आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी लढण्यास काँग्रेसचे 52 खासदार हेच पुरेसे : राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या दहा दिवसांनंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाची शनिवारी बैठक पार पडली. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक दिसले. मोदी सरकार म्हणजे ब्रिटिशराज आहे. देशात तुम्हाला कोणतीही संस्था पाठिंबा देणार नाही. कोणीही समर्थन करणार नाही. ब्रिटिश काळासारखी आजची परिस्थिती आहे. कोणत्याही संस्थानाने पक्षाला पाठिंबा दिला नाही तरी आम्ही लढलो होतो. तेव्हाही आम्ही लढलो आणि विजयी झालो होताे. आता पुन्हा आम्ही विजय संपादन करू, असा विश्वास राहुल गांंधी यांनी व्यक्त करून पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला.आपण ५२ खासदार आहोत. हे सर्व वाघाचे काळीज असलेले खासदार आहेत. आपण भलेही संख्येने कमी असू, परंतु भाजपच्या ३०३ खासदारांशी लढण्यास सक्षम आहोत. संसदेत भाजपला वॉकआेव्हर देणार नाही. 


भाजपच्या विरोधात संसदेत इंच-इंचाने लढा देऊ. ही संख्या लढाईसाठी पुरेशी आहे, असे राहुल यांनी सांगितले. ते (भाजप) आपल्याविरोधात राग व सूड वापरतात. आपण आक्रमक होण्याची गरज आहे. हा आपल्यासाठी आत्ममंथनाचा विषय आहे, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. 


संकटाची वेळ आणि संधीही : सोनिया गांधींचा सल्ला 
संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या, हा सर्वांसाठी अभूतपूर्व असा संकटकाळ आहे, परंतु यात अभूतपूर्व अशा संधीही दडलेल्या आहेत. संधी किती विनम्रपणे व आत्मविश्वासाने घेतो, हे सर्वस्वी स्वत:वर अवलंबून आहे. पराभवातून योग्य धडा घ्यावा. सोनियांची नेतेपदी निवडीबद्दल राहुल यांनी शुभेच्छा दिल्या. सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बळकट होईल असे राहुल म्हणाले.


सपा-बसपची मते भाजपला मिळाल्याने अमेठीत पराभव
अमेठीतील पराभवाच्या कारणांवर काँग्रेसमध्ये काथ्याकूट केला जात आहे. पराभवाची कारणे शोधणाऱ्या काँग्रेसच्या दोनसदस्यीय समितीने या पराभवाचे खापर बसप व सपावर फोडले. दोन्ही पक्षांनी काँग्रेसला सहकार्य केले नाही. हीच बाब पराभवाचे कारण ठरली. दोन्ही पक्षांसोबतच स्थानिक काँग्रेस शाखेनेदेखील साथ दिली नाही. म्हणून ही मते भाजपच्या खात्यात गेल्या.