आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नागरिकांकडून ३०० वर तक्रारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज, सोमवारी भरवलेल्या जनता दरबारात पुन्हा नागरिकांची गर्दी उसळली. या वेळी विविध विभागांच्या ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रारंभी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन तक्रारी स्वीकारल्या. या तक्रारींचा १५ दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला. 


जनता दरबारचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खिल्लारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, एसडीओ संजय खडसे, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सामूहिक तक्रारींची त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. आज प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये महसूल विभागाच्या सर्वाधिक १२३, पोलिस विभागाच्या ३०, जिल्हा परिषदेच्या ८४, महापालिकेच्या १९, महावितरणच्या १५, आदिवासी विकास विभाग, पंदेकृवि, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, चर्मोद्योग व एसटी महामंडळाची प्रत्येकी एक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या १०, समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालय व भूमी अभिलेखच्या प्रत्येकी तीन, कृषी विभागाच्या आठ, पाटबंधारे विभागाच्या पाच, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व वनविभागाच्या प्रत्येकी दोन, जिल्हा अग्रणी बँकेच्या १४, जिल्हा विपणन अधिकारी, व्हॅलीडीटी व डीएमओ कार्यालयाच्या प्रत्येकी चार तक्रारी प्राप्त झाल्या. 


स्पॉटवरच सुटली मूर्तिजापूरची तक्रार 
मुर्तिजापुरच्या राजगुरू नगर येथील रहिवासी यांनी दलित वस्तीमध्ये रस्ता, पाणी, व सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या आदी सुविधा नसल्याची तक्रार दिली. त्यावर दलित वस्तीसाठी संबंधित नगरपालिकेला निधी वितरीत करण्यात आला असून त्यातून ही कामे प्राधान्याने करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
केली न्यायाची मागणी 


ढाकली येथील शेतकऱ्यांनी धरणाचे बॅक वॉटर शेतातून गेल्याने शेत खराब झाल्याची तक्रार केली. तर म. रा. ग्रा.पं. कर्मचारी युनियनने हद्द वाढ झाल्यानंतर संबंंधित कर्मचाऱ्यांचे मनपात समायोजन करण्याबाबत निवेदन दिले. तसेच मनपातील अस्थायी कला शिक्षकांनी पुन्हा सेवेत घेण्याबाबतचे निवेदन दिले. 


चान्नी येथील 'त्या' तलाठ्याची बदली होणार 
पातुर तालुक्यातील चान्नी येथील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तलाठी लाड यांची बदलीबाबत कार्यवाही करण्याचे निवेदन गावकऱ्यांनी दिले होते. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागांना तक्रारीचे निरसन करण्याबाबत निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नागरिकांकडून ३०० वर तक्रारी

बातम्या आणखी आहेत...