आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरा दुख और आधा चाँद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षणानंतर शिक्षकी पेशा, त्यानंतर कस्टम विभागात नोकरी अशा वेगळ्याच वाटेनं जाऊनही लेखणी जिवंत ठेवणाऱ्या परवीन शाकीर यांच्याबद्दल सदराच्या आजच्या भागात...

 

परवीन शाकीर हे नाव उर्दु साहित्यात विशेषत: महिला शायरांमधे परिचित आहे. अतिशय कमी आयुष्यात त्यांनी खूप प्रसिद्धी प्राप्त केली. त्यांची लेखनशैली ही इतरांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या शायरीचा मुख्य गाभाच प्रेम, प्रेमभावना, अनुभवावर आधारित होता. 


कु ब कु फैल गई बात शनासाई की
उसने खुशबू की तरहा मेरी पजीराई की

( पजीराई : स्वीकृती,कबुली देणे )


परवीन यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९५२ ला कराची इथं झाला. सय्यद शाकीर हसन हे त्यांचे वडील. सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्यातल्या परवीन यांच्या कुटुंबाला शायरीत विशेष रस होता. रुची होती. विशेषत: परवीन यांच्या आजोबांना (आईच्या वडिलांना) शायरीतली गोडी ओळखून ते परवीनजींना ज्येष्ठ साहित्यिकांचं साहित्य वाचण्यास आणून देत. साहित्य वाचनाचा परिणाम परवीनजींच्या लेखन शैलीवरही जाणवतो. 


उसने जलती हूई पेशानी पर जब हाथ रक्खा
रूह तक आ गई तासिर मसिहाई की

 

एम.ए. इंग्रजी केल्यानंतर ९ वर्षे त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता. त्यानंतर १९८६ मधे त्या कस्टम विभागात शासकीय नोकरीही केली.त्यांना शिक्षणात खूप गोडी होती. त्यांनी १९९१ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून लोकप्रशासन व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. त्यांचा विवाह डॉ. नासीर अली यांच्याशी झाला मात्र दुर्दैवानं हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. त्याचा तलाक झाला. फुनून मासिकाचे संपादक व उर्दू साहित्यातील प्रसिद्ध साहित्यकार अहमद नदीम कासमी यांचे मार्गदर्शन त्या नेहमी घेत असत. त्यांची शायरी स्त्री व प्रेम या दोन अतिसंवेदनशील विषयांभोवती गुंफलेली आहे. त्यांच्या शायरीतून व्यक्त होणारं दु:ख, भावना ते फक्त त्यांच्याचपुरतं सीमित न राहता पूर्ण विश्वाचं ते प्रतिनिधित्व करतात. जीवनाच्या ज्या ज्या टप्प्यांमधून त्यांचा प्रवास सुरू होता त्याचं प्रतिबिंब त्यांच्या शायरीत दिसतं. 


पास जब तक रहे वो दर्द थमा रहता है
फैलता जाता है फिर आँख के काजल की तरह


आयुष्याच्या कठीण, खडतर मार्गावरून जाताना एक स्त्री, पत्नी, आई, पतीपासून विभक्त झालेली स्त्री, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य, त्यांना येणाऱ्या अडचणी, या सर्वच मुद्द्यांना त्यांनी खूप चातुर्यानं, आपल्या प्रतिभेनं अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी  लेखणीतून उतरवले. इंद्रधनुष्याचे सर्व रंग त्यांच्या लेखणीत समाविष्ट होते. 


वो तो खुशबू है, हवाओंमे बिखर जाएगा
मसला फूल का है फुल किधर जाएगा


परवीन यांच्या वेगळ्या शैलीमुळे स्त्री मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या महिला शायरांच्या लेखणीला एक नवे रूप प्राप्त झाले. निर्भिडपणे, प्रांजळपणे मांडलेले सत्य, अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे भाष्य हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. वाचकांनी त्यांच्या शायरीवर निस्सिम प्रेम केले. त्यांच्या अनेक कवितासंग्रहांना मोठमोठया पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. नवकवींनाही परवीनजींच्या शायरीनं खूप प्रेरणा दिली. २६ डिसेंबरला एका कार अपघातात त्यांचं निधन झालं. पण आपल्या शायरीच्या रूपानं त्या आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...