आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या प्रलंबित प्रश्नांसाठी खासदारांची समिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत

मुंबई- केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत करण्यात आली. समितीच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच समितीसाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदारांना सांगितले.
तर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्द्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.

तसेच मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहताही उपस्थित होते. राज्याच्या प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा होण्यासाठी सर्वपक्षीय समिती असावी अशी सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी मांडली. त्याला सगळ्यांनी अनुमोदन दिले.


यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावे आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. एकजुटीने आवाज उठवला तर प्रश्न सोडवले जातील. जनतेने ज्या कामांसाठी निवडून दिले आहे ते पूर्ण झालेच पाहिजे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत तिथल्या बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे, हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...