दिव्य मराठी विशेष / इंग्लंडमध्ये कंपनी सोडून जाऊ नये यासाठी स्वत:चा पगार निश्चित करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडेच देताहेत कंपन्या

दिव्य मराठी विशेष तरुण, कुशल कर्मचारी कंपनीतच राहावेत यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 02:46:19 PM IST

लंडन : चांगले कर्मचारी लवकर नोकरी सोडून जाऊ नयेत यासाठी विदेशातील कंपन्या अनेक नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करत आहेत. इंग्लंड आणि युरोपातील काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांनाच त्यांचा पगार ठरवण्यासाठी सांगताहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना मोफत चित्रपट तिकीट, जिमचे पास यांसारख्या सुविधा देत आहेत.


इंग्लंडमध्ये कारकीर्दीच्या प्रारंभीच्या दोन वर्षांत ८४% युवा नोकरी बदलत आहेत, संशोधनाचा निष्कर्ष...
एका संशोधनानुसार, ८४ टक्के तरुण वर्ग आपल्या कारकीर्दीत पहिल्या दोन वर्षांत नोकरीत बदल करताे. हे थांबवण्यासाठी कंपन्यांनी स्वत:चा पगार स्वत: निश्चित करण्याची संकल्पना राबवली आहे. इंग्लंडच्या ग्रान्टट्री कंपनीत ४५ कर्मचारी आहेत. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांत आपले पूर्ण बजेट शेअर केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे मूल्यांकन स्वत:च करून आपला पगार निश्चित केला आहे. इंग्लंडमधील ह्यूमन रिसोर्स प्रोफेशनल्स ऑर्गनायझेशनने म्हटले की, यामुळे पगारात पारदर्शकता येईल. मात्र याची अंमलबजावणी अत्यंत दक्षपणे केली पाहिजे, अन्यथा याचा नेमक उलटा परिणाम होऊ शकतो. इंग्लंडच्या पॉड ग्रुपने म्हटले की, कधी-कधी कर्मचारी मार्केट रेटपेक्षा जास्त पैसे मागतात. याचा अर्थ असा नव्हे की ते लालची आहेत. मात्र, हा जाणिवांचा अभाव आहे. एकदा एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने पगारात ५० टक्के वाढ मागितली होती. सहकाऱ्यांनी त्याला समजावले की, तू तुझ्या कामानुसार ही वाढ योग्य असल्याचे सिद्ध करू शकणार नाहीस. त्यामुळे आगामी काळात तुझी नोकरी जाऊ शकते. स्मार्केट कंपनीचे सीओओ टॉम हार्डमॅन सांगतात की, सध्या तरी स्वत:चा पगार स्वत: ठरवण्याचे धोरण बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांत आहे. समजा हे यशस्वी झाले तर पारंपरिक ठिकाणीही हे लागू होईल. यामुळे पगाराबाबत चर्चा करण्याच्या विचारसरणीतून कर्मचारी बाहेर येतील.


'एआय'द्वारे भत्ते आणि सुविधांचे होत आहे मूल्यांकन
कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि भत्त्यांचे मूल्यांकन कंपन्यांकडून होत आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) डेटा विश्लेषक आणि चॅटबॉटचा वापर कंपन्या करत आहेत. कर्मचारी कोणकोणत्या आर्थिक सुविधांचा जास्त लाभ घेत आहेत तसेच कोणत्या सुविधा फायद्याच्या नाहीत, हे कंपन्या डेटाद्वारे तपासताहेत. त्याआधारेच कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर भत्ते आणि सुविधा देत आहेत. यामुळे कर्मचारी खुश राहून नोकरी सोडणार नाही.

X
COMMENT