भांडतात आणि त्याची झळ संपूर्ण शहराला बसते. कधी एका जातीच्या मागणीसाठी शहर वेठीला धरले जाते तर कधी दुसऱ्या जातीचा समूह ‘करून दाखवले’ म्हणत त्याचीच पुनरावृत्ती करतो. महिनोन््महिने इथले व्यापारी भयग्रस्त आहेत.  व्यवसायकेंद्रे उघडायची की नाहीत, असाच प्रश्न घेऊन रोज ते घरातून निघताहेत. हे किती दिवस चालणार? हे थांबवण्यासाठी कोणीच  पुढाकार का घेत नाही? समाजधुरीण नावाची काही जमात या शहरात, जिल्ह्यात आहे की नाही? हे प्रश्न मन विषण्ण करतात. दलित समाजातील असंतोष असो, मराठा समाजातील अस्वस्थता असो, मुस्लिमांच्या मनातील खदखद असो किंवा आणखी कोणा जाती-धर्मातील खुमखुमी, या सर्वांना समोर बसवून त्यांना त्यांचे प्रश्न, मागण्या योग्य पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विश्वास देऊ शकेल, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वजन खर्च करू शकेल असे जात, धर्माच्या पलीकडे गेलेले चेहरे या शहरात नाहीतच का? हे शहर म्हणजे काय केवळ वेगवेगळ्या जात, धर्माच्या समूहांचा ‘पोस्टल अॅड्रेस’ आहे? कोण कोणाचे ऐकेल किंवा नाही ऐकणार; पण आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, परिस्थिती चिघळण्याआधीच  काही केले पाहिजे असे वाटणारा वर्ग निराश झाला आहे की निद्रिस्त? 


- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...