आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजाबागेत कंपोस्ट पीटच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना उबळ, तरीही मनपाने केला वॉर्ड क्रमांक १० कचरामुक्त घोषित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रोजाबाग वॉर्ड क्रमांक १० मध्ये सत्यविष्णू रुग्णालयासमोरील जागेत खोदण्यात आलेल्या कंपोस्ट पीटमध्ये ओला आणि सुका कचरा एकत्रच कोंबल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. या दुुर्गंधीमुळे अर्धा किलोमीटर परिसरातील म्हणजेच निम्म्या वॉर्डातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असतानाच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी वॉर्ड क्रमांक १० कचरामुक्त झाल्याची घोषणा शुक्रवारी केली. कचराकोंडी फोडण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी महापालिका कागदोपत्री जादूचे प्रयोग करत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 


महापालिकेला तब्बल १२४ दिवसांनंतरही कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबत वेळोवेळी महापालिकेची कानउघाडणी केल्यामुळे कागदोपत्री वॉर्डावॉर्डात कशी स्वच्छता करून वॉर्ड कचरामुक्त करण्यात आले आहेत, याचा अहवाल सादर करण्यासाठी हा आटापिटा सुरू असल्याची शंका घेण्यात येऊ लागली आहे. रोजाबाग वॉर्डातील कंपोस्ट पीटमध्ये या वॉर्डाबरोबरच अन्य वॉर्डांतील ओला आणि सुका असा मिश्रित कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे कचऱ्याचे विघटन होऊन त्यापासून खतनिर्मिती तर झालीच नाही, उलट मिश्रित कचऱ्यामुळे या कंपोस्ट पीटमधून प्रचंड दुुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे अर्धा किलोमीटर परिसरातील म्हणजेच निम्म्या वॉर्डातील नागरिक दुर्गंधीने हैराण असून त्यांचे या ठिकाणी राहणेही मुश्कील होऊन बसले आहे. वॉर्ड क्रमांक दहा रोजेबागमधील कचरा नियमित उचलण्यात येत असला तरी सिद्धार्थनगरमधील नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे. दुसरीकडे तयार करण्यात आलेल्या पीटमधून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना त्रास होत असला तरी यावर उपाययोजना करण्यापूर्वी थेट कचरामुक्त वॉर्ड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात दुर्गंधी येऊ नये ही अटच टाकण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. 

 
नागरिकांच्या भरवशावर मनपा 
नागरिकांनी स्वत: वर्गीकरण करून कचरा दिला. मात्र, या कंपोस्ट पीटमध्ये इतर ठिकाणचा मिश्रित कचरा टाकल्याने खत होण्याऐवजी त्याची दुर्गंधी सुटली आहे. वॉर्डातील कचरा वेगवेगळा गोळा होतो. सुक्या कचऱ्याची विल्हेवाटही होते. सर्व कामे नागरिकच करत आहेत. मनपा केवळ कचरा आणून टाकण्याचे काम करत आहे. यामुळे दुर्गंधी वाढली असल्याने मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 


अतिरिक्त आयुक्त म्हणाले, दुर्गंधी येत असेल तर औषध फवारणीचे आदेश लगेच देतो 
शुक्रवारी रोजाबाग वॉर्ड समारंभपूर्वक कचरामुक्त घोषित करण्यात आल्यानंतर 'दिव्य मराठी'ने मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना थेट सवाल केले. त्या वेळी त्यांनी कचरामुक्तीत दुर्गंधीचा समावेशच नाही, पण दुर्गंधी येत असेलच तर त्यावर औषध फवारणीचे आदेश तत्काळ देतो, असे सांगितले. त्यांच्याशी झालेली 

 

प्रश्नोत्तरे अशी...: 

 

वॉर्ड कचरामुक्तीचे निकष काय? 
उत्तर : उघड्यावर, रस्त्यावर, गल्लीबोळात कचरा साचून नसावा. कचरा डंपिंग नसावे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त वर्गीकरण करण्यात यावे. 
 

दुर्गंधीचा समावेश यात होत नाही का? 
उत्तर : यात तसा काही समावेश नाही. कंपोस्ट पीट असल्याने काही प्रमाणात वास येईलच. 


नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे? 
उत्तर : शंभरपैकी चार लोकांना त्रास होत असेल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. मात्र, दुर्गंधी जास्त असल्यास त्यावर प्रक्रिया करण्याचे, औषध फवारणीचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना तत्काळ देतो. 
 

आपण कंपोस्ट पीटला भेट दिली का? 
उत्तर : मी यापूर्वी भेट दिली आहे. आता केवळ कार्यक्रमाला जाऊन आलो. गेल्या वर्षभरापासून येथे चांगले काम होत आहे. 


तरीही वॉर्ड कचरामुक्त कसा? 
उत्तर : रोजाबाग वॉर्डातील नागरिकांनी चांगले काम केले आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याचे नियमित वर्गीकरण होते, वॉर्डात कुठेही कचरा साचून राहत नाही. चांगल्या कामांचे कौतुक झालेच पाहिजे. दुर्गंधी सुटली असेल तर उपाययोजना करता येईल. 

बातम्या आणखी आहेत...