मुंबई / संख्याबळ वाढीसाठी भाजप-शिवसेनेत स्पर्धा

लक्ष्य सत्ता शिवसेनेकडे 62, तर भाजपकडे 125 आमदारांचा दावा

प्रतिनिधी

Oct 28,2019 08:17:00 AM IST

मुंबई : अापलाच मुख्यमंत्री करण्याच्या उद्देशाने भाजप व शिवसेनेत अपक्षांच्या मदतीने अापले संख्याबळ वाढवण्याची स्पर्धा लागली अाहे. अातापर्यंत ४ अपक्षांचा शिवसेनेला पाठिंबा मिळाला असून त्यामुळे सेनेचे संख्याबळ आता ६२ पर्यंत जात अाहे. 'दोन दिवसांत अाणखी काही अामदार शिवसेनेकडे येतील. राज्यातील सत्तेच्या कॅन्व्हासवर रंग भरण्यासाठी ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप व सेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस रंगण्याची शक्यता अाहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक पूर्व मतदारसंघात नुकताच पराभवाचा सामना करावा लागलेले बाळासाहेब सानप यांनी रविवारी मुंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सानप यांना शिवबंधन बांधले. या वेळी राऊत यांनी भाजपने त्यांना असलेल्या २० आमदारांचे समर्थन दाखवावे, असे आव्हान दिले. शनिवारी रात्री प्रहार जनशक्तीचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला अाहे. यात ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. विदर्भातील रामटेकचे आशिष जयस्वाल व भंडाराचे नरेंद्र गोंडेकर या सेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेबरोबर असल्याचे सांगितले. त्यांना अनिल देसाई यांनी मातोश्रीपर्यंत आणले. अशा प्रकारे सेनेचे संख्याबळ ६० झाले आहे. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे सेनेचे दोन बंडखोर निवडून आले आहेत. ३० आॅक्टोबर रोजी भाजप विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक आहे. त्यासाठी अमित शहा मुंबईत आहेत. ते माताेश्रीवर चर्चा करणार असल्याचेही सांगितले जाते.


पक्षीय बलाबल...

भाजप -१०५, शिवसेना -५६, राष्ट्रवादी काँग्रेस -५४, काँग्रेस -४४, बहुजन विकास आघाडी -३, एमआयएम -२, समाजवादी पार्टी -२, प्रहार जनशक्ती पार्टी -२, माकप -१, जनसुराज्य शक्ती -१, क्रांतिकारी शेतकरी पार्टी -१, महाराष्ट्र नवनिर्माण सेना -१, राष्ट्रीय समाज पक्ष -१, स्वाभिमानी पक्ष -१, शेकाप -१, अपक्ष -१३, एकूण जागा -२८८.


२० आमदारांचा पाठिंबा...

भाजपकडे १०५ संख्याबळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला २० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सूतोवाच रविवारी केले. त्यामध्ये राजा राऊत (बार्शी), गीता जैन (मीरा-भाइंदर), महेश बालदी (उरण), मंजुला गावित (साक्री), किशोर जोरगवार (चंद्रपूर), विनोद आगरवाल (गोंदिया) यासह जनसुराज्य आणि रासप यांच्या प्रत्येकी एका अामदाराचा समावेश अाहे.

X
COMMENT