Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | conflict in between shivena leader rathod and officer nayar

मी कायदा घेऊन फिरत नाही, तुम्ही जाऊन वाचा; नायर यांचे शिवसेना उपनेते राठोड यांना खडेबोल

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 11:37 AM IST

नेता सुभाष तरुण मंडळाने चितळे रस्त्यावर विनापरवाना उभारलेला मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या

 • conflict in between shivena leader rathod and officer nayar

  नगर- नेता सुभाष तरुण मंडळाने चितळे रस्त्यावर विनापरवाना उभारलेला मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात काढला. दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी या कारवाईबाबत जाब विचारताच, परीविक्षाधीन अधिकारी प्रजित नायर यांनी, 'मी कायदा घेऊन फिरत नाही. तुम्ही जाऊन वाचा' असे खडेबोल सुनावले. या कारवाईनंतर उपनेते राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत उपोषणास सुरुवात केली.


  सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला अाहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप बांधण्यास सुरुवात केली आहे. मंडपाला परवानगी देण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तथापि, काही मंडळांनी विनापरवाना मंडप उभारणी करण्यास सुरुवात केली असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.


  अतिक्रमण विरोधी पथकाने विनापरवाना उभारलेले मंडप काढण्याचे आवाहन रविवारी (२ सप्टेंबर) गणेश मंडळांना केले होते. यापार्श्वभूमीवर परिविक्षाधीन अधिकारी तथा प्रभारी प्रभाग अधिकारी प्रजित नायर व अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथक नेता सुभाष चौकात सोमवारी सकाळी दाखल झाले. नेता सुभाष तरुण मंडळाने चौकात विनापरवाना मंडप उभारल्याने पथकाने कारवाईचा पवित्रा घेतला. दरम्यान, उपनेते राठोड व मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड त्याठिकाणी पोहोचले. या कारवाईबाबत राठोड यांनी अधिकारी नायर यांना जाब विचारला. नायर यांनी महापालिका प्रांतिक अधिनियम क्रमांक २३१ अंतर्गत कारवाई केल्याचे सांगितले. त्यावर राठोड यांनी नियम दाखवा, अशी मागणी केली. त्यावर नायर यांनी 'मी नियम दाखवणार नाही, तुम्ही जाऊन वाचा. मी कायदा घेऊन फिरत नाही वाचून येतो, असे खडेबोल सुनावले, तर राठोड यांनी, ही कारवाई चुकीची असल्याचा दावा केला. परंतु प्रशासनाने विरोध झुगारून जेसीबीच्या साह्याने मंडप हटवला.


  रस्त्यावर मंडपाचा अस्ताव्यस्त पडलेला सांगाडा व मोटारसायकलींमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. राठोड यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावून त्याच ठिकाणी आरती करण्यात आली.


  मंडपावर कारवाई करणाऱ्या प्रजित नायर व सुरेश इथापे यांच्यावर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने उपोषण सुरू केले. या कारवाईमुळे विनापरवाना मंडप उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

  या कायद्यानुसार हटवले मंडप
  मनपा अधिनियमातील कलम २३१ नुसार आयुक्तांना नोटीस न देता कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यावर उभारण्यात आलेली भिंत, कुंपण, कठडा, खांब, पायरी, मंडप, पक्के बांधकाम हटवण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत.


  शिवसेनेची पोलिसांत धाव
  कारवाईनंतर अनिल राठोड, दिलीप सातपुते, संभाजी कदम, गणेश कवडे यांनी कोतवाली ठाण्यात धाव घेतली. नगरसेवक विक्रम राठोड यांनी तक्रारअर्ज दिला. धार्मिक भावना दुखावल्या असून मोडतोडीत तीन ते चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी प्रभारी अधिकारी प्रजित नायर, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर सायंकाळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन कारवाईची मागणी केली.


