आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगणकावर काम जमले नाही, आयुक्तांनी दहा कर्मचाऱ्यांना दाखवला 'घरचा रस्ता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेची प्रशासकीय कामकाजाला गती आणण्यासाठी आयुक्तांनी प्रत्येक विभागाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रारंभ ३ जानेवारीला झाला. पहिल्या दिवशी कॉम्प्युटर ऑपरेटर यांची परीक्षा घेण्यात आली. २३ जणांपैकी ९ जणांना संगणकावर व्यवस्थित काम करता आले नाही. तसेच संगणकही सुरु करता आला नाही. त्यामुळे या ९ जणांस हार्डवेअर अभियंत्यासह एकूण दहा जणांना आयुक्त संजय कापडणीस यांनी घराचा रस्ता दाखवला. यापुढे काम करणाऱ्यांनीच महापालिकेत थांबावे अन्यथा घरी जावे, या आयुक्तांच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

 

आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिकेचे प्रशासकीय कामकाज दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले आहे. आठ दिवसाच्या कालावधीत अनेक कर्मचारी बिनकामाचे आहेत, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांकडून प्रात्यक्षिक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आयुक्तांनी स्वत:चा संगणक बंद करुन त्यातील विविध फोल्डरही त्यांनी बंद केले. संगणक नादुरुस्त झाला असे सांगून हार्डवेअर अभियंत्याला बोलावण्यात आले. मात्र हार्डवेअर अभियंत्याला सांगितलेले फोल्डर पुन्हा लोड करता आले नाही. तसेच संगणकाबाबत असलेले शॉर्टफॉर्मचे लॉगफाॅर्मही सांगता आले नाही. विशेष म्हणजे संबंधित अभियंता हा २००६ पासून मानसेवी म्हणून २५ हजार रुपये महिन्याने कार्यरत आहे. संगणकाबाबत नॉलेज नसल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी त्याला घराचा रस्ता दाखवला. त्या नंतर आयुक्तांनी संगणक चालकांची परीक्षा घेतली. ३ जानेवारीला एकूण २३ संगणक चालकांची परीक्षा घेण्यात आली. यात ९ संगणक चालक नापास झाले. हे संगणक चालक कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले होते. या सर्व संगणक चालकांना लगेच काढण्यात आले. 

 

कारभारात पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न 
हा माझा माणुस होता, त्याला का काढले? असा कुणी जाब विचारु नये, यासाठी आयुक्तांनी परीक्षा घेतेवेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बोलावले. प्रसिद्धी माध्यमांच्या समोर परीक्षा घेवून कामात पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला.
 
अभियंता कोणतेच काम करीत नव्हता 
ज्या हार्डवेअर अभियंत्याला आयुक्तांनी घराचा रस्ता दाखवला. तो अभियंता यापूर्वी कधीच संगणक विभागात काम करीत नव्हता. केवळ संगणक चालकांच्या भरवशावर आपली नोकरी त्याने टिकवून ठेवली. वेतन घेण्याचेच काम केले.
 
अशी घेतली परीक्षा 
काही संगणकाच्या की बोर्ड,पावर सप्लाय केबल काढून घेण्यात आली. संगणक सुरु होत नसताना संगणक चालकांनी केबल लावलेल्या आहेत की नाही? याची पाहणी केली नाही. केबल काढल्याचे सांगितल्यावर काहींना काढलेली केबलही लावता आली नाही. काहींना पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन तयार करता आले नाही. 

 

कुणावरही अन्याय होणार नाही 
मी कोणत्याही कर्मचाऱ्यावर हेतुपुरस्सरपणे कारवाई करणार नाही. अथवा घरी पाठवणार नाही. केवळ काम न येणारे आणि काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाईल. संजय कापडणीस, आयुक्त मनपा 

आयुक्तांनी नगररचना विभागातील अभियंत्यांना मागितला अहवाल 
दरम्यान, महानगर पालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत ११ अभियंत्यांना त्यांनी दोन महिन्यात नेमकी कोणती-कोणती कामे केली. याबाबतचा अहवाल नगररचनाकार संजय पवार यांनी आयुक्तांच्या आदेशान्वये मागितला. महानगरपालिकेच्या चारही झोन मध्ये नगररचना विभागाचे अभियंते कार्यरत आहेत. त्यांना दिलेली जबाबदारी आणि कर्तव्ये त्यांनी मागील दोन महिन्यात पूर्ण केले की नाही? याची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत नापास होणाऱ्या अभियंत्यांनाही घराचा रस्ता दाखवला जाणार आहे.