Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Composite response to 'Bharat Bandh' in Nashik city

कुठेही दगडफेक नाही, एसटीची एकही काच फुटली नाही, भारत बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद

दिव्य मराठी चमू | Update - Sep 11, 2018, 11:17 AM IST

पेट्राेल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विराेधी पक्षांनी साेमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र पाठिंबा

 • Composite response to 'Bharat Bandh' in Nashik city

  नाशिक- पेट्राेल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विराेधी पक्षांनी साेमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र पाठिंबा दर्शविला. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली हाेती. बंदमध्ये सहभागी पक्षांच्या वतीने शालिमार येथील डाॅ. अांबेडकर पुतळा ते निमाणी परिसरात माेर्चा काढून दुकाने बंद करण्याचे अावाहन करण्यात अाले. बंदकाळात शहरात कुठेही दगडफेक अथवा बसच्या काचा फाेडण्यात न अाल्याने नागरिकांनी नि:श्वास साेडला. काँग्रेस सेवादलाच्या वतीने शालिमार येथे टायर जाळून निषेध करण्यात अाला. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने द्वारका येथील पेट्राेलपंपासमाेर निदर्शने करण्यात अाली. चौकमंडई भागात मोदींचे फलक जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.


  देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, माकप, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली हाेती. नाशिकच्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंद ठेवली हाेती. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता शालिमार येथील डाॅ. अांबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत दुकाने बंद करण्याचे अावाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीला माेर्चाचे स्वरूप अाले हाेते.

  यावेळी केंद्र अाणि राज्य सरकारच्या विराेधात जाेरदार घाेेषणाबाजी करीत शालिमार, शिवाजीराेड, मेनराेड, दूध बाजार, भद्रकाली भाजी पटांगण, नेहरू चाैक, पगडबंद लेन, सराफ बाजार, कापड बाजार, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, निमाणी या मार्गाने हा माेर्चा नेत बंदचे अावाहन करण्यात अाले. यावेळी अामदार डाॅ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष शरद अाहेर, डाॅ. शाेभा बच्छाव, नगरसेवक शाहू खैरे, डाॅ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, समीर कांबळे, राहुल ढिकले, माजी महापाैर अशाेक मुर्तडक, सलीम शेख, अनिल मटाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, स्वाभिमानीचे हंसराज वडघुले, समाजवादीचे इम्रान चाैधरी यांनी सहभाग घेतला.


  वेठीस न धरता लोकप्रतिनिधींनी उपोषण करावे
  अभाेणा : सरकारच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये अभोणेकरांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे सर्व व्यवहार शंभर टक्के सुरळीतपणे सुरू होते. मात्र, बस बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कुठल्याही कारणासाठी नेहमी उद्योगधंदे बंद ठेवून सर्वसामान्य लोकांना मानसिक त्रास दिला जातो. या गंभीर प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने बंदमध्ये सहभागी होत नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. व्यापारी व सामान्य लोकांना वेठीस न धरता विविध पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वत: आमरण उपोषणास बसावे, असे मत लोकांनी व्यक्त केले.


  सायंकाळनंतर सजावट खरेदीसाठी गर्दी
  गणेशाेत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिकांनी मूर्ती अाणि मखर खरेदी करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बंदमुळे संबंधितांनी घरीच बसणे पसंत केले. दुपारनंतर नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.


  नुकसान न झाल्याने नागरिक समाधानी
  काेणत्याही बंदच्या काळात नाशिक शहरात याअगाेदर बसच्या काचा फाेडणे, दगडफेक करण्याचे प्रकार घडले हाेते. या माेर्चात अशाप्रकारचा काेणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.


  सेवादलाने जाळले रस्त्यावर टायर
  काँग्रेस सेवादलाने शालिमार येथे टायर जाळून निषेध केला. यावेळी अध्यक्ष वसंत ठाकूर, राजेंद्र बागुल, डाॅ. सुभाष देवरे, बबलू खैरे, सुरेश मारू उपस्थित हाेते.

Trending