आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' हे पुस्तक दिल्ली भाजपने प्रकाशित केले असून यामुळे महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले आहेत. हे वादग्रस्त पुस्तक तत्काळ मागे घेण्याची मागणी होत आहे. पुस्तक प्रकाशनानंतर भाजपवर टीकेची झोड उठली असून महाराष्ट्र भाजपने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वादाची ही ठिणगी पडली अाहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक-सांस्कृतिक संमेलनाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर गोयल यांनीच ही माहिती ट्विटरवरून दिली. त्यानंतर 'शेम ऑन बीजेपी'असा ट्रेंड सुरू झाला असून शिवप्रेमींनी सोशल मीडियावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
छत्रपतींची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही : संजय राऊत
जयभगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सूर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज...सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे व श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का, असा सवाल करून महाराष्ट्र भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
अपमान होत नाही : श्याम जाजू
कर्णासारखा दानशूर म्हटले म्हणून कर्णाचा अपमान होत नाही, एकलव्यासारखा एकनिष्ठ म्हटल्याने एकलव्याला उणेपणा नाही. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत काम नरेंद्र मोदी करत आहेत, असे दिल्ली भाजपचे नेते श्याम जाजू म्हणाले.
भाजपने तत्काळ पुस्तक मागे घ्यावे : छत्रपती संभाजीराजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाशी तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी यांची केलेली तुलना अयोग्य आहे. भाजपने सदर पुस्तक तातडीने मागे घ्यावे, छत्रपतींच्या घराण्यातील वंशज म्हणून मला हे बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित ते रविवारी सिंदखेडराजा येथे आले होते त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.
गृहनिर्माण मंत्र्यांचाही आक्षेप
राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आक्षेप घेतला. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, असे ट्विट आव्हाड यांनी केले, तर काँग्रेसचे राजीव सातव यांनी महाराजांमधील एकही गुण मोदी यांच्यात नसल्याचे सांगून वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.