आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या कामांना होकार अन् भाजपच्या कामांना नकार देणाऱ्या आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची कचरा कोंडी फोडण्यासाठी कचरा समस्या सोडवण्यात 'निपुण' असलेल्या डॉ. निपुण विनायक यांना मनपात आयुक्त म्हणून नियुक्त केले. मात्र, याच आयुक्तांकडून शिवसेनेचे आदेश पाळण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेच्या कामांना होकार देणारे मनपा आयुक्त भाजपच्या मागण्या धुडकावून लावत असल्याचे गाऱ्हाणे या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडले.

 

विशेष म्हणजे शहराच्या पक्षाच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त केलेल्या पंकजा मुंडे यांना याबाबत कोणतीही कल्पना न देता त्यांच्याच समोर मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला. 

महानगरपालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना- भाजपची सत्ता असली तरी पाणी प्रश्नासह शंभर कोटी रुपयांची कामे, कचरा प्रक्रिया केंद्रातील मशीन खरेदी, स्मार्ट सिटीतील बस खरेदी आदी प्रकरणांवरून अंतर्गत बेबनाव आणि दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांत काही प्रमाणात मतभेद असल्याचा प्रकार दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले आयुक्तही शिवसेनेच्या कामांना सहज होकार देत असल्याने याचे 'श्रेय' शिवसेनेला जात आहे. शिवाय कोणत्याही कामातील श्रेयाचा 'हिस्सा' भाजपला जात नसल्याने त्यांच्यात अधिकच तेढ निर्माण होत आहे. 

 

शिवसेनेकडून नेहमीप्रमाणे आपल्या माणसांना सांभाळण्याचे काम होत असून कचऱ्याचा वास न येता 'सुवास' दरवळण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना कचरा प्रक्रिया यंत्र खरेदीचे काम दिले. भगवान घडमोडे यांच्या काळात आलेल्या शंभर कोटींचे वाटप ठेकेदारांना सोबत बसून केले. यातही भाजपला विचारात घेतले नाही. परिणामी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना या कामांचे पुन्हा टेंडर काढण्याची सूचना केली होती. मात्र, त्या मागणीला धुडकावून लावल्याने आज आयुक्तांची तक्रार थेट फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.


पक्षाच्या पालकमंत्र्यांनाच बायपास 
शहराच्या भाजप पक्षाच्या पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील समस्या आणि पक्षातील प्रकरणे, पदाधिकाऱ्यांची नाराजी, मनपातील वाद याची माहिती सर्वात अगोदर पालकमंत्री म्हणून मुंडे यांना देणे अपेक्षित आहे. मात्र, सोमवारी पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. फडणवीस यांच्यासोबत मुंडे यांची उपस्थिती होती. पण या प्रकरणाची माहिती त्यांना नसल्याचे या वेळी दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. 


फडणवीस यांच्याकडून स्मितहास्य 
बीड येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी फडणवीस सोमवारी सकाळी विमानतळावर आले होते. या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शिवसेनेच्या तालावर आयुक्त नाचत असल्याचे सांगितले. आम्ही सांगितलेली कामे करत नसल्याचीही तक्रार केली. पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या तक्रारी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्मित हास्य करून 'यावर निर्णय घेऊ' असे म्हणून ते निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...