आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- ऐतिहासिक औरंगाबाद शहर आणि परिसरातील वास्तूंची माहिती सांगणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, लहान मुलांना त्यांच्या भाषेत ही माहिती समजण्यासाठी साहित्य उपलब्ध नाही. या महिन्यात ही उणीव भरून निघणार आहे. बीबी का मकबरा, दौलताबादचा देवगिरी किल्ला आणि औरंगाबाद शहराचा इतिहास आता आकर्षक कॉमिक्सच्या रूपात चिमुकल्यांना वाचता येणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत या वास्तूंचा चित्रमय इतिहास मांडला जात आहे.
इतिहास आणि पुरातत्त्वावर एका व्याख्यानासाठी डॉ. बाजपेयी केंद्रीय विद्यालय शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीने त्यांना आमच्या वयाच्या मुलांनी शहराची माहिती समजण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे, अशी विचारणा केली. उपलब्ध पुस्तके मोठी, क्लिष्ट स्वरूपाची आहेत. मुलांना समजेल अशा भाषेत पुस्तकेच नाहीत, ही बाब बाजपेयी यांच्या लक्षात आली. यातूनच त्यांनी ऐतिहासिक वास्तूंवर कॉमिक्स तयार करण्याचे ठरवले आणि लगेच काम सुरू केले.
स्वयंसेवी संस्थेमार्फत विक्री, तेच ठरवतील दर
नवीन वर्षात प्रकाशन : ए-४ आकाराच्या तीन भाषांतील काॅमिक्सचे प्रकाशन जानेवारीत होईल. यापाठोपाठ दौलताबादचा किल्ला आणि औरंगाबाद शहरावर कॉमिक्सचे काम सुरू केले आहे. कॉमिक्सचे मूल्य ठरवण्याचे अधिकार आणि वितरणाची जबाबदारी तीन स्वयंसेवी संस्थांना दिली जाणार आहे. यातून मिळणारा पैसा त्यांनाच दिला जाईल.
वर्षभराची मेहनत; आधी हिंदीत कथा लिहिली, नंतर मराठीत भाषांतर करून घेतले
डॉ. बाजपेयी विविध ठिकाणी लिखाण करतात. मात्र, कॉमिक्ससाठी लहान मुलांना समजेल अशा शैलीत लिहिणे आव्हान होते. उपक्रमाची सुरुवात त्यांनी बीबी का मकबरावरील कॉमिक्सने केली. याची कथा हिंदीत लिहिली. शासकीय कला महाविद्यालयातील बीएफए कर्मशियलच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पंकज मालाेदे आणि महेंद्र काकडे यांच्याकडून चित्र काढून घेतले. पात्रांच्या तोंडी संवाद टाकण्यात आले. रामेश्वर शहाणे यांनी पानाची मांडणी केली. याच पद्धतीने मराठी आणि इंग्रजीचे कॉमिक्सही तयार केले. मराठी भाषांतर उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी, तर इंग्रजीचे भाषांतर अपर्णा बाजपेयी यांनी केले. एवढ्या प्रयत्नातून मग "बीबी का मकबरा की सैर' हे कॉमिक्स तयार झाले. लवकरच ते मुलांना वाचण्यास मिळेल.
लहान मुलांना ऐतिहासिक वास्तूंबाबत गोडी लागेल
एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर कॉमिक्स तयार करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. मुलांना समजेल अशा सरळ, सोप्या तीन भाषांत कॉमिक्स लिहिण्यात आले आहे. ही कॉमिक्स वाचून मुलांना आपल्या ऐतिहासिक वास्तूंबाबत गोडी लागेल. त्यांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जाणीव निर्माण होईल. हळूहळू अन्य वास्तूंवरही कॉमिक्स काढू. यातून येणारा पैसा स्वयंसेवी संस्थांना दिला जाणार आहे. - डॉ. शिवाकांत बाजपेयी, उपअधीक्षक पुरातत्त्वविद, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.