आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाेद महाजनांच्या व्यासपीठावर काँग्रेस नेत्याच्या प्रवेशाने गोंधळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीलेश अमृतकर 

नाशिक - तारीख २१ मे १९९१. नाशकात मेन राेडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमाेरील सभास्थळ... भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार डाॅ. दाैलतराव आहेर यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रमाेद महाजन यांची सभा.. रात्रीचे ११ वाजले हाेते. (त्या वेळी वेळेची मर्यादा नव्हती.) सभा एेन रंगात आली असताना अचानक काँग्रेसचे नेते शांताराम बापू वावरे हे धापा टाकत टाकत व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न करत हाेते. त्यांना काही कार्यकर्त्यांनी खालीच राेखल्याने वाद निर्माण झाला. सभा उधळण्यासाठीच हे महाशय आत घुसल्याचा आराेप करीत कार्यकर्ते आराडाआेरड करू लागले. 

वावरे यांच्याशी झटापट करून त्यांना धक्काबुक्की करण्याच प्रयत्न हाेत असतानाच गाेंधळामुळे भाषणात व्यत्यय येत होता. यामुळे प्रमोद महाजन यांनीच कार्यकर्त्यांना माइकवरून सूचना केली की, थांबा त्यांना वरती येऊ द्या, ते काय सांगतात हे एकून तरी घ्या. अखेर कार्यकर्ते थांबले. व्यासपीठावर असलेले डाॅ. आहेर, बंडाेपंत जाेशी, लक्ष्मण सावजी, विजय साने यांनी पुढे येऊन ‘हे तर शांतारामबापू वावरे आहेत. त्यांचा राजकीय पक्षांतील दरारा लक्षात घेता ते काही सभा उधळण्याचा प्रयत्न वगैरे करणार नाहीत’, असे महाजन यांना सांगितले. महाजन यांनीही वावरेंना जवळ बाेलवत त्यांचे म्हणणे एेकले. त्या काळी न्यूज चॅनल अथवा माेबाइलचा फारसा वापर नव्हता. वावरे यांनी सांगितले की, पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याची बातमी मी आताच रेडिआेवर ऐकली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून महाजन यांनीही तत्काळ सभा थांबवली. म्हणाले, ‘अशा पद्धतीने पंतप्रधानपदाच्या व्यक्तीची हत्या हाेणे ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेबाबत खात्री करून घेऊ, मात्र आता ही सभा संपल्याचे जाहीर करताे.’
 

प्रमोद महाजन यांनी भाषणात राजीव गांधी यांना वाहिली होती श्रद्धांजली
सभेत महाजन म्हणाले, राजीव गांधींनी आणलेल्या तंत्रज्ञानाने आधुनिक प्रगतीसाठी महत्त्वाचे याेगदान दिले आहे. त्यांची हत्या क्लेशदायक असून त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहून अभिवादन करताे. सभास्थळावरून जाताना काेणीही राजकीय घाेषणाबाजी आरडाआेरड करू नये, असे आवाहन केले. या घटनेनंतर लाेकसभा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. दुसऱ्या फेरीत नाशिकच्या मतदारसंघात निवडणूक हाेऊन डाॅ. आहेर यांचा पराभव झाला. या निवडणुकीत डाॅ. आहेर यांचेच नातलग व काँग्रेसचे नेते डाॅ. वसंतराव पवार विजयी झाले.