  परप्रांतीय अधिकारी नकोत
  जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची जिल्ह्याबाहेर बदली करा. परप्रांतीय अधिकारी नगरला आता नको आहेत. महाराष्ट्रातील अधिकारी द्या, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने दंडेलशाही सुरू केली आहे. हिंदूंच्या भावना चिरडून टाकण्याचे काम अधिकारी करत आहेत का? हिंदूंच्या भावनांचा विचार होणार नसेल, तर आता रस्त्यावर गणपती बसवू, असा इशाराही राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला.


  भाजपला नकोय कारवाई
  नगर शहरातील गणेश मंडळांवर प्रशासनाने अन्यायकारक कारवाई करू नये, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी असल्याने दोन्ही विसर्जन मार्ग वेगळे आहेत. या मार्गावरील ज्या अटी व नियमांच्या अधन राहून मंडळांवर कारवाई केली जाते, त्या अटीनुसार शहरातील उर्वरित गणेश मंडळांवर कारवाई करू नये, अशी मागणी खासदार गांधी यांनी केली.


  प्रेरणा प्रतिष्ठानलाही सूचना
  दाळमंडई चौक व मंगलगेट पोलिस चौकी या ठिकाणी दोन दहीहंडीचे मंडप होते. सूचना दिल्यानंतर ते काढण्यात आले. सोमवारी सकाळी साडेसातच्या नेता सुभाष चौकातील मंडप प्रशासनाने काढून घेतला. इम्पिरियल चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानला दहा गुणिले दहा फुटांच्या स्टेजची परवानगी होती. जास्तीचा मंडप काढण्यात आला. याव्यतिरिक्त स्वस्तिक चौक भागातही पथक गेल्यानंतर मंडप स्वत:च काढून घेण्यात आले. दुपारनंतर घासगल्ली, कापडबाजार, गंजबाजार भागात पथकाने अतिक्रमणे काढली. माणिक चौक, कोतवाली पोलिस स्टेशन, भिंगारवाला चौक, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा परिसरातील फ्लेक्स काढण्यात आले.


  विनापरवानांवर कारवाई
  बैठकीत कायद्याचे गांभीर्य समजावून सांगितले आहे. सर्व उत्सव आनंदात व शांततेत साजरे झाले पाहिजे. तथापि, आवाहन करूनही बेकायदेशीर मंडप उभारले जातात. रस्त्याचा साठ टक्के भाग वाहतुकीसाठी मोकळा असला पाहिजे. सकाळी नेता सुभाष चौकात कारवाईसाठी गेलो. तेथे उभारलेला मंडप विनापरवाना असल्याने निष्कर्ष काढण्यात आला. यापूर्वी ज्यांनी कायद्याचे उल्लघन केले आहे, त्यांना परवानग्या देऊ नये असे प्रशासनाचे आदेश आहेत.
  - सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख़, मनपा.


  खडाजंगीची क्लिप व्हायरल...
  राठोड :
  या जागेतून अॅम्ब्युलन्स व फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकते.
  नायर : साठ टक्के जागा मोकळी ठेवावी लागते.
  राठोड : तुम्हाला नियम माहिती आहेत का ? नियमानुसार तुमचे चुकीचे आहे. नियम हिंदू सणांसाठी आहेत का? आम्ही तुमच्यावर केस करू. मंडपाची कमिटी असते, ती हे ठरवते. नगरपालिकेचे नियम दाखवा आम्हाला, ही तर दादागिरी आहे.
  नायर : मुंबई प्रांतिक अधिनियम कलम २३१ आहे. ते तुम्ही जाऊन वाचा. हे तुम्हाला माहिती नाही, ही तुमची चूक आहे, माझी नाही.
  राठोड : नियम आहेत, तुम्ही कोणालाही बोलवा
  नायर : नियम देतोय ना मी, मी कायदा घेऊन फिरत नाही, तुम्ही जाऊन वाचा.
  राठोड : मंडपाची कमिटी आहे, ती कशी असावी याबाबत अजून काहीच झाले नाही, कमिटीने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Trending