आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशाेक अडसूळ, दीप्ती राऊत

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचेच सरकार सत्तारूढ हाेणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी 'मुख्यमंत्री काेण?' या प्रश्नावर शुक्रवारी दिवसभर खल सुरू हाेता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा संभ्रम दूर केला. तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, 'नव्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील, याविषयी आमच्या सर्वांचेच एकमत आहे.' त्यामुळे आजवर राजकारणात 'रिमाेट कंट्राेल'ची भूमिका निभावणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हाती आता राज्याचा कारभार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी याबाबत अधिकृत घाेषणा हाेईल.


बैठकीतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनाही पत्रकारांनी घेरले. मात्र अजून चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी ठाेस काहीच सांगितले नाही. या बैठकीनंतर ते महापाैर बंगल्यावर गेले. तिथे शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. या नेत्यांनीही 'साहेब, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा' असे सांगितले. उद्धव मात्र सहजासहजी तयार नव्हते. रात्री उशिरापर्यंत नेत्यांचा हट्ट सुरूच हाेता. तेव्हा 'सकाळी निर्णय घेऊ' म्हणत उद्धव निघून गेले. दरम्यान, उद्धव ठाकरेंचा हाेकार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी रात्री सांगितले.

बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण हाेणार | शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते अाज करणार घाेषणा
 
दिल्लीतील बैठकांत संभाव्य सरकारचा आराखडा अंतिम केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले. त्याच मध्यरात्री शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा हाेऊन या आराखड्यावर शिक्कामाेर्तब झाले. शुक्रवारी सकाळी काँग्रेस- राष्ट्रवादीने आपल्या घटक पक्षांची बैठक घेऊन त्यांनाही नव्या सरकारबाबत व किमान समान कार्यक्रमाबाबत अवगत केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग माेकळा झाला. त्याची अाैपचारिकता पूर्ण करण्यासाठी सायंकाळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. आता शनिवारी महाविकास अाघाडीचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारबाबत झालेल्या निर्णयाची एकत्रित माहिती देतील.


10.00 am उद्धव ठाकरेंनी घेतली शिवसेना आमदारांची बैठक
11.00 am आघाडीच्या घटक पक्षांची बैठक, महाविकास आघाडीला संमती
1.00 pm काँग्रेसची विधान भवनात बैठक, पाठिंबा पत्रावर स्वाक्षऱ्या
4.00 pm महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामाेर्तब.

उद्धव ठाकरेच का?
 
१. खरे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हाेण्यास तयार नव्हते. मात्र एकनाथ शिंदे, सुभाष देसाई किंवा संजय राऊत यांना हे पद दिल्यास पक्षात गटबाजी उफाळून येण्याची भीती.
२. शिंदे, राऊत, देसाई यांचे नेतृत्व स्वीकारण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी तयार नाही, उद्धव यांच्याच नावाला त्यांची पसंती.
३. दुसरा नेता मुख्यमंत्री झाल्यास सरकारवर रिमाेट कंट्राेल ठाकरेंचाच असेल. आधीच तीन पक्षांचे सरकार, त्यावर 'बाहेरून कंट्राेल'मुळे वाद वाढण्याची शक्यता.
४. ठाकरे-पवार कुटुंबीयांत पूर्वीपासूनच सलाेखा. उद्धव यांच्याशी समन्वय करणे साेपे जाईल, असा पवारांना विश्वास.

चर्चा जही सुरूच राहणार : अहमद पटेल


आजच्या चर्चेत काही मुद्दे अनिर्णीत राहिलेत. शनिवारीही चर्चा सुरू राहील, असे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'तिन्ही पक्षांत सकारात्मक चर्चा होती, त्यात अनेक मुद्द्यांवर एकमत झाले.' शरद पवारांनी उद्धव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, 'शरद पवार जे काही म्हणाले आहेत ते रेकॉर्डवरच आहे.'

महाविकास आघाडी ही संधिसाधू : गडकरी


शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची संधिसाधू आघाडी आहे, ती स्थिर सरकार देऊ शकणार नाही, असे मत भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या पक्षांच्या विचारसरणीत फरक अाहे. अशा सरकारमुुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसेल. भाजप-शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. युती माेडणे म्हणजे राष्ट्राचेच नव्हे तर हिंदुत्वाचे नुकसान आहे, असे गडकरींनी सांगितले.

आघाडीविरुद्ध थेट सुप्रीम कोर्टात याचिका


राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. आता त्यात बदल होऊ शकत नाही. यामुळे ही युती ताेडून इतर पक्षांसाेबत आघाडी स्थापन हाेऊ शकत नाही, असा आक्षेप घेत सुरेंद्र इंद्रबहादूर सिंह यांनी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या आघाडीला सत्तास्थापनेचे आमंत्रण देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.

'भाजप नकाे' म्हणत घटक पक्षांचा पाठिंबा


समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं कवाडे गट, लोकसंग्राम पक्ष, रिपाइं खरात गट, जनता दल, श्रमिक मुक्ती दलाचे नेते घटक पक्षांच्या बैठकीत उपस्थित हाेते. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विकासाच्या मद्द्यावर या पक्षांनी शिवसेनेसाेबत सत्तेत जाण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला.


मंदिर-मशीद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा - अबू आझमी, सपा
संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला भाव मिळावा यासाठी आग्रही - राजू शेट्टी