आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 'Condition In Kashmiris Very Fragile, Conversation And Services Can Only Build Up Confidence' Said Border less World Foundation's Adhik Kadam

'काश्मीरमधील परिस्थिती नाजूक, संवाद व सेवाच निर्माण करू शकतात विश्वास' - बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला सहा महिने पूूर्ण होत असताना तेथील जनता मात्र अजूनही 'होपलेस आणि हेल्पलेस' परिस्थितीचा अनुभव घेत असल्याचे मत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांनी व्यक्त केले. हिंसाचारामुळे अनाथ झालेल्या ३०० मुलींसाठी ते जम्मूमध्ये हॉस्टेल उभारत असून, त्यासाठीच्या निधी संकलनासाठी ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. शस्त्राच्या जोरावर एखादा उठाव दाबून रोखता येतो, मात्र माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सेवाव्रती संवाद हाच उपाय असल्याचे त्यांनी सोदारण मांडले. काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने इंंटरनेट, दळणवळण, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि रस्ते इत्यादी सेवा तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

३७० कलम रद्द झाल्यावर काश्मिरी जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. लष्कराच्या मदतीने तेथील परिस्थिती नियंत्रणात दिसत असली तरी लोकांच्या मनातील उद्रेक कायमचा शांत होण्यासाठी वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, दळवणवळणाच्या सुविधा काश्मिरी जनतेपर्यंत तातडीने पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी मांडले. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून ते गेल्या २३ वर्षांपासून काश्मीरमध्ये स्वयंसेवी काम करत आहेत. काश्मिरी जनतेच्या मनातील जखम पूर्णपणे भरून येण्यासाठी पंचवीस वर्षे तरी लागतील, असा त्यांचा अंदाज आहे. काश्मीरच्या ९ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती गंंभीर आहे, तर ३ जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ३७० कलम रद्द केले, पण त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणतीही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने तेथील कारभार सुरू होण्याची अपेेक्षा असेल तर केंद्र सरकारने रस्ते, दळणवळण, शिक्षण, आरोग्य व उद्योग यांसारख्या सेवा तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांत काश्मीरमध्ये कोणतेही सरकार तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देेऊ शकले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मिरी जनतेमध्ये भारत आपला देश आहे हा विश्वास निर्माण करायचा असेल तर संवादाचे माध्यम व कल्याणकारी सेवांची तातडीची अंमलबजावणी याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

३७० कलम आणि काश्मिरी मुलींशी लग्न

त्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये जमीन खरेदीपासून काश्मिरी युवतींशी लग्नाची परवानगी अशा स्वरूपाचे खिल्लीवजा संदेेश समाज माध्यमांवरून प्रसारित झाले होते. कदम यांनी याबाबत खंत व्यक्त करून काश्मिरी जनतेबाबत ही असंवेदनशीलता असल्याचे मत व्यक्त केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या काश्मिरी जनतेशी मानवतेचे नाते जोडण्यासाठी अशा प्रकारच्या उपहासात्मक नाही, तर खऱ्या अर्थाने संवेदनशील विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांबद्दल असे विचार शिकवले नाहीत, तर परस्त्रीलाही आदराने वागवण्याचा संदेश दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. गेली सत्तर वर्षे काश्मीरमध्ये सुरू असलेेल्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराचे व संघर्षाचे पहिले बळी तेथील मुले ठरली असून, त्यांना वाचवण्याचा विचार हेच काश्मीरचे विधायक भवितव्य असेल, असे ते म्हणाले.

'बसेरा-ए-तबस्सुम'चे आवाहन

बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे हिंसाचारामुळे अनाथ झालेल्या काश्मिरी मुलींसाठी निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा देण्यात येते. आतापर्यंत २४० अनाथ काश्मिरी युवतींना यात निवारा आणि शिक्षण मिळाले असून, ३५ विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी खोऱ्याबाहेर रवाना झाल्या आहेत. ११३ युवती विवाहानंतर स्थिर, सुरक्षित व सुशिक्षित जीवन जगत आहेत. १२ रुग्णवाहिका लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवत आहेत. पाचमजली इमारतीच्या एका छताखाली या सर्व सेवा एकत्र आणण्यासाठी 'बसेरा-ए-तबस्सुम' हा प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एका वेळी ३०० अनाथ मुलींना शिक्षण, निवारा व आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. यासाठी संस्थेतर्फे निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. यात हातभार लावू इच्छिणाऱ्यांनी adhik@borderlessworldfoundation.org किंवा ०२०-२४३२७७६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करत आहोत.
 

बातम्या आणखी आहेत...