Home | Maharashtra | Mumbai | community boycott family who protest against virginity test

'कौमार्य चाचणी'ला विरोध केल्यामुळे समाज पंचायतीने घातला बहिष्कार, अंत्ययात्रेलाही कोणी गेले नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 02:07 PM IST

कौमार्य चाचणीला विरोध केल्याने जात पंचायतीने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला

 • community boycott family who protest against virginity test

  ठाणे- एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे कौमार्य चाचणीमुळे बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. कौमार्य चाचणीसाठी विरोध केल्यामुळे कुटुंबावर बहिष्कार घातलाच, पण कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या अंत्ययात्रेवरही बहिष्कार घातल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथच्या विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला.


  विवेक तमायचीकर यांच्या आजीचे काल रात्री दहा वाजता निधन झाले. या दुःखाच्या कार्यक्रमात कंजारभाट समाजातील लोकांनी सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र तमायचीकर यांच्या आजीच्या अंतयात्रेत समाजातील एकही माणूस सहभागी झाला नाही. यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता, म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षापासून त्यांना बहिष्कृत केले आहे.


  कौमार्य चाचणीला विरोध केल्याने जात पंचायतीने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला. तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्यावेळी याच समाजातील एक लग्नाचा हळदी समारंभ सुरु होता. लग्न-हळद हे पूर्वनियोजित असतात हे मान्य आहे, पण या हळदी समारंभात डीजे लावून जल्लोष सुरू होता. एखाद्या माणसाचे निधन झाल्यानंतर परिसरात दुखवटा पाळला जातो. पण तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले तरी डीजेचा मोठा आवाज सुरुच होता, शिवाय त्यांच्या अंत्ययात्रेतही कोणी आले नाही.

  "आपण समाजाच्या अनिष्ट जुनाट परंपरेला विरोध करत आहोत म्हणून समाजाने माझ्यावर हा बहिष्कार टाकला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करणार आहे", असे विवेक तमायचीकर यांनी सांगितले. तसेच शासनाने याची गंभीर घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.


  महाराष्ट्र सरकारने जात पंचायत निर्मूलन कायदा संमत केला आहे. एखाद्या कुटुंबाला जर बहिष्कृत केले, तर संबंधित कुटुंबाने तक्रार करावी, आम्ही निश्चित कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.

Trending