आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेखर मगर
उस्मानाबाद : अखिल भारतीय साहित्य संमेलनातील मुंबई तरुण भारत, हिंदुस्ताल प्रकाशन संस्थेच्या ग्रंथविक्री स्टॉलवर सकाळी ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आलेली असता वादविवाद झाला. या स्टॉलवर संमेलनाध्यक्ष फ्रांसिस दिब्रिटो यांच्यावरील पुस्तिका मोफत दिली जात असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी पुस्तिकेतील मजकूराविषयी स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली. त्यावेळी स्टॉलवरील सोमेश कोलगे आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोहचल्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुरू असतानाच ‘मुंबई तरूण भारत’ नावाने ग्रंथविक्री करणाऱ्या स्टॉलवर पोलिसांचे पथक दाखल झाले. हातात डायरी घेऊन आलेले पीएसआय माने यांनी मुंबई तरूण भारतचे पत्रकार सोमेश कोलगे यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. यावरून स्टॉलवरील उपस्थित व पोलिसांमध्ये वादाला सुरूवात झाली.
यानंतर कोलगे व माने यांनी एकमेकांवर आक्षेप घेत मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले. पुस्तक विक्री करणे गुन्हा आहे का अशी विचारणा कोलगे यांनी केली तर आपण केवळ आपले कर्तव्य करत असून आपण यात हस्तक्षेप करताय असे माने यांचे म्हणणे होते. दोघांमध्ये बाचाबाची सुरू असताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले आणि दादा गोरे यांच्यासह सर्व मान्यवर स्टॉलच्या समोरून गेले. त्यानंतर माने यांनी पोलिस उप-अधीक्षक मोतीचंद्र राठोड यांना फोनवरून घडला प्रकार सांगितला. थोड्या वेळाने राठोड यांनीही स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली.
यावेळी तरुण भारत स्टॉलवर प्रदीप गुरव, महेश पुराणिक, प्रथमेश तांडेल, केतन वैद्य, शिरिष सोनवणे, अजय राठोड आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.