आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांच्या 50 समर्थकांची धरपकड, पुण्याच्या गोल्ड गँगचे समर्थक ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात अचानक कोम्बिंग ऑपरेशनची धडक कारवाई करत सुमारे दीडशे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईपाठोपाठ जिल्हा न्यायालयात 'भाईं'ना समर्थन देण्यासाठी आलेल्या ५० ते ६० समर्थकांची पोलिसांनी धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईने समर्थकांची पळापळ झाली, मात्र पोलिसांनी तीनही प्रवेशद्वारावर संशयितांची झाडाझडती करत ताब्यात घेतले. 


गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गणेशोत्सवामध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व सूत्रे हाती घेत गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनची धडक कारवाई करत दीडशे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली. यापाठोपाठ जिल्हा न्यायालयात खटला कामांसाठी पोलिसांनी हजर केलेल्या विविध गुन्ह्यातील 'भाईं'ना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ४० ते ५० समर्थकांना ताब्यात घेतले. यामध्ये पुणे येथील कुप्रसिद्ध 'गोल्ड' गँग टोळीच्या समर्थकांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्या समर्थकांमध्ये एका वकिलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुण्याच्या या समर्थकांच्या वाहनात बेसबॉलचा दांडा आणि काही हत्यार सापडले. संशयिताला ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फिल्डिंग लावून कारवाई : जिल्हा न्यायालयाचे दोन्ही प्रवेशद्वार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या लहान प्रवेशद्वारावर गुन्हे शाखेच्या पथकांनी संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली. तर न्यायालय परिसरात पोलिसांनी समर्थकांची धरपकड केल्याने एकाही समर्थकाला पळून जाता आले नाही. ज्यांचे न्यायालयात काम आहे त्यांना चौकशी करून सोडून दिले. जे बिनकामी आले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सकाळी ११ वाजता पथकाने कारवाईला सुरुवात केली. दोनपर्यंत ही कारवाई सुरू होती. 


या अधिकाऱ्यांनी केली कारवाई : उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त बापू बांगर, शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, मंगलसिंग सूर्यवंशी, अशोक भगत, सुभाषचंद्र देशमुख, किशोर मोरे, सूरज बिजली, मनोज करंजे, गुन्हे शाखेचे दिनेश बर्डेकर, आनंद वाघ यांच्या पथकासह पोलिस कारवाईत सहभागी झाले होते. 


न्यायालय परिसराने घेतला मोकळा श्वास 
जिल्हा न्यायालयात यापूर्वी टिप्पर गँगच्या गुन्हेगारांनी उपनिरीक्षकाला मारहाण केली होती. या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. कालांतराने कारवाईला ब्रेक लागला. मात्र, आज झालेल्या कारवाईने वकीलवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. अशाप्रकारची कारवाई नियमित राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक दिवसांनंतर न्यायालय परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे निदर्शनास येत होते. 


वाहनात आढळली हत्यारे 
जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभ्या असलेल्या इनोव्हा कारची (एम.एच. १४ जीआर ३००१) पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये संशयित प्रमोद गडरेल, श्याम गडरेल, सागर गडरेल या तीन बंधूंसह हेमंत इटोरिया, धरम सोळंकी (सर्व रा. आळंदी, पुणे) मिळून आले. वाहनात बेस बॉलचा दांडा आणि पातळ पत्रा असलेली दांडा मिळून आला. संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 


खाकी झाली सतर्क 
सुमारे वर्षभरापूर्वी धडक कारवाई करत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारी खाकी काहीकाळ सुस्त होती. अायुक्तांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकाऱ्यांना 'फ्री' हॅण्ड देत धडक करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये खाकीने गुन्हेगारांच्या विरोधात हाती दंडुका घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 


भाई समर्थक पुन्हा रडारवर 
गुन्हेगारी नियंत्रणासाठी खाकी धडक कारवाई करत असताना अंबडमध्ये एका टोळीच्या सदस्यांनी तरुणाचा भररस्त्यातच खून केल्याचा प्रकार घडला अाहे. या घटनेमुळे कारागृहात असलेल्या भाईच्या इशाऱ्यावर गंभीर गुन्हे घडत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी अधिकाऱ्यांना भाईच्या संपर्कात आलेल्या सर्वच समर्थकांवर धडक कारवाईचे आदेश दिले. 


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम 
गणेशोत्सवामध्ये कोम्बिंग ऑपरेशन कारवाई करत दीडशे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली. या कारवाईचा धसका घेत गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले. गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली. आता नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधीच भाई समर्थकांवर कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खाकीची जरब निर्माण झाली आहे. 


दोन गुन्हेगार ताब्यात : न्यायालयाने गंभीर गुन्ह्यात वॉरंट बजावलेले दोन सराईत गुन्हेगार कारवाईत पोलिसांच्या हाती लागले. त्यांना संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. एका संशयिताकडे चोरीची दुचाकी आढळून आली तर पुण्यातील गोल्ड गँग समर्थकांच्या वाहनात हत्यार आणि बेसबॉलचा दांडा आढळून आला. यामध्ये एका वकिलाचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...