आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Common Man Along With Soldiers Are The Heroes Of 'Operation Vijay'; The Body Of Indian Captain Kaliya Was Brought By Coolie From The Jaws Of Pakistan

सैनिकांसोबत ‘कॉमन मॅन’सुद्धा ‘ऑपरेशन विजय’चा नायक!; पाकच्या जबड्यातून हमालाने आणला होता भारतीय कॅप्टन कालियांचा मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिल - “कॅप्टन सौरभ कालियांचा मृतदेह बघितला, तेव्हा तिथंच पाकिस्तानी सैनिकांना ठेचावं, असं वाटलं. पण, आधी कॅप्टनचा मृतदेह भारताच्या ताब्यात येणं आवश्यक होतं. रातोरात तो मृतदेह घेऊन आम्ही निघालो आणि पाकिस्तानी सैनिकांना पत्ताही लागला नाही! आम्हाला जे रस्ते माहीत होते, त्याचा पाकला अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांच्याच छावणीतून कॅप्टनचा मृतदेह घेऊन आम्ही पसार झालो.”


मोहम्मद अली सांगत होते. कारगिलजवळच्या काकसर गावात ते राहतात. या गावात आजही मोबाइलची रेंज नाही. त्यामुळे काकसरमध्ये येऊनही त्यांच्याशी संपर्क करणं अवघड गेलं. हे गाव पाकिस्तानच्या निशाण्यावर १९९२ पासून होतं. अनेक हल्ले या गावानं पचवले. कित्येक माणसं गेली, गुरंढोरं गेली. तरीही गावकऱ्यांनी गाव सोडलं नाही आणि लष्कराची साथही सोडली नाही. मोहम्मद अली अशा गावकऱ्यांपैकीच एक. हमाली करून पोट भरणारे अली आणि सौरभ कालियांची चांगली गट्टी झाली होती. ऐन विशीतल्या सौरभ यांची कारगिल ही पहिली पोस्टिंग. जानेवारी १९९९ मध्ये ते इथे आले. कारगिलसारख्या हिमालयाच्या कुशीतल्या परिसरात भारताची सीमा कोणती आणि पाकिस्तानची कोणती, हे समजणे अवघड. जिकडे तिकडे बर्फाच्छादित पहाड. तिथे त्यांना मदत झाली ती मोहम्मद अली यांच्यासारख्या स्थानिक लोकांची. 


कारगिल युद्ध भारतीय सैन्याने जिंकले हे खरे, पण स्थानिक लोक सैन्याच्या सोबत खंबीरपणे उभे होते, म्हणूनच ‘ऑपरेशन विजय’ फत्ते झाले. पाकिस्तानी घुसखोरीची बातमीही सगळ्यात पहिल्यांदा दिली ती ताशी नामग्याल या मेंढपाळाने. याक हरवला म्हणून जुबार हिलवर गेलेल्या ताशीला तिथं बर्फाच्या डोंगरात पाऊलवाट तयार झालेली दिसली. तशी खबर त्याने बटालिकच्या लष्करी तुकडीला दिली. २ मे १९९९ च्या त्याच्या या बातमीने सगळी सूत्रे फिरली. सौरभ कालियाही त्यानंतर सावध झाले आणि त्यांनी पेट्रोलिंग सुरू केले. मात्र, या परिसरात नवखे असलेले सौरभ कालिया असेच पेट्रोलिंग करताना पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडले. 


कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. म्हणजे, हुंदरमान भारतात आणि शेजारच्या डोंगरातलं ब्रोल्मो पाकिस्तानात. स्कर्दू हा शेजारचा जिल्हा पाकिस्तानात. या स्कर्दू रेडिओनंच बातमी दिली कॅप्टन सौरभ कालियांना पकडल्याची. १५ मे ते ७ जून असे तीन आठवडे कॅप्टन पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी अमानुषपणे सौरभ यांची हत्या केली. पण, त्यांचा मृतदेह कुठे आहे, हे समजत नव्हते. मोहम्मद अलींवर ही जबाबदारी सोपवली गेली. आपल्या चार-पाच मित्रांसोबत अली या मोहिमेवर गेले. पाकिस्तानच्या छावणीतून त्यांनी कॅप्टन सौरभ कालियांचा मृतदेह मिळवला आणि भारतीय सैनिकांच्या ताब्यात दिला!

 

‘कारगिल’चे महाराष्ट्र कनेक्शन

ताशी नामग्याल यांचा मुलगा स्टॅनझीन आणि मोहम्मद अली यांची पुतणी नसरीन यांच्या शिक्षणाची जबाबदारी पुण्याच्या ‘सरहद’ संस्थेने स्वीकारली आहे. ही साधी माणसे कारगिल विजयाचे नायक आहेत. त्यांचा गौरव व्हावा आणि त्यांना सरकारकडून आर्थिक मदतही दिली गेली पाहिजे, अशी भूमिका ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार मांडतात.

 

काकसरचा कॅप्टनला सलाम 
मोहम्मद अली, त्यांचे मित्र हामझा आणि काकसरमधील ग्रामस्थ दरवर्षी कॅप्टन सौरभ कालियांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करत असतात. महेंद्रसिंह धोनीही या टुर्नामेंटला हजेरी लावून गेला आहे. सौरभ कालियांना सरकारने न्याय दिला नसला तरीही काकसरमधील ग्रामस्थांनी मात्र त्यांना सन्मानित केले आहे.