आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवालात प्रसिद्ध फोटोवरून एनडीएसटीच्या सभेत गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिक्षकांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनडीएसटी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. वार्षिक अहवालात शिक्षक आमदारांऐवजी इतर नेत्यांचे फोटो छापल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या विरोधात घोषणा दिल्या. एवढेच नव्हे तर ९ टक्के लाभांश देण्याची मागणी करत घेराव घालून अध्यक्षांकडील माईकवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे संचालकांनी सर्वच विषय मंजूर करून घेत वार्षिक सभेचे कामकाज गुंडाळले. 


प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि. २) नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नाॅनटीचिंग एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची (एनडीएसटी) ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पाडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब ढोबळे होते. उपाध्यक्षा भारती पवार, कार्यवाह अरुण पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस अहवालातील नेत्यांच्या फोटोवर सभासदांनी आक्षेप घेतला. वार्षिक अहवालात कार्यक्षेत्रातील शिक्षक आमदारांचे फोटो वापरले जातात. यंदा सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे फोटो छापण्यात आल्याने सभासदांनी आक्षेप घेतला. विद्यमान संचालक मंडळाने ५० वर्षांची परंपरा मोडीत काढल्याने निषेध करत सभासदांनी गोंधळ घातला. या गोंधळातच अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. परंतु, प्रशासक नियुक्तीच्या कार्यकाळातील हा अहवाल असल्याचे सांगत सभासदांनी अध्यक्षांना बोलण्यापासून रोखले. सभासदांनी राजकीय हेतूने आरोप न करता संस्थेच्या हिताचे प्रश्न मांडावेत. त्यांचा स्वीकार करू, असे सांगत संचालकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संचालकांचे म्हणणे ऐकून न घेता काही सभासदांनी व्यासपीठावरच धाव घेतली. ९ टक्के लाभांश देण्याची मागणी केली. संचालकांना घेराव घालत माइक घेण्याचा प्रयत्नही झाला. या गोंधळातच संचालक मोहन चकोर यांनी साडेआठ टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मांडला. अध्यक्षांनी तो फेटाळत ८ टक्के लाभांश आणि ठेवींवर ८ टक्के व्याजाने कर्ज देण्याचा विषय मंजूर केला. सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत अध्यक्षांनी कामकाज पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी संचालक भाऊसाहेब पाटील, संजय देवरे, भाऊसाहेब शिरसाठ, रामराव बनकर, जिभाऊ शिंदे, संजय चव्हाण, हेमंत देशमुख, राजेंद्र सावंत, संजय देसले, दत्तात्रय आदिक, विजया देवरे, संजय वाघ, अण्णासाहेब काटे उपस्थित होते. 


वेतनाच्या २५ पट कर्जपुरवठा करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय 
निवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे सभासद संख्या कमी होत असल्याने यापुढे २० ते ६० टक्के मंजुरी असलेल्या शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या २५ पट कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे दोन ते सहा लाखांपर्यंतचे कर्ज आता शिक्षकांना मिळू शकेल. जिल्ह्यातील सभासदांसाठी शहरात तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था हाेण्यासाठी नाशिकमध्ये एनडीएसटी शिक्षक भवन उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...