आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात या, थांबा, खा-प्या अन् कामही शिका; केळी निर्यातक शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शालेय विद्यार्थ्यांना थेट शेतीकामाचे धडे देण्यासाठी बोथरा (पणज) येथील प्रयोगशील शेतकरी पुरुषोत्तम बोचे यांनी अफलातून प्रयोग करण्याचे ठरविले आहे. शेतात या, दिवसभर थांबा, खाणं-पिणं करा अन् शेतीकामही शिका, असा हा नवा प्रयोग आहे. या प्रयोगातून शेतीपर्यटन तर होईलच, विद्यार्थ्यांना शेतीची विशेषतः बागेतील कामकाजाची रितही माहित होणार आहे. 

 

या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने बोचे यांना मदतीचा हात दिला असून 'शेतकरी ते ग्राहक'ही नवी संकल्पना रुजवण्यासाठी याहून उत्तम प्रयोग असूच शकत नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रयोगाच्या प्रात्याक्षिकासाठी शहरातील दोन नामांकित शाळांशी संपर्क साधण्यात आला असून त्यापैकी एका शाळेच्या विद्यार्थ्यांची कृषी सहलही लवकरच आयोजित केली जाणार आहे. फळपिकांसाठी पोषक असलेली पुरेशी जमीन पुरुषोत्तम बोचे यांच्याकडे आहे. अकोट तालुक्यातील बोथरा-पणज शिवारातील या शेतीत ते केळीचे पीक घेतात. ही केळी उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी आहे. त्यामुळे केळी निर्यातक म्हणूनही बोचे यांची नवी ओळख रुढ झाली आहे. ही केळी दुबई, इराण, अफगाणिस्तान अशा ठिकाणी पाठवली जाते. तो क्रम अजूनही सुरु आहे. या वर्षीच्या मोसमात ३५ कंटेनर रवाना झाले. एका कंटेनरमध्ये सुमारे २० टन केळी असते. त्यानुसार आतापर्यंत ७०० टन केळीची निर्यात केली गेली. विशेष असे की यामुळे त्यांना रग्गड कमाई झाली असून ही केळी देशांतर्गत विकली असती तर चारपट कमी रक्कम मिळाली असती, असे त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात शेतीसंदर्भात नवे प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी आरडीसी राजेश खवले, रोहयोचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर व इतर अधिकारी परिश्रम घेत आहेत. दर बुधवारी शेतकऱ्यांसाठीची कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे गटशेती व सामूहिक शेतीला प्रोत्साहन मिळत आहे. 

 

रसायनाने नव्हे, नैसर्गिक पद्धतीने :

केळी पिकविण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. परंतु बोचे यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवली जाते. त्यामुळे तिचा स्वाद आणि गुणवत्ता दोन्ही गोष्टी टिकून राहतात. शिवाय मानवी आरोग्यास पोषक असे तत्वही त्यातून प्राप्त होते. निर्यातीसाठी हीच वैशिष्ट्ये कारणीभूत ठरली आहे. 

 

खारपाणपट्ट्याचा बाऊ कशाला ? :

बोचे यांचा शेतीउद्योग पाहू जाता खारपाणपट्ट्याचा उगाच बाऊ कशाला, अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधूनच उमटू लागल्या आहेत. विशेष असे की बोचे यांच्यासोबत आणखीही काही शेतकरी जुळले असून त्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे निर्यात अव्याहतपणे सुरु ठेवणे जिल्हा प्रशासनाला शक्य झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...