आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदला संमिश्र प्रतिसाद, विरोधक एकत्र; राष्ट्रवादी, मनसेचा सहभाग, माकपचे स्वतंत्र आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात कॉँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली होती. या बंदला सर्व विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा देऊन सहभागही नोंदवला. संपूर्ण देशभरात पुकारण्यात आलेल्या या बंदला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शाळा, महाविद्यालये, राज्य परिवहन सेवा सुरळीत होती. पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त लावला होता. 


काँग्रेसने पुकारलेल्या या बंदमध्ये राष्ट्रवादी, मनसे, माकप या पक्षांनीही सहभाग घेतला. सोमवारी सकाळी कॉँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी नवी पेठेत फिरून सर्व दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, सचिव संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, कॉँग्रेसचे चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, बाबा करगुळे, जुबेर बागवान आदींनी फिरून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांना अडवले. काही नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया महिंद्रकर ,सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दिन शेख, अमोल झाडगे, सत्तार सय्यद, राहुल अक्कलवाडे, अभिषेक रंपुरे, जयश्री हिरेमठ, भारती मन्सावाले, सोपान महिंद्रकर, संजय चाबुकस्वार, यश काखंडकी, प्रसाद कुमठेकर, केदार सोवनी यांनी दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक भागात फिरून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. 


माकपने केली तीव्र निदर्शने 
चौक पोलिस चौकी येथील पेट्रोल पंपाजवळ माकपचे जिल्हा सचिव एम. एच. शेख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख आदी उपस्थित होते. सात रस्ता येथील पेट्रोल पंपाजवळ नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार, कुर्मय्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपासमोर जोरदार घोषणाबाजी करून सरकार विरुद्धचा आक्रोश व्यक्त केला. 


पूर्व भागात प्रभाव नाही 
मार्केट यार्ड, अशोक चौक, जोडबसवण्णा चौक, साखर पेठ, बुधवार बाजार, विजापूर वेस, बेगम पेठ, कन्ना चौक, कोंतम चौक, मधला मारुती, कुंभार वेस, बाळीवेस आदी ठिकाणांची सर्व दुकाने सुरू होती. तर चाटी गल्ली, नवी पेठ ही बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. दुपार नंतर काहींनी अर्धे शटर उघडले तर काहींनी बंद ठेवणे पसंत केले. सराफ बाजाराला सोमवारी सुटी असल्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. मात्र, शहरातील विविध शाळा, महाविद्यालये नियमित चालू होती. शाळा बंद ठेवण्यासाठी कोणत्याही महाविद्यालय अथवा शाळांनी अर्ज दाखल केला नव्हता, तसेच अनुचित प्रकार ही घडला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमेश जोशी यांनी दिली. 


बंद १०० टक्के यशस्वी : काँग्रेसचा दावा 
वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह इतर सर्व समविचारी पक्षांनी सोमवारी जाहीर केलेल्या 'भारत बंद'ला सोलापूरकरांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून शासनाच्या चुकीच्या धोरणांबद्दल संताप व्यक्त केला, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला राष्टृवादीचे पदाधिकारी, मनसेचे उमेश रसाळकर, प्रशांत इंगळे, काँग्रेसचे चेतन नरोटे, शहर महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, सुमन जाधव आदी उपस्थित होते. 


४७१ जणांना ताब्यात घेऊन सोडले 
शहरातील विविध पेट्रोल पंपावर आंदोलन करणाऱ्या ४७१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिले. सोमवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त होता. विविध ठिकाणाहून काँग्रेसचे प्रकाश वाले, माकपचे नलिनी कलबुर्गी, श्रीमती अाडम यांच्यासह ४७१ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत बंद पाळण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